उद्योगविश्व – चित्रांच्या ब्रशने खुलवला जाहिरातींचा रंग
>> अश्विन बापट
कधी कधी एखादी कला दुसऱ्या कलेचे बीज रोवते आणि मग तीच कला कारकीर्द घडवते. पुण्यातील विनीत कुबेरांच्या साकेत कम्युनिकेशन्सची वाटचाल हे याचेच उदाहरण आहे.
विनीत कुबेरांचा मूळ पिंड चित्रकाराचा. ब्रश आणि रंगांच्या दुनियेत ते रंगून जात. त्याच कलेने त्यांच्यात जाहिरातीच्या डिझायनिंगची रुजवात केली आणि जन्म झाला साकेत कम्युनिकेशन्सचा. चित्रकलेकडून जाहिरातीच्या क्षेत्रात भरारी घेतानाचा प्रवास विनीत कुबेरांकडून जाणून घेतला. तेव्हा ते म्हणाले, मला चित्रकलेची खूप आवड होती आणि आहे. अजूनही मोकळ्या वेळी मी रंग आणि ब्रशच्या जगात हरवून जातो. आज मागे वळून पाहताना मला तो काळ आठवतोय सत्तरच्या दशकातला. मी त्या काळात म्हणजे 72 ते 77 संघांचा प्रचारक म्हणून काम पाहत असतानाच आपण नोकरी न करता व्यवसायच करायचा हे मी ठाम ठरवले होते. मी 1978 ला मग पुण्यात आलो. सोबत माझा मित्र विश्वास देशपांडेही होता. तिथे एका वर्कशॉपमध्ये फर्निचर निर्मितीला आम्ही सुरुवात केली. थोडे पैसेही मिळू लागले, पण आमच्या दोघांचाही चरितार्थ चालवणे हे त्या पैशांत शक्य नव्हते. पुढे ओपेल इंडियाच्या प्रोजेक्टरवर आम्ही स्लाईड्स तयार करून विविध प्रॉडक्ट्सची जाहिरात केली. सुरुवातीच्या काळात पुण्यातील ग्राहक पेठ आणि दर्शन हॉटेल या दोन ठिकाणी ही जाहिरात दिसत असे. मग 1983 मध्ये मग पाटबंधारे विभागाच्या प्रदर्शन स्टालचे काम आम्हाला मिळाले. नागपूर, दिल्ली, मुंबई अशा विविध ठिकाणी ही प्रदर्शने आयोजित करण्यात आलेली, प्रत्येक स्टालला पहिले पारितोषिक मिळाले आणि आमचा खऱया अर्थाने या व्यवसायात टेकऑफ झाला. मी एक आर्टिस्ट आणि एक असिस्टंटच्या साथीने साधारण पस्तीस वर्षांपूर्वी सुरुवात केली. आज 28 कर्मचाऱयांच्या टीमसोबत साकेतची वाटचाल सुरू आहे. या प्रवासातल्या दोन अनुभवांनी माझ्यात मानसिक कणखरता मुरवली. 1985 साली नागपूर येथे पाटबंधारे विभागाचा देखणा स्टाल बनला होता आणि 10 दिवसांनंतर अचानक शार्टसर्किटने स्टाल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्या वेळी सरकारच्या अधिकाऱ्यांनी, संबंधित विभागाने आम्हाला सहकार्य केले. 1995 मध्ये बंगळुरूच्या एका रिअल इस्टेट कंपनीची जाहिरात आम्ही केली आणि त्या काळात 17 लाख रुपयांना टोपी घालून तो क्लाएंट पुणे ऑफिस बंद करून पसार झाला. सर्व वृत्तपत्रांना विनंती करून आम्ही वेळ मागून घेतला, बँकांना विनंती करून तो आर्थिक फटका निस्तरण्यात आम्ही दोन वर्षे मागे गेलो. हे दोन्ही अनुभव मला बरेच काही शिकवून गेलेत.
या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर जाहिरातीच्या कन्सेप्ट डिझायनिंगवर आमचा विशेष फोकस असतो. याशिवाय ब्रोशर्स, सोशल मीडिया मॅनेजमेंट हाही भाग आम्ही पाहत असतो. काही वेळा याकरिता आम्ही मॅनपॉवर आऊटसोर्स करतो. वृत्तपत्र जाहिरातींसोबतच आम्ही इव्हेंट्स करायलाही सुरुवात केली. पुण्यात प्राडक्टसाठी कलाकारांना माडेल म्हणून आणण्याची सुरुवात आम्ही केली म्हणायला हरकत नाही. रांका ज्वेलर्स, चंदूकाका सराफ यांसारख्या आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड्सचे प्रमोशन आम्ही केले आहे. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनसह अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत आम्ही जाहिराती केल्यात. याशिवाय अनेक बिल्डर्ससाठीही आम्ही जाहिरातींची जबाबदारी पार पाडलीय. बँक ऑफ महाराष्ट्र, जनता सहकारी बँकेसाठीही आम्ही काम केले आहे. सध्या ज्या पुणे मेट्रोची सगळीकडे चर्चा आहे, त्या पुणे मेट्रोचे जाहिरात डिझायनिंगही आम्ही करत आहोत.
याशिवाय ख्यातनाम गायक शंकर महादेवन यांचा ‘कटय़ार ते कजरा रे..’ हा खास म्युझिकल कॉन्सर्ट, सुप्रसिद्ध गायक महेश काळेचेही इव्हेंट्स आम्ही प्रमोट केले आहेत. त्यामुळे ब्रँड प्रमोशन, टूरिस्ट एक्झिबिशन, कलाकारांच्या कार्यक्रमाचे प्रमोशन, बँकांचे ब्रँडिंग असा आमचा विविधांगी संचार राहिला आहे. आता 18 ते 20 जानेवारी या तीन दिवसांत पिंपरी चिंचवडला आम्ही दिव्यांगांसाठी एक स्पेशल इव्हेंट करत आहोत. ‘पर्पल जल्लोष 2025’ या दिव्यांग महोत्सवात दृष्टीदोष, मूकबधिरांसह 21 प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्यांसाठी अनेक कार्यक्रम आहेत. त्याच्या प्रमोशनची संपूर्ण जबाबदारी आमच्यावर आहे.
व्यवसायाशिवाय सामाजिक भान जपण्याचाही प्रयत्न आम्ही करत असतो. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱया रिक्षावाल्या काकांचे संमेलन, मकर संक्रांतीला एक्स्प्रेस-वेवर वाहतुकीचे नियम सांगणारे भेटकार्ड देत तिळगूळ वाटप यांसारख्या उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List