विशेष- देव आणि स्टिफन हॉकिंग

विशेष- देव आणि स्टिफन हॉकिंग

>> जगदीश काबरे

स्टिफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक. अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. अशा स्थित्यंतरातही त्याने देवाची करुणा न भाकता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचना शास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालने उघडली.

स्टि फन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला, आइन्स्टाइनच्या पंक्तीला बसू शकेल असा माणूस. अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे व्हीलचेअरला खिळण्याची पाळी त्याच्यावर आली. या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होत जातो. शेवटची चाळिसेक वर्षे त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. म्हणजे, चालत्या बोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू अशा शारीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला. अशा स्थित्यंतरातही त्याने देवाची करुणा न भाकता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचना शास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालने उघडली.

हॉकिंग हा स्वतः एक विश्वरचना शास्त्रज्ञ (कॉस्मोलॉजिस्ट) होता. म्हणजे विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याची रचना काय आहे, या प्रश्नांचा अभ्यास करणारा. या अभ्यासासाठी प्रथम जुन्या ताऱयांचा आणि तारकासमूहांचा अभ्यास करावा लागतो. अवकाशात जितके खोलवर, दूरवर पाहावे तितके जुने तारे दिसतात. असे का होते? याचे कारण म्हणजे प्रकाशाला प्रवास करायला वेळ लागतो. आपल्या पृथ्वीत आणि सूर्यात जे अंतर आहे, ते कापायला सुमारे आठ मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला सूर्य दिसतो तो आठ मिनिटांपूर्वीचा. सगळ्यात जवळचा तारा सुमारे साडेचार प्रकाशवर्षे दूर आहे. म्हणजे त्याचा आपल्यापर्यंत पोहोचलेला प्रकाशकिरण हा तिथून साडेचार वर्षांपूर्वी निघालेला असतो. अवकाशाची व्याप्ती प्रचंड असल्यामुळे अब्जावधी प्रकाशवर्ष दूरचे तारे दिसतात. त्यामुळे जेवढे दूरचे तेवढे जुने!

1929 मध्ये या अभ्यासातून हबल नावाच्या शास्त्रज्ञाला हे लक्षात आले, की सर्वच तारका समूह एकमेकांपासून दूर जात आहेत. जर तारकासमूह सतत दूर जात असतील, तर याचा अर्थ काही काळापूर्वी ते जवळजवळ होते आणि अजून पुरेसे मागे गेले, तर ते सगळेच एका बिंदूत एकवटलेले होते, असा निष्कर्ष निघतो. याचा अर्थ आपले विश्व अनादी अनंत नसून एका क्षणी सुरू झाले! एका बिंदूपासून उगम होऊन गेल्या 13.8 अब्ज वर्षांत इतके महाकाय, प्रचंड झाले. याला ‘महास्फोटाचा सिद्धांत’ (बिग बँग थिअरी) म्हणतात. हे चित्र सामान्य माणसाचे डोके चक्रावून टाकते. कारण आपल्या डोळ्यांसमोर विश्वाची अनादी आणि अनंत अशी प्रतिमा ठसलेली असते.

