संस्कृती-सोहळा -मार्लेश्वरचा विवाह!

संस्कृती-सोहळा -मार्लेश्वरचा विवाह!

>> जे. डी. पराडकर

देवाला हळद लागली, घाणा भरून झाला, हिंदू धर्मातील लिंगायत विवाहशास्त्रानुसार होणारे विवाहापूर्वीचे सर्व पारंपरिक विधी पार पडले की, साऱया भक्तगणांना प्रतीक्षा असते ती अपूर्व निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात वसलेल्या श्री देव मार्लेश्वराच्या आणि साखरप्याच्या गिरीजादेवी या दोन देवतांच्या विवाहाची. देवतांचा हा कल्याण विधी सोहळा 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दुपारी संपन्न होणार आहे. यासाठी असंख्य शिवभक्त सह्याद्रीच्या कडेकपारीत आदल्या दिवसापासून दाखल होतात.

हिरवीगार वनराई, नीरव शांतता आणि मन प्रफुल्लित करणारा गारवा अशा निसर्गरम्य सान्निध्यात मार्लेश्वर यात्रोत्सवातील देवाच्या विवाहाचा महत्त्वाचा क्षण आता जवळ आला आहे. गेले काही दिवस ज्या क्षणाची भक्तगणांकडून आतुरतेने वाट पाहिली जात आहे, तो साक्षात परमेश्वराचा विवाह सोहळा 14 जानेवारी रोजी सह्यशिखरावर रंगणार आहे. 12 जानेवारीपासून सुरू झालेल्या मार्लेश्वर यात्रोत्सवातील श्री देव मार्लेश्वराच्या विवाहापूर्वीचे सर्व विधी आंगवली येथील मूळ मठात संपन्न होणार आहेत. हे विधी झाल्यावर मकर संक्रांतीतील हा विवाह सोहळा रंगणार आहे. आंगवली मठात सत्यनारायणाची पूजा संपन्न झाल्यावर पुजारी मठातील मार्लेश्वराचा टोप हलवून तो सुवासिनींकडे देतात. माता गंगेची मूर्तीही या वेळी मानकरी अणेरावांच्या मांडीवर ठेवत दोघांचेही घाणे भरण्याचा सोहळा पार पडतो. यानंतर देवाला आणि गंगामातेला हळद लागल्यावर त्यांना सुवासिनींनी शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर देवाचा टोप आणि गंगामातेची मूर्ती जागेवर ठेवली जाते. रात्री विवाहापूर्वेचे सर्व धार्मिक विधी झाल्यावर मध्यरात्री 12 वाजता यजमान वाडेश्वर, देवरुखची दिंडी, वांझोळेची कावड, लांजा वेरळमधून आलेल्या दिंडीसह शेकडो भाविकांना बरोबर घेत चर्मकार बंधूंच्या मशालीच्या साहाय्याने मार्लेश्वराच्या पालखीने शिखराकडे प्रस्थान केले जाते. या पालखीसोबत लांजा वेरवलीचे मराठे, पाटगावचे मठाधिपती, आंगवलीचे मानकरी अणेराव, पुजारी जंगम यांच्यासह वाडेश्वरासोबत आलेले मानकरी आणि भाविक यांचा समावेश असतो. नवरदेवाच्या पालखीत गंगामाता आणि मल्लिकार्जुन विराजमान असतात. रात्री उशिरा या पालख्या पवईजवळ आल्यानंतर साखरप्यातून गिरीजामातेची पालखी एकत्र आल्यावर सर्व पालख्या हर हर महादेवाची गजर करीत शिखराकडे प्रयाण करतात. यात्रोत्सवातील मुख्य दिवस म्हणजे मार्लेश्वर गिरीजा देवीचा विवाह सोहळा. कल्याण विधी सोहळा झाल्यावर सर्व पालख्यांचे शिखरावरच वास्तव्य असते.

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे 15 कि. मी.आणि आंगवली या गावापासून 11 कि. मी. अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी असलेले श्री मार्लेश्वर हे पवित्र व जागृत देवस्थान अत्यंत प्राचीन आहे. उंच उंच कडेकपारी पर्वतांमधूनच वाहणारी ‘बावनदी’ व त्यामध्ये बारमाही ओतणारा ‘धारेश्वर’ धबधबा. तसेच लतावेलींची सोबत आणि पक्ष्यांचे कुंजन प्रसन्नतेचे वरदान आहे.

