मंथन – उदारमतवादी धोरण आणि मध्यमवर्ग

मंथन – उदारमतवादी धोरण आणि मध्यमवर्ग

>> सुजय शास्त्री

माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्यकाळातील उदारीकरणाच्या पहिल्या दशकात मध्यमवर्गाचे समाजजीवन बदलले. बाजारचलित अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संधी या नव मध्यमवर्गासाठी महत्त्वाच्या होत्या. ज्यामुळे त्याचा आर्थिक कणा ताठ झाला. वैचारिक दृष्टी बदलली. ज्याचे प्रतिबिंब सिनेमा, नाटक क्रीडा आणि एकंदर समाजमनावर दिसायला लागले. उदारीकरणाचा निर्णायक वळण देण्यात मनमोहन सिंग यांचा सहभाग महत्त्वाचा होता.

2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या हाती पंतप्रधानपदाची सूत्रे दिली असली आणि सोनियांच्या राजकीय चाणाक्षपणाने सरकारपुढे राजकीय संकटे उभी राहिली नसली तरी डॉ. सिंग यांच्यापुढे जनतेच्या प्रचंड अपेक्षांचे आव्हान होते. या देशात औद्योगिक क्रांती घडली नसली तरी उदारीकरणाच्या पहिल्या दशकानंतर त्याचे व्यापक परिणाम देशात दिसू लागले होते. त्याचे कारण अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. देशातील ग्रामीण भागाचे रुपडे बदलले होते. गावांची नगरे झाली होती. नगरांची शहरे झाली होती. शहरांची महाकाय महानगरे होण्यास सुरुवात झाली होती.

आाक्टोबर 2003 च्या गोल्डमन सॅक्सच्या ब्रिक्स अहवालात ब्राझील, रशिया आणि चीननंतर जगात भारत एक महासत्ता म्हणून लवकरच उदयास येईल असे भाकीत करण्यात आले होते. ‘मार्केट’ ही संकल्पना देशात मूळ धरू लागली होती. या संकल्पनेत राज्याच्या अधिकारांना दुय्यमत्व देण्यात येऊन खासगी गुंतवणूक, नफा यांना अतिरिक्त महत्त्व प्राप्त झाले होते. देशात एक मोठा ग्राहक वर्ग जन्मास आला होता, ज्याच्या जीवनशैलीमध्ये केवळ 10 वर्षांच्या उदारीकरण धोरणामुळे आमूलाग्र बदल झाला होता. 1991 ते 2001 या कालावधीत मारुती कार ब्रँडची मत्तेदारी संपून होंडासारख्या परकीय कार कंपन्या देशात आल्या होत्या. मध्यमवर्गाचे कार घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले होते. मोटरसायकली गावोगावी सायकलींसारख्या विकल्या जात होत्या. मोबाइल ग्राहक उदारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फारसे वाढले नव्हते, पण श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्ग या सेवांचा लाभ घेऊ लागला होता. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हींचा जमाना जाऊन रंगीत टीव्हीच विक्रीसाठी दिसत होते. झी टीव्ही, सोनी टीव्हीच्या आगमनाने खासगी उपग्रह वाहिन्यांचा एक नवा उद्योग देशात रुजू लागला होता. कनिष्ठ मध्यमवर्ग आता उच्च मध्यमवर्गाकडे वाटचाल करत होता, तर आयटी उद्योगाच्या भरारीमुळे एक नवमध्यमवर्ग जन्माला येत होता.

‘खातेपिते घर’ अशी मध्यमवर्गातील सधन कुटुंबाची केली जाणारी संभावना आता लोप पावत होती. कष्ट करा, भरपूर शिका, काम्प्युटरचे मिळेल ते कोर्स करा असे मध्यमवर्गातले वातावरण होते. डॉक्टर, इंजिनीअर एवढय़ाच करीअरच्या मर्यादित वाटा न राहता बँका, विमा कंपन्या, वित्तीय संस्था, विदेशी कंपन्यांत रोजगार मिळावा म्हणून एमबीएची लाट आली. इंडियन इन्स्टिटय़ूट आँफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेणे ही जीवघेणी स्पर्धा झाली होती. अनेक शिक्षण संस्था उदयास आल्याने शिक्षणाचा वेग वाढू लागला होता. गृह बांधणी, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनीअरिंग, आरोग्य, वाहतूक, दळणवळण या क्षेत्रांचा विस्तार होऊ लागला होता.