विश्व निर्माण होण्याचा एक क्षण, एक बिंदू असेल तर साहजिकच प्रश्न पडतात, हे कोणी केले? याआधी तिथे काय होते? आपण इथे कसे आलो? यापुढे काय? हे विश्व असेच फुगत जाणार, की काही काळाने आकुंचन पावायला सुरुवात होत पुन्हा एका बिंदूत कोलमडणार? या प्रश्नांची हॉकिंगने उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे या विश्वाचा निर्माता देव आहे का? या प्रश्नाला इतरही उपप्रश्न चिकटलेले असतात. म्हणजे देवाची व्याख्या काय? देवाने हे विश्व निर्माण का केले? देव मनुष्याच्या दैनंदिन जीवनात दखल घेतो का?… वगैरे वगैरे. या प्रश्नांची उत्तरे देताना हॉकिंग म्हणतो, ‘देव आहे की नाही, यावर मला काही भाष्य करायचे नाही. हे विश्व विशिष्ट नियमांनुसार चालते. हे नियम अचल आहेत. ते कुठल्याही यंत्रणेमुळे बदलत नाहीत. कारण जे बदलू शकतात ते विज्ञानाचे मूलभूत नियम नसतात. त्यामुळे या अचल आणि सर्वांसाठी सारख्या असलेल्या भौतिकीच्या नियमांनाच देव म्हणायचे असेल तर म्हणता येईल.’ वर दिलेला ‘बिग बँग’चा संदर्भ देऊन हॉकिंग म्हणतो, ‘जेव्हा आपले विश्व सुरू झाले तेव्हा अवकाश आणि काळही सुरू झाला. त्यामुळे शून्य काळाच्या आधी कोणीतरी निर्माता असणेही शक्य नाही.’ हे स्पष्ट करण्यासाठी हॉकिंग उदाहरण देतो ते दक्षिण ध्रुवाचे. ‘तुम्ही दक्षिण ध्रुवावर पोहोचलात तर तिथून अजून दक्षिणेला काय असते? ध्रुवाच्या व्याख्येपोटीच तिथून दिशा सुरू होतात. तिथून दक्षिणेला काही नसते. तसेच ‘बिग बँगच्या क्षणाआधीचा क्षण’ असे काही नसतेच.’

यापुढचा प्रश्न येतो तो म्हणजे शून्यातून विश्व कसे निर्माण झाले? हॉकिंग म्हणतो की, विश्व बनवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतात. एक म्हणजे वस्तुमान- तारे ग्रह बनवण्यासाठी; दुसरे म्हणजे ऊर्जा-सूर्यामध्ये ही भरपूर भरलेली हवी आणि तिसरे म्हणजे अवकाश, हे सगळे नांदण्यासाठी. आइन्स्टाइनने आपल्या सुप्रसिद्ध E = mc² समीकरणानुसार ऊर्जा आणि वस्तुमान एकच आहेत हे दाखवून दिलेले आहे. याचा अर्थ, भरपूर ऊर्जा आणि अवकाश असेल तर आपल्याला नवीन सृष्टी बनवता येते. हे शून्यातून कसे निर्माण होते? उत्तर सोपे आहे. नवीन अवकाश निर्माण करताना ऊर्जा मुक्त होते! अवकाशात धन आणि ऋण प्रकारच्या ऊर्जा असतात. (ज्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा नसतात.) त्यामुळे अवकाश आणि ऊर्जा दोन्ही मोठय़ा प्रमाणावर तयार झाले तरी त्यांची गोळाबेरीज शून्यच होते. एखादा मातीचा ढीग तयार करायचा असेल, तर तो करण्यासाठी माती कुठून आणायची, हा प्रश्न उद्भवतो. मात्र एक ढीग आणि एक तेवढाच खड्डा यासाठी मातीची गरज पडत नाही.

हे समजण्यासाठी ब्लॅकहोलच्या बाबतीतील माहिती आपण पाहूयात. समजा एक घडय़ाळ हे ब्लॅकहोलच्या जवळ जवळ नेले तर काय होईल? जसजसे हे घडय़ाळ ब्लॅकहोलच्या जवळ जाईल तसतसे त्याचा वेग कमी कमी होत जाईल आणि ज्या वेळी ते घडय़ाळ ब्लॅकहोलमध्ये पूर्ण आत जाईल तेव्हा ते पूर्णपणे थांबलेले असेल. ब्लॅकहोलमध्ये असे का घडते, याचा ज्या वेळी अभ्यास करण्यात आला त्या वेळी शास्त्रज्ञाच्या लक्षात आले की, ब्लॅकहोलमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती ही अनंत (Infinite) असते आणि त्यामुळे ती त्या घडय़ाळाला थांबवते, म्हणजेच वेळेला नष्ट करते. त्या ब्लॅकहोलमधून प्रकाशकिरणे बाहेर जाऊ शकत नाहीत. आत गेलेली प्रकाशकिरणे ब्लॅकहोलच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर निघू शकत नाहीत. म्हणजेच प्रकाशकिरणे ब्लॅकहोलमध्ये गेल्यावर नष्ट होतात. अगदी असेच Big Bang च्या वेळेस घडले. त्यामुळे जे लोक मला खरेच का हे विश्व देवाने बनविले आहे, असे विचारतात तेव्हा हे विश्व देवाने बनविलेले नाही असे मी सांगतो. कारण वेळ, काळ, वस्तुमान ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळी निर्माण झाल्या त्याच क्षणी विश्वाची उत्पत्ती झाली. म्हणूनच आपण म्हणतो की “We Got Everything from nothing.”

