“ती जिवंत होती, तिचा वाचवलं आलं असतं पण..”; प्रत्युषा बॅनर्जीच्या एक्स बॉयफ्रेंडचा धक्कादायक खुलