नववर्षात मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनात खांदेपालट; 12 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्ष उजाडताच प्रशासनात खांदेपालट सुरू केली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी 12 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मिलिंद म्हैसकर यांना महसूल, विकासचंद्र रस्तोगी यांना कृषी तर आठवडय़ापूर्वीच बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावर पाठवण्यात आलेले हर्षदीप कांबळे यांना पुन्हा बदलीने सामाजिक न्याय विभागात पाठवण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांत जवळपास 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पुन्हा महत्त्वाच्या विभागांमध्ये आणण्यास सुरुवात केली आहे. फडणवीसांच्या मर्जीतले समजले जाणारे मिलिंद म्हैसकर यांना महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव बनवण्यात आले आहे. तर त्या ठिकाणी असलेले बी. वेणुगोपाल रेड्डी यांची बदली उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे.
महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी करण्यात आली असून त्यांच्याकडे पर्यटन विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही राहणार आहे.
कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंघल यांची पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे तर शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांची बदली कामगार विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. रुसाचे प्रकल्प संचालक डॉ. निपुण विनायक यांची बदली आरोग्य विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे, तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना कृषी विभागाचे प्रधान सचिव तर हर्षदीप कांबळे यांना सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. एच. एस. सोनवणे यांना क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त बनवण्यात आले आहे.
पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत आलेले सुहास दिवसे यांना पदोन्नती
साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत आलेले पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची पदोन्नतीने बदली करून त्यांना भूमी अभिलेख विभागाचे जमाबंदी आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List