मोबाईलच्या बॅटरीत बिघाड; दुरुस्तीस कंपनीचा नकार, ग्राहकाची तक्रार निवारण आयोगाकडे धाव, शाओमीला नोटीस
मोबाईलची बॅटरी बिघडल्यानंतर ती दुरुस्त करून देण्यास नकार देत थेट नवीन मोबाईल खरेदी करण्याचा सल्ला देणाऱया शाओमी पंपनीविरोधात कल्याण येथील रहिवाशाने दाद मागितली आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे याप्रकरणी कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीची दखल घेत आयोगाने शाओमी कंपनीला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
कल्याण येथे राहणारे बिनेश बालक्रिष्णन यांनी फ्लिपकार्टवरून 10 एप्रिल 2019 रोजी शाओमी कंपनीचा रेडमी नोट 7 प्रो हा मोबाईल मागवला होता. 17 नोव्हेंबर 2022 रोजी मोबाईलमध्ये बिघाड झाला. मोबाईलची बॅटरी वारंवार डिस्चार्ज होत असे. याबाबत त्यांनी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये धाव घेत बॅटरी बदलून देण्याची मागणी केली. कंपनीने त्यांना बॅटरी उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसऱया ठिकाणाहून बॅटरी उपलब्ध करून देण्याची विनंती कंपनीला केली, मात्र कंपनीने मोबाईल जुना झाल्याने त्याचे स्पेअरपार्टचे उत्पादन बंद झाल्याने नवीन मोबाईल विकत घ्यावा असे ग्राहकाला सांगितले. याविरोधात बिनेश यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अॅड. प्रशांत नायक यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. कंपनीने वेळेत मोबाईल दुरुस्त करून द्यावा, अन्यथा नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये द्यावेत अशी विनंती आयोगाकडे त्यांनी अर्जाद्वारे केली. आयोगाने या तक्रारीची दखल घेत शाओमी कंपनीला नोटीस बजावली व याप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List