‘बिग बँग’च्या वेळी विश्व जितके लहान होते तितक्या लहान पातळीवर अभ्यास करायचा झाला, तर आइन्स्टाइनच्या सामान्य सापेक्षतावादाची सांगड पुंजभौतिकीशी घालावी लागते. शून्यमय अवकाशात एकवटणाऱया वस्तुमानाचा आणि तिथे घडणाऱया घटनांचा अभ्यास करताना ‘सिंग्युलॅरिटी’ नावाची संकल्पना विचारात घ्यावी लागते. याचे कारण तिथली घनता अमर्याद वाढत जाते. अशा अनंताशी खेळत तिथली गणितं सोडवावी लागतात. हॉकिंगने कृष्णविवरांचा सखोल अभ्यास केला होता. कृष्णविवरांच्या केंद्रातही महाप्रचंड वस्तुमान एकवटलेले असल्यामुळे तिथेही सिंग्युलॅरिटी तयार होते. म्हणूनच तो म्हणतो, विश्वाची उत्पत्ती- काळ, वस्तुमान, ऊर्जा आणि अवकाश या सगळ्यांचीच सुरुवात ‘बिग बँग‘ने झाली. त्याचा निर्माता देव नक्कीच नाही… आहेत ते भौतिकशास्त्राचे अचल नियम. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य समजून घेण्यासाठी ईश्वराची आवश्यकता नाही. महास्फोट हा केवळ भौतिक विज्ञानाच्या नियमांचा परिणाम आहे. सापेक्षतावाद आणि पुंजवाद यांच्या आधारे विश्वाची निर्मिती कशी शून्यातून होऊ शकते हे समजून घेता येते.

डार्विनच्या सिद्धांतामुळे ईश्वराला जीवशास्त्राच्या परिघाबाहेर करण्यात आले. ईश्वर नाही असे जरी कोणी सिद्ध करू शकले नाही तरी विज्ञानामुळे ईश्वर नामक संकल्पना अनावश्यक बनते हेही तितकेच खरे. म्हणूनच विज्ञान हाच ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शेवटी त्या मार्गावरूनच आपल्याला विश्वाच्या नियमांचे परिपूर्ण ज्ञान मिळू शकेल, असे स्टिफन हॉकिंग यांना ठामपणे वाटत होते.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! आज रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रक कसं असणार? प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! आज रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रक कसं असणार?
Mumbai Local Mega Block News : आज रविवार असल्याने असंख्य मुंबईकर हे फिरण्यासाठी, शॉपिंगसाठी घराबाहेर पडतात. तुम्हीही आज असाच काही...
आवडत्या मालिकांमधील लाडक्या कलाकारांनी साजरा केला उत्सव मकरसंक्रांतीचा
न्यू इअर पार्टीतील आर्यन खानच्या मद्यपानाच्या व्हिडीओवर समीर वानखेडे स्पष्टच बोलले..
सुकेश चंद्रशेखरचे तुरुंगातून लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र, हजारो कोटी रुपयांचा टॅक्स भरण्याची दाखवली तयारी
कर्जतकरांच्या ताटात भेसळीची तूरडाळ; परप्रांतीय विक्रेत्यांना पकडले
सायबर गुन्हेगारीचे धागेदोरे थेट चीन आणि इंडोनेशियापर्यंत; 530 व्हर्च्युअल नंबर पुरवले, एअरटेलच्या दोन व्यवस्थापकांना अटक
विद्यार्थिंनीना शर्ट काढून फक्त ब्लेझरवर घरी पाठवले, झारखंडच्या मुख्याध्यापकाचे धक्कादायक कृत्य