खाऊगल्ली – इत्ती सी हंसी, इत्ती सी खुशी
>> संजीव साबडे
काही वर्षांपूर्वी वडापावची खूपच क्रेझ होती. नंतर काही काळ रेस्टॉरंटबरोबर रेल्वे स्टेशन परिसर आणि अन्य ठिकाणीही पोहे, उपमा, शिरा आणि साबुदाणा खिचडी विकणारे स्त्राr-पुरुष दिसायचे. तेलकट वडा, समोसा खाण्याऐवजी कामावर निघालेले पुरुष व स्त्रिया ते खाताना दिसायच्या, पण आता लोक खाणं व प्रकृतीविषयी अधिक जागरूक होऊ लागले आहेत. ते हल्ली रस्त्यावर इडली, उत्तप्पा, डोसा खाताना दिसतात. सोबत सांबार आणि चटणी. याचं कारण इडली अगदी छोटी, साध्या स्वभावाची, पोटाला अजिबात त्रास न देणारी आहे. श्रेया घोषालच्या ‘इत्ती सी खुशी, इत्ती सी हंसी’ गाण्यासारखं ‘इडली की खुशी… इडली का तुकडा चांद सा’ म्हणावंसं वाटतं.
सकाळी घराजवळच्या चौकापाशी एक मद्रासी अण्णा छोटासा स्टॉल लावून उभा असतो. पातेल्यात असंख्य इडल्या आणि दोन डब्यात वेगवेगळ्या चटण्या व एका डब्यात गरमागरम सांबार. साडेसात वाजण्याच्या सुमारास तिथं झुंबड उडते. किमान 30/35 जण तिथं इडली खात असतात आणि चार-पाच जण इडली व सांबारचं पार्सल न्यायला उभे असतात. हे दृश्य साडेदहापर्यंत कायम असतं. आणलेलं संपलं की तो निघून जातो. त्याच्याकडे उत्तप्पा, मेदूवडा, डाळवडाही असतो, पण पहिली पसंती इडलीला.
तिथून एका मिनिटावर दुसरा एक मद्रासी अण्णा उभा. त्याच्याकडेही अशीच गर्दी. दुसऱया रस्त्यावर सकाळी फिरायला गेलं की तीन दोन गाडय़ांवर खूप म्हणजे खूपच लोक इडली खाताना दिसतात. याशिवाय एक अण्णा साडेसात वाजता डोक्यावर इडली, चटणी व सांबर ठेवलेलं मोठं पातेलं घेऊन चालताना हॉर्न वाजवत राहतो. त्याला बोलावून बरेच जण इडली विकत घेतात. सांबार फार उत्तम नसलं तरी चटणी, इडली छान असते. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
इडली खाणाऱ्यांच्या संख्येत खूप वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावर विकणाऱ्यांकडेच नव्हे, तर रेस्टॉरंटमध्येही. बहुधा त्यामुळे इडली ही खासियत असलेली अनेक रेस्टॉरंट मुंबई, ठाण्यात आणि इतर शहरांमध्येही नव्याने सुरू झाली आहेत. पूर्वीच्या रेस्टॉरंट्समध्ये इडलीचे वेगवेगळे प्रकार मिळू लागले आहेत. पूर्वी इडलीच्या पिठाचाच अप्पम किंवा पणियारम हा प्रकार मुंबईत क्वचित मिळत असे. आता त्यानंही मेन्यूकार्डवर आपलं स्थान नक्की केलं आहे. रात्री बारानंतर सायकलवर इडलीचं पातेलं घेऊन उभे असलेले लोकही काही ठिकाणी दिसतात. तेलकट व मसाला नसलेल्या इडलीकडे खूप लोक वळू लागल्यामुळेच इडलीच्या नावाची अनेक रेस्टॉरंटही आता सुरू झाली आहेत.
गोरेगाव पूर्वेला गोकुळधाममध्ये इडलीश कॅफे नावाचं रेस्टॉरंट आहे. तिथं नेहमीची साधी इडली, कांचिपुरम इडली, रवा इडली, मिनी इडली, ज्वारीची तसंच नाचणीची इडली, मसाला इडली आणि एक कॉन्टिनेंटल इडली असं सारं आहे. शिवाय इडियप्पाम, शेवयांचा उपमा हे प्रकार आहेत. याशिवाय उडपी व दक्षिणी रेस्टॉरंटमधील डोसा, उत्तप्पा, मेदूवडा आणि इतर पदार्थही आहेत. अंधेरी पूर्वेला जे. बी. नगर व चांदिवली-पवई भागातही इडलीश कॅफे आहे. सर्व खाद्यपदार्थांचा उत्तम दर्जा आणि तुलनेने कमी दर यामुळे लोकांना हे आवडलेलं दिसतं. लोअर परळच्या धुरुवाडीमध्ये जेएम इडली कॅफे नावाचं ठिकाण आहे. तिथली कारापुडी म्हणजे मसाला इडली अतिशय मस्त. त्यासोबतच सांबार व चटणीही छान.
अंधेरी पश्चिमेला डी. एन. नगर भागातील ‘इडली बाय किलो’ लोकप्रिय आहे. घरी अनेक पाहुणे आले व येणार असतील तर तिथून किलोच्या भावात इडल्या, सांबार व चटणी मिळते. अंधेरीतच तिथून जवळ असलेल्या मनीष नगरमध्ये मिस्टर इडलीकडे मिळणारी मिनी व मसाला इडली छान आहे. मिस्टर कॅफे गोरेगाव-मालाडच्या मध्ये एसव्ही रोडवर सुंदर नगर परिसरातही आहे. सांताक्रूझ पूर्वेच्या प्रभात कॉलनी भागात असलेली बालाजी इडलीही स्वस्त व मस्त. विलेपार्ले पूर्वेला विमानतळ रस्त्यावर (बामणपुरी, नवपाडा) ‘इडली’ नावाचं असलेलं ठिकाणही लोकप्रिय झालं आहे. तिथं साधी व थट्टे इडली, मिनी इडली आणि मुंबईत फार न मिळणारा दावणगिरी डोसा हे प्रकार आहेत.
दादरला असाल तर तिथं न. चिं. केळकर मार्गावर मिस्टर इडली आहे. तिथली इडली अतिशय मऊ व खुसखुशीत. मसाला, मिनी, थट्टे अशा सर्व प्रकारच्या इडल्या तिथं मिळतात. माटुंगा पूर्वेला असलेलं अय्यप्पन इडली हे ठिकाणही खूपच मस्त. दक्षिण भारतीय लोकांच्या अड्डय़ातच ते असल्यानं सर्व पदार्थ ऑथेंटिक असतात तिथं. शिवाय सर्वज्ञात असलेली मणिज, डीपीज, रामाश्रय, मद्रास कॅफे, म्हैसूर कॅफे ही जुनी व अत्यंत लोकप्रिय ठिकाणं याच परिसरात आहेत. मात्र श्रीकृष्णवाल्या रामा नायक यांचं इडली हाऊस विसरून चालणार नाही. तेथील इडलीचे सर्वच प्रकार खूप छान आहेत, पण वेगळा प्रकार म्हणून फणस इडली, म्हैसूर रवा इडली, काळी मिरी इडली या खास पदार्थांचा एकदा तरी न विसरता स्वाद घ्यावा. या तीन प्रकारच्या इडली मुंबईत फारशा मिळत नाहीत. वडाळ्यापासून कुर्ला, चेंबूर, सानपाडा, कामोठे, ऐरोली, सीवूड, उलवे, ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर आणि अगदी पुण्यात बऱयाच ठिकाणी नादब्रह्म इडलीची रेस्टॉरंट्स व स्टॉल दिसू लागले आहेत. ही इडलीची चेनच. ठाण्यात जकात नका भागात स्वामीज इडली हे ठिकाण मस्त आणि विक्रोळीत असाल तर सावरकर मार्गावरील इडली करी कंपनीत अवश्य जावं.
हल्ली अनेक घरांत इडली बनते. त्याचं वाटलेलं पिठ तयार मिळतं. सांबार, चटण्या करणंही अवघड राहिलेलं नाही. तरीही इतके सारे लोक रोज बाहेर इडली खातात. याचं कारण ती अगदी छोटी, साध्या स्वभावाची, पोटाला अजिबात त्रास न देणारी आहे. श्रेया घोषालच्या ‘इत्ती सी खुशी, इत्ती सी हंसी’ गाण्यासारखं ‘इडली की खुशी… इडली का तुकडा चांद सा’ म्हणावंसं वाटतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List