हिंदी सिनेमाही या काळात वेगाने कात टाकू लागला होता. शाहरुख खानचा उदय हा उदारीकरणाचा एक भाग आहे. छोटय़ा गावातून शहरात नोकरीसाठी आलेला, साधे, तोडकेमोडके इंग्रजी येत असलेला तरुण केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर एका खासगी कंपनीमध्ये मोठा अधिकार होतो ही ‘राजू बन गया जंटलमन’ची कथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायक होती. तरुण पिढीतला व्यवस्थेविरोधातील संतापाची जागा आता करीअरने घेतली होती. सलमान, आमीर खान पुढे ऋतिक रोशनसारखे अभिनेते व्यवस्था परिवर्तन, गुंडांचे निर्दालन किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधात नव्हे, तर मध्यमवर्गींयांच्या जाणिवा, त्यांचे मनोरंजन आणि त्यांच्या भावविश्वाशी तादात्म्य साधणारे चित्रपट करत होते. सूरज बडजात्या, करण जोहर, आदित्य चोप्रा या नव्या चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी हिंदी चित्रपटसृष्टीचे नेपथ्यच पुरते बदलून टाकले. पैसे असलेला नायक हा आता व्हिलन नव्हे, तर तो हीरो समजला जाऊ लागला.

उदारीकरण मूलत भारतामध्ये दडलेल्या सुप्त क्षमतांसाठी सेफ्टी व्हॉल्व्ह होता. ज्ञान, कौशल्य, मेहनत यांची या देशात काहीच कदर होत नाही असा विचार करणाऱया हजारो-लाखो तरुणांना, त्यांच्या आई-वडिलांना हा सुखद धक्का होता. करीअर केवळ अमेरिकेत होऊ शकते असा समज असणाऱया पांढरपेशा समाजाला ती चपराक होती. त्यामुळे केवळ उदारीकरणाच्या निर्णयामुळे मध्यमवर्गामध्ये स्वतच्या सामर्थ्याबद्दल आत्मविश्वास वाढला. छोटे-मोठे उद्योजक, कारखानदार, शेतकरी यांच्या कौशल्याला बळ मिळाले. ज्या इंग्रजी भाषेबद्दल पिढय़ान्पिढय़ा न्यूनगंड होता ती भाषा सहजपणे तळागाळापर्यंत, सामाजिक जीवनात मुरू लागली, आपलीशी होऊ लागली. काम्प्युटर- इंटरनेट तंत्रज्ञानाला या समाजाने आपलंसं केलं.

अशा उदारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सचिन तेंडुलकर नावाचे रसायन जन्माला आले… पाच फूट पाच इंच उंची, कुरळे केस, चिरका आवाज, शांत डोळे, पण मनात दिग्विजय करण्याची महत्त्वाकांक्षा. तेंडुलकर हा व्हायब्रंट इंडियाचा धगधगता आविष्कार होता. ते जगाला जिंकण्याचे भारतीय मध्यमवर्गीयाचे स्वप्न होते. त्यामुळे जेव्हा सचिन 24 वर्षे क्रिकेटमध्ये रोज एक नवा विश्वविक्रम रचत गेला तसे कोटय़वधी भारतीयांना आपली स्वप्ने पुरी झाल्यासारखे वाटू लागले होते. जगात आपणही कोणी एक बलाढय़ देश आहोत अशी भावना निर्माण होऊ लागली.

म्हटले तर हा बदल अविश्वसनीय, आश्चर्यकारक होता. जी मुले काम्प्युटर शिकण्यासाठी अमेरिकेत जात होती, तीच मुले काम्प्युटरचे आधुनिक तंत्रज्ञान शिकून आयटीमध्ये अमेरिकेत-युरोपीय कॉपोर्रेट कंपन्यांच्या बडय़ा पदांवर आरूढ झाली. देशात कोकाकोला, पेप्सी, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट अशा जायंट कंपन्या गुंतवणुकीसाठी येऊ लागल्या. हा बदलता भारत निश्चितच नव्या आशा, अपेक्षा-आकांक्षा घेऊन आला होता. या नव्या वर्गाकडून राजकीय विचारसरणीशी बांधीलकीची अपेक्षाही करण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण बाजारचलित अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संधी या नवमध्यमवर्गासाठी महत्त्वाच्या होत्या. हा वर्ग स्वतच्या पूर्वीच्या जीवनमूल्यांना कवटाळणारा नव्हता. त्याला समृद्धीची, आरामशीर जगण्याची हौस होती.

