रवींद्र चव्हाण तूर्तास कार्यकारी अध्यक्षच, प्रदेश अध्यक्षपद हुकले
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारी अध्यक्षपदी माजी मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले नेते रवींद्र चव्हाण यांची आज नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यामुळे ‘एक व्यक्ती एक पद’ या निकषानुसार प्रदेशाध्यक्ष पद रिक्त होत आहे त्या अनुषंगाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र रवींद्र चव्हाण यांची थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती न करता कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही रचना तूर्तास असून यथावकाश ते प्रदेशाध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना बदलून नव्या चेहऱयाला संधी देण्याची चर्चा सुरू होती. त्या अनुषंगाने काही नावे चर्चेत होती, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असणारे नेते रवींद्र चव्हाण यांच्या नावावरती केंद्रीय नेतृत्वाने आज शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आगामी काळात पक्ष संघटनेची जबाबदारी चव्हाण हे एकहाती सांभाळतील हे स्पष्ट झाले आहे. भाजपाअंतर्गत राजकारणामध्ये रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आता सरकार आणि पक्ष संघटनेमध्ये फडणवीस यांचाच बोलबाला आहे हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List