कथा एका चवीची – ‘लोकप्रिय’ खवय्येगिरी

कथा एका चवीची – ‘लोकप्रिय’ खवय्येगिरी

>> रश्मी वारंग

नववर्षात पाऊल टाकताना मागच्या वर्षात काय घडून गेलं हे पाहणं स्वाभाविक मानवी वृत्ती आहे. गतवर्षीची खवय्येगिरी पाहताना कोणते पदार्थ सगळ्यात जास्त चवीने खाल्ले गेले याची उत्सुकता आपल्यालादेखील असेल. मागच्या वर्षीच्या सर्वोत्तम तीन पदार्थांच्या लोकप्रियतेची ही चटकदार गोष्ट.

एक काळ असा होता जिथे लोकांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवणे ही नियमबाह्य गोष्ट वाटायची. हॉटेलमध्ये खाणे म्हणजे काहीतरी दुय्यम किंवा निषिद्ध अशी संकल्पना असण्याचा तो काळ होता. तिथपासून ते आतापर्यंतचा खवय्येगिरीचा प्रवास शब्दश ‘रोचक’ झालेला दिसतो. हॉटेलिंग ही संकल्पना नवी राहिलेली नाही. या संकल्पनेसह घरबसल्या पदार्थ मागवणे ही नव्या काळाची गरज ठरलेली दिसते. अलीकडेच घरपोच पदार्थ पोहोचवणाऱया काही अॅप्सनी त्यांना प्राप्त झालेल्या ऑर्डरनुसार सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या पदार्थांची सूचीच जाहीर केली आणि सलग नवव्या वर्षी सर्वाधिक मागवल्या गेलेल्या पदार्थाचा मान प्राप्त करणारी बिर्याणी खाद्यसम्राज्ञी ठरली. जवळपास नऊ करोडहून अधिक लोकांनी वर्षभरामध्ये वेगवेगळ्या निमित्ताने बिर्याणी मागवली.

बिर्याणी हा पदार्थ मूळचा भारतीय नाही हे आपण जाणतोच. पर्शियन शब्द ‘बिर्याण’पासून बिर्याणी हा शब्द तयार झाला आहे. बिर्याण म्हणजे पदार्थ शिजवण्याआधी खरपूस भाजणे. बिर्याणीसाठी वापरला जाणारा तांदूळ आणि मांस एकेकाळी तुपात खरपूस भाजले जाई. मोगल काळामध्ये बिर्याणी हे सैनिकांचे खाणे होते. शहाजहांची पत्नी मुमताजमहल सैन्याची पाहणी करायला गेली असता तिला आपले सैनिक खूपच अशक्त वाटले. तिने खानसाम्याला पोटभरीचा आणि ताकद देणारा पदार्थ बनवायला सांगितले. त्या वेळी बिर्याणीसारखा ‘वन पॉट मिल’ ठरणारा पदार्थ सैनिकांना खायला घातला जाऊ लागला. या गोष्टीकडे पाहिल्यानंतर आजही बिर्याणी लोकप्रिय का याचे उत्तर मिळते.

अनेक घरगुती समारंभांमध्ये किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये एकाच वेळी पोट भरणारा, खिशाला परवडणारा, चविष्ट, सगळ्यांच्या पुरवठय़ाला येणारा आणि फारसा जामानिमा न लागणारा हा पदार्थ लोकप्रिय ठरला नसता तर नवलच. एकच एक बिर्याणी आहे म्हटल्यानंतर अन्य पदार्थांची आवश्यकताही भासत नाही. याच कारणाने गेली नऊ वर्षे सतत सर्वाधिक मागवला गेलेल्या पदार्थाचा बहुमान बिर्याणीला मिळालेला दिसतो.

बिर्याणीनंतर सर्वाधिक जास्त मागवला गेलेला पदार्थ म्हणजे पिझ्झा! पिझ्झाच्या बाबतीतसुद्धा पोटभरीचा एकच एक पदार्थ हा गुण महत्त्वाचा आहे. तयारीचा फारसा गोंधळ नसणे आणि खासम्खास चवीसह क्षुधाशांती हे वैशिष्टय़ महत्त्वाचे ठरल्यामुळेच की काय पण सर्वाधिक मागवल्या गेलेल्या भारतीय पदार्थांमध्ये अभारतीय असलेल्या पिझ्झाचा दुसरा क्रमांक लागतो.

आज पिझ्झा फॅशनेबल खाणे असले तरीही कोणी एकेकाळी पिझ्झा गरीबांच्या खिशाला परवडणारे, कष्टकरी वर्गासाठी तयार झालेले खाणे होते. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात पर्शियन सैनिक फ्लॅट ब्रेडवर चीज आणि खजूर पसरवून खात असा उल्लेख आढळतो. तेच आजच्या पिझ्झ्याचे मूळ होय. सैनिकांना खाण्यापिण्याचे पदार्थ बनवण्यासाठी फारसा वेळ हाती नसायचा त्यामुळे झटपट तयार होणारा पोटभरीचा स्वस्त पदार्थ म्हणून पिझ्झा बनवला जाऊ लागला आणि आता तो पुन्हा लोकप्रिय ठरलेला दिसतो.

सर्वाधिक मागवल्या गेलेल्या पदार्थांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला अस्सल भारतीय डोसा. दक्षिणात्य डोसा भारतातल्या सगळ्याच प्रांतांमध्ये चवीने खाल्ला जातो. मऊ आणि थोडासा जाड तामीळ डोसाई असो किंवा कर्नाटकातला पातळ आणि कुरकुरीत डोसा, नाश्त्यासाठी याहून अन्य आदर्श पदार्थ नसावा. एकाच वेळी पोट भरणारा तरीही खाल्ल्याने फारसे जडत्व न आणणारा, खिशाला परवडणारा डोसा सर्वाधिक मागवलेल्या पदार्थांच्या यादीत तिसऱया क्रमांकावर यासाठीच मिरवतो.

या वर्गवारीच्या पल्याड असे अनेक पदार्थ आहेत जे कदाचित ऑनलाइन मागणीमध्ये मागे असतील, पण रोजच्या जीवनात त्यांची लोकप्रियता विलक्षण आहे. घरबसल्या मागवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये वडापावचा जरी उल्लेख नसला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभ्या असणा्ऱ्या गाडय़ांवर विकला जाणारा वडापाव किंवा सकाळच्या नाश्त्याची सोय करणारे पोहे, मिसळपाव हेदेखील लोकप्रियतेत अव्वलच आहेत.

पदार्थांच्या या स्पर्धेपलीकडे येणाऱ्या वर्षात ठरलेल्या चाकोरीबद्ध पदार्थांच्या पलीकडे जिभेला नवनव्या पदार्थांची चव चाखता यावी हीच नव्या वर्षाकडून अपेक्षा ठेवू या आणि मनसोक्त खवय्येगिरी करू या.

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List