भारतीय समाजाची एकंदरीत मानसिकता उदारीकरणाच्या पहिल्या दहा वर्षांत कमालीची बदलली होती. एकेकाळी या देशाला गौरवशाली इतिहास आहे म्हणून चर्चा केली जात असे. त्या चर्चेचा आशय किंवा नूर बदलत जाऊन या देशाचे भविष्य उज्ज्वल आहे अशी केली जाऊ लागली. एकेकाळी या देशात संधीची कमतरता आहे, या चर्चा बदलत जाऊन या देशात आता अमाप संधी आहेत, परदेशी शिकण्यासाठी जाण्याची काही गरज नाही, अशा स्वरूपाच्या झाल्या. पूर्वीपासून हा देश मंत्र-तंत्र चमत्कारांचा, सापांचा देश आहे असे बोलले जात होते, तो देश एक बडी फॅशन इंडस्ट्री आहे असे विदेशी वृत्तपत्रांतून लिहिले जाऊ लागले. भारत हा परंपरागत वस्तूंचा देश आहे असे हिणवले जात होते, तो देश जगाला सॉफ्टवेअर पुरवणाऱया तंत्रज्ञानाचा देश आहे असे बिरूद लावले जाऊ लागले. जो सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा दुबळा वर्ग शतकानुशतके दुर्लक्षिला गेलेला होता, तो नव्या बाजारपेठेचा ग्राहक बनला. पण भारतातला नागरीकरणाच्या प्रक्रियेतून निर्माण होणारा मध्यमवर्ग हा ग्रामीण प्रदेशाशी आपली नाळ तोडू पाहत होता हे स्पष्ट दिसत होते. 70-80च्या दशकात ग्रामीण भागातून शहरात आलेल्या पिढीची पुढची पिढी शहरात जन्मास आल्याने मध्यमवर्गाचे विभिन्न स्तर तयार होऊ लागले. ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृती असा भेद खुद्द मध्यमवर्ग करू लागला.

19 व्या शतकात व पुढे 20 व्या शतकाच्या सुरुवातीस-मध्यास स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारा मध्यमवर्ग हा त्याच्या आर्थिक स्थितीवर ओळखला जात नव्हता, तर हा वर्ग साहित्य-वर्तमानपत्रे, नियतकालिके-मासिके वाचणारा, सुधारणावादी-पुरोगामी भूमिका मांडणारा, गरीब-पददलितांच्या अधिकार-हक्कांसाठी रस्त्यावर उतरणारा म्हणून ओळखला जात होता. या वर्गाची सांपत्तिक स्थिती अतिशय वाईट होती, पण हा वर्ग शैक्षणिक प्रगतीवर ओळखला जात होता. हे चित्र 20 व्या शतकातल्या अखेरच्या दशकानंतर साफ पुसले गेले. मध्यमवर्ग- नवमध्यमवर्ग- उच्च मध्यमवर्ग- कनिष्ठ मध्यमवर्ग हे उदारीकरणाच्या 20 वर्षांच्या टप्प्यात निर्माण होत गेले. या वर्गाच्या राजकीय अपेक्षा-आकांक्षा सुरुवातीला फारशा आक्रमक नव्हत्या, पण जेव्हा नागरीकरणाचे प्रश्न गंभीर होऊ लागले. सरकारी सेवांमधील ढिसाळपणा, भ्रष्टाचार, खाबूगिरी वाढू लागली तसा हा वर्ग आपल्या हक्कांविषयी जागा होऊ लागला.

पण हा उद्रेक खरोखरीच होता की तो पसरावा म्हणून त्यामागे कटकारस्थानाचे राजकारण होते? हा संताप संसदीय लोकशाही व्यवस्था उखडून काढण्यासाठी होता की तो देशातील सर्व समस्यांना केवळ राजकारणी व्यक्ती असतात असा प्रचार करणारा होता? ही दुसऱया स्वातंत्र्यासाठीची (?) चळवळ होती की गांधी-नेहरू घराण्याच्या वारशाला कायमची तिलांजली देणारे हे विद्वेषी-विखारी राजकारण होते? हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर टय़ुनिशिया, इजिप्तमधील अरब स्प्रिंगची प्रतिक्रिया होती की सोशल मीडियाला हाताशी धरून तयार केलेले आभासी वादळ होते? हे आंदोलन केवळ डॉ. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांची प्रतिमा मलीन करणारे होते की या आंदोलनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचा फॅसिझम देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात आणण्याची चाल होती? या आंदोलनाच्या माध्यमातून मध्यमवर्गाच्या हातात राजकीय सूत्रे देऊन डॉ. मनमोहन सिंग यांच्या 40 वर्षांच्या देदीप्यमान कारकीर्द पुसण्याचा हा खुनशी कट होता की भारताच्या आर्थिक घोडदौडीला लगाम घालण्यासाठीचे हे भयंकर प्रयत्न होते? डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी मध्यमवर्गात कायमचा कृतघ्नपणा पेरण्याचे हे प्रयत्न होते की अप्रत्यक्षपणे गांधी घराण्याविषयी व काँग्रेसविषयी देशभर द्वेष व चीड पसरविण्याचे भाजप-संघ परिवार-मीडियाचे ते राजकारण होते? या प्रश्नांची उकल हळूहळू बदलत्या राजकीय वातावरणातून होऊ लागली.

[email protected]
(‘डॉ. मनमोहन सिंग- एक वादळी पर्व’- ग्रंथाली प्रकाशन या पुस्तकातून साभार.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List