श्री क्षेत्र मार्लेश्वर देवळाचा साडेतीन फुटी दरवाजा व गाभारा गुहा स्वरूपाचा असून तो सुरक्षित आहे. एका वेळी एकच व्यक्ती आत जाऊ शकते किंवा बाहेर येऊ शकते. गाभाऱ्यात मात्र 25 माणसे उभी राहू शकतात. ही गुहा पांडवकालीन असल्याचे जनमत आहे. गाभाऱयात शंकराची स्वयंभू पिंड आहे. सोबत पाण्याचे कुंड असून खोलवर गेलेली विवरं आहेत. या ठिकाणी विविध प्रकारचे साप व नाग मुक्तपणे संचार करताना दिसतात. मात्र ते कोणालाही इजा करत नाहीत.

कोकणवासीय चाकरमान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वरचा जत्रोत्सव असतो. 13 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2025 दरम्यान होणाऱया या जत्रोत्सवाला लाखो भाविक हजेरी लावतात. पूर्वी मारळ, आंगवली या गावांना फारसे कोणी ओळखत नव्हते, परंतु आज मारळ, आंगवली म्हणजे मार्लेश्वर व मार्लेश्वर म्हणजे आंगवली-मारळ होय. दरवर्षी मकर संक्रांतीला तेथे होणारा कल्याण विधी म्हणजेच मार्लेश्वर-गिरीजादेवीचा विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. मकर संक्रातीला पारंपरिक पद्धतीने मार्लेश्वर देवाचा विवाह संपन्न होणार आहे. या समारंभासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून लाखो भाविक आदल्या दिवशी सह्याद्रीच्या कडेकपारीत दाखल होतात. यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू झाली असून आंगवली येथील श्रीदेव मार्लेश्वर आणि कोंडगावची गिरजादेवी यांच्या विवाह सोहळ्यास विशेष महत्त्व असते व यास कल्याण विधी असे म्हणतात. सनई चौघडय़ाच्या सुरात पारंपरिक विधिवत मंगलमय वातावरणात शिवशंभोचा गजर करीत विवाह सोहळा पाहण्यासाठी प्रचंड जनसागर लोटतो. मानपान विडे भरणे, मुलगी दाखविणे, पसंती हळद लावणे, उतरणे, आंतरपाट मंगलाष्टके यांसारखे हिंदू धर्मात लग्नासाठी पारंपरिक विधी होतात तेवढे विधी या देवांच्या लग्न सोहळ्यात केले जातात.

महाराष्ट्राचं वैभव असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधील एका कडेकपारीतील एका शिखरावर भगवान शंकरांचे श्री मार्लेश्वर हे देवस्थान वसलेले आहे. वनश्रीने नटलेला सह्याद्री म्हणजेच निसर्गाचा आविष्कारच! श्री क्षेत्र मार्लेश्वर म्हणजे योग साधकास आध्यात्मिक साधनेसाठी एक उत्कृष्ट तपोवनच आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! आज रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रक कसं असणार? प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! आज रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रक कसं असणार?
Mumbai Local Mega Block News : आज रविवार असल्याने असंख्य मुंबईकर हे फिरण्यासाठी, शॉपिंगसाठी घराबाहेर पडतात. तुम्हीही आज असाच काही...
आवडत्या मालिकांमधील लाडक्या कलाकारांनी साजरा केला उत्सव मकरसंक्रांतीचा
न्यू इअर पार्टीतील आर्यन खानच्या मद्यपानाच्या व्हिडीओवर समीर वानखेडे स्पष्टच बोलले..
सुकेश चंद्रशेखरचे तुरुंगातून लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र, हजारो कोटी रुपयांचा टॅक्स भरण्याची दाखवली तयारी
कर्जतकरांच्या ताटात भेसळीची तूरडाळ; परप्रांतीय विक्रेत्यांना पकडले
सायबर गुन्हेगारीचे धागेदोरे थेट चीन आणि इंडोनेशियापर्यंत; 530 व्हर्च्युअल नंबर पुरवले, एअरटेलच्या दोन व्यवस्थापकांना अटक
विद्यार्थिंनीना शर्ट काढून फक्त ब्लेझरवर घरी पाठवले, झारखंडच्या मुख्याध्यापकाचे धक्कादायक कृत्य