ठाणे शहर, पुणे ग्रामीण अजिंक्य; कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी
पुणे ग्रामीण आणि ठाणे शहर या संघांनी 51 व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे कुमारी व कुमार गटाचे विजेतेपद पटकावले. कुमारीच्या अंतिम सामन्यात गतउपविजेत्या पुणे ग्रामीण संघाने गतविजेत्या पिपंरी-चिंचवडचा प्रतिकार 32-25 असा मोडून काढत स्वर्गीय चंदन सखाराम पांडे फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. कुमार गटात ठाणे शहरने चुरशीच्या अंतिम फेरीत पुणे ग्रामीणचा 33-31 असा पराभव करीत स्वर्गीय प्रभाकर नागो पाटील फिरता चषक आपल्या नावे केला.
सांगलीवाडी (जि. सांगली) येथील चिंचबाग मैदानावर ही स्पर्धा पार पडली. कुमारीच्या अंतिम सामन्यात गतउपविजेत्या पुणे ग्रामीण संघाने गतविजेत्या पिंपरी-चिंचवडचा 32-25 असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. या विजयाने पुणे ग्रामीणने गतवर्षातील पराभवाची परतफेड केली. पुणे ग्रामीणने पूर्वार्धात पहिल्या चार मिनिटांतच लोण देत 9-1 अशी आघाडी घेतली. पिंपरी-चिंचवडने यातून सावरत लोणची परतफेड करीत ही आघाडी कमी केली. विश्रांतीला 18-13 अशी पुणे ग्रामीणकडे आघाडी होती. विश्रांतीनंतरदेखील सामन्यात चुरस पाहावयास मिळाली, मात्र पुणे ग्रामीणने आपल्या हातून आघाडी निसटून दिली नाही. शेवटी 7 गुणांनी पुणे ग्रामीणने सामना जिंकला. वैभवी जाधव, साक्षी रावडे यांच्या झंझावाती चढाया, त्यांना प्रतीक्षा लांडगे, सृष्टी मोरे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळेच हे शक्य झाले. पूजा तेलंग, रूपाली डोंगरे, भूमिका गोरे, वृषाली रोकडे यांचा खेळ पिंपरी-चिंचवडला विजयी करण्यात थोडा कमी पडला.
कुमार गटात ठाणे शहरने पुणे ग्रामीणचा कडवा प्रतिकार 33-31 असा मोडून काढत विजेतेपद पटकाविले. शेवटच्या क्षणापर्यंत उत्पंठा वाढविणाऱया या सामन्यात ठाणे संघाकडे पूर्वार्धात 24-10 अशी आघाडी होती. उत्तरार्धात पुण्याने विजयासाठी ठाण्याने चांगलेच झुंजविले. शेवटची पाच मिनिटे पुकरली तेव्हा 32-26 अशी ठाण्याकडे आघाडी होती. आफताब मन्सुरी, आदित्य पिलाने, रोहन टोपरे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाने ठाणे शहरने हा चषक उंचावला. प्रणव बांगर, साहिल माने, रोहन टोपारे यांनी उत्तरार्धात कडवी लढत देत आघाडी कमी केली, पण संघाला विजयी करण्यात ते अयशस्वी ठरले.
या अगोदर झालेल्या मुलींच्या उपांत्य सामन्यात पिंपरी- चिंचवडने अहिल्यानगरला 32-17 असे, तर पुणे ग्रामीणने ठाणे शहराला 36-26 असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. मुलांच्या सामन्यात पुणे ग्रामीणने सांगलीला 32-17 असे, तर ठाणे शहरने रायगडला 34-28 असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List