अमित शहांना जरा समजवा… अरविंद केजरीवाल यांचा सीएम योगींना सल्ला
दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना राजकीय पक्षांमध्ये वार-पलटवार सुरू आहेत. अशातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की त्यांनी अमित शहांसोबत बसून त्यांना कायदा आणि सुव्यवस्था कशी चालते हे समजावून सांगावे, त्यांच्यासोबत बसून त्यांना मार्गदर्शन करावे, असा खोचक सल्ला केजरीवाल यांनी दिला.
अरविंद केजरीवाल यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, काल योगी आदित्यनाथ दिल्लीत आले. त्यावेळी त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली. ते म्हणाले दिल्लीत कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे. याबाबत मीही 100 टक्के सहमत आहे. शिवाय दिल्लीतील लोकंही त्याच्याशी सहमत आहेत. येथे गँगस्टर बिनधास्त फिरत आहेत. व्यापाऱ्यांकडून बेधडकपणे खंडणी मागितली जात आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर गँगवार होत आहे, महिलांना घरातून बाहेर पडणे कठीण झाल्याचे केजरीवाल म्हणाले.
पुढे केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील जनता दहशतीखाली आहे. सीएम आदित्यनाथ यांनी काल योग्यच मुद्दा उचलला. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्था कठोर आहे. तिथली कायदा सुव्यवस्था ठीक आहे की नाही हे मला माहित नाही. त्यांनी उत्तर प्रदेशातील सर्व गुन्हेगारी मोडून काढली असेल तर मला त्यांना सांगावेसे वाटते की, दिल्लीची कायदा सुव्यवस्था अमित शहा यांच्या अखत्यारित येते. दिल्लीकरांना सुरक्षित जीवन देणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना विनंती आहे की, त्यांनी अमित शहांसोबत बसून त्यांना कायदा आणि सुव्यवस्था कशी चालते हे समजावून सांगावे, असा खोचक सल्ला केजरीवाल यांनी दिला.
केजरीवाल म्हणाले, ‘अमित शहा यांच्यासोबत बसून त्यांना मार्गदर्शन करावे. त्यांना दिल्लीची कायदा सुव्यवस्था सुधरवण्यासाठी काय करायला हवे ते समजावून सांगावे, दिल्लीतील जनतेला सुरक्षा कशी द्यायची यासाठी अमित शहांकडे वेळ नाही. कसा वेळ असेल अमित शहा तर संपूर्ण देशात आमदार खरेदी करणे, सरकार पाडणे आणि पार्ट्यांमध्ये व्यस्त आहेत. मुख्यमंत्री योगी यांना अमित शहांना बसवून समजावून सांगावे लागेल की जर कायदा आणि सुव्यवस्था सुधारायची असेल तर थोडा वेळ द्यावा लागेल. तुम्ही दिल्ली गुंडांच्या हाती सोपवू शकत नाही’, असा इशाराच दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List