गुलदस्ता – आगळ्या भेटीतली आपुलकी
>> अनिल हर्डीकर
सोनी टीव्ही चॅनेलवरच्या लोकप्रिय ‘सीआयडी’ मालिकेत ‘एसीपी’ची भूमिका करणारे शिवाजी साटम आणि पं. वसंतराव देशपांडे यांची भेट आणि नाटकातील प्रवेश हा काही योगायोग नव्हता. त्यांचा हा सहवास शिवाजी साटम यांना रंगभूमीवरील कलाकार म्हणून कायमची ओळख देऊन गेला. त्याचाच हा किस्सा.
शिवाजी साटम लहानपणापासून, म्हणजे गणेशोत्सवात सिनेमे जमिनीवर बसून बघायला लागल्यापासून ते कॉलेजमध्ये असताना दांडय़ा मारून सिनेमे पाहायचे. तशी नाटकेसुद्धा पाहायचे. नाटकाचे वेड लागलेले. त्यात शिवाजी मंदिरचे सदस्यत्व मिळाल्यावर दर महिन्याला एखाद् दुसरे नाटक पाहायचे. सदस्यांना तिकीट मिळत असे अवघ्या दोन किंवा तीन रुपयांत.
मराठी नाटके बघायचीच. मग ते गद्य असो वा संगीत…आणि एक दिवस ‘कटय़ार काळजात घुसली’ त्यांनी पाहिले मात्र. त्यांना नाटक तर आवडलेच, पण त्यातील मुख्य भूमिका करणाऱ्या पं. वसंतराव देशपांडे यांच्या तर ते प्रेमातच पडले. केवळ त्यांचा अभिनय आणि गाणे ऐकण्यासाठी ते नाटक त्यांनी बारा-चौदा वेळा तरी पाहिले.
साटम बँकेत नोकरीला लागले. त्यांचे नाटकाचे वेड वाढत होते. कॉलनीतल्या नाटकात-एकांकिकेत साटम यांना मित्रांनी आग्रह, जबरदस्ती केल्याने काम केले. साटम यांचे काम गणेशोत्सवाच्या उद्घाटनाला आलेल्या रंगभूमीवरील उमदे नायक बाळ धुरी यांना आवडले आणि त्यांनी त्यांच्याच एका चालू असलेल्या ‘संगीत वरदान’ या नाटकात दुसऱ्या एका कलाकाराची काही अडचण असल्याने ती भूमिका करशील का, असे विचारले. साटमना हा धक्का होता. त्यांनी नकार दिला. कारण ते व्यावसायिक नाटक होते. नवी नोकरी, रजेचे वांधे हे तर कारण होतेच, पण नाटकात सगळे दिग्गज कलाकार होते. डॉ. वसंतराव देशपांडे, सुमती टिकेकर, बाळ धुरी, मोहन कोठीवान असे. काही दिवस गेले आणि नंतर मित्रांनी आणि विशेष करून आईने आग्रह केल्याने साटम बाळ धुरींना भेटले. काम दोन-अडीच महिन्यानंतर होते. पण मग तेवढे सगळे दिवस साटम यांनी तालमी केल्या. लेखक, दिग्दर्शक, निर्माते विनायकराव सरस्वते होते. ते भारतमाता सिनेमाचे मॅनेजर. तालमी बराकीवजा घरात, भारतमाता सिनेमाच्या मागे, घरासमोरच्या अंगणात होत होत्या. चोख पाठांतर झालेले होते. त्यानंतर सगळ्या मोठय़ा कलाकारांसोबत तालीम झाली. अगदी व्यवस्थित.
सगळे खूश झाले आणि… एप्रिल महिन्यात साटम करत असलेल्या कामाचा पहिला प्रयोग लागला. स्थळ – रवींद्र नाट्य़ मंदिर, मुंबई. दुपारी चारचा शो. साटम या नाटकात दोन पात्रे रंगवणार होते. दुसऱया अंकात एक बदमाश जवाहिऱ्या, ज्याने वसंतरावांच्या पात्राला आयुष्यातून उठवून फकीर केले होते आणि तिसऱया अंकात सिंहासनाधिष्ठ रजपूत राजा.
दुसरा अंक… शेवटचा प्रवेश… साटमनी एंट्री घेतली. स्टेजवर बाळ धुरी, मोहन कोठीवान आणि स्टेजच्या दुसऱ्या टोकाला बुवा. साटमना पाहिल्यावर बुवांनी साटम करत असलेल्या पात्राचे नाव उच्चारले… ‘यासीन.’ साटम यांनी कटाक्ष टाकून शरमेने मान खाली घातली आणि प्रेक्षकांकडे वळले मात्र… तुडुंब भरलेला प्रेक्षक पाहिला आणि त्यांचे धाबे दणाणले, बोबडीच वळली. हातपाय थंडगार पडले, कापायला लागले आणि ते जवळ जवळ रडकुंडीला आले.कारण एवढा प्रेक्षक रंगमंचावरून कधी पाहिलाच नव्हता. त्यांना वाक्यच आठवेना. साटमांनी वळून बुवांकडे पाहिले. बुवा समजले, गडी पार कोलमडला आहे. त्यांनी तो सगळा प्रवेश सांभाळला. साटम एकही वाक्य बोलले नाहीत. मात्र त्यांना शेवटचा पडदा पडण्यापूर्वीचा शेर तेवढा आठवला, ‘मेरे जनाजे पे सारा जहाँ निकला, मगर वो न निकले, जिनके लिये मेरा जनाजा निकला…’
प्रयोगाचा पडदा पडल्यावर बाळ धुरी साटमना खूप रागावले. दोन-दोन महिने तालीम करून तू नाटकाची वाट लावलीस, माझे नाक कापलेस वगैरे. बाळ धुरींनी साटमना बुवांची माफी मागायला सांगितली. साटम बुवांच्या मेकअप रूममध्ये गेले.
बुवा आराम करत होते. साटमना पाहून हसले. म्हणाले, ‘काय सावंत (शिवाजी सावंत ‘मृत्युंजय’चे लेखक जे बुवांचे मित्र होते.) काय झालं? साटमनी मान्य केले की, ते एवढा प्रेक्षक वर्ग पाहून गोंधळले… सॉरी म्हणाले. तसे बुवा आणखी जोराने हसले. म्हणाले, ‘अरे बाळा, त्यात तुझा काहीही दोष नाही. अरे दोष त्या जागेचा आहे. जिथे तू उभा होतास. अरे, शे-पाचशे प्रयोग करूनसुद्धा आम्ही विसरतो तर दोष कुणाचा असेल? जागेचा! पुढच्या अंकातली नक्कल पाठ आहे ना?’
साटम यांनी होकारार्थी मान हलवली. त्या वेळी बाळ कोचरेकर जे व्यवस्थापक होते त्यांना बोलावून सांगितले, ‘हा गणपती मखरात बसला (म्हणजे राजा) की, तू क्रिप्ट घेऊन विंगेत जवळ उभा रहा. ह्याला काही लागलं तर बघ.’ प्रयोग व्यवस्थित पार पडला.
त्या दिवशी जर बुवांनी सांभाळून घेतले नसते, प्रेमाने समजूत काढली नसती, धीर दिला नसता तर साटमना कुणी नाटकात तरी घेतले असते का, असे आजही शिवाजी साटम यांना वाटते.
प्रत्यक्ष भेट होणे हे एक आणि एखाद्या माणसाचा असा उमदा स्वभाव समजल्यानंतर होणारी ‘भेट.’
तिचे महत्त्व काही वेगळेच नाही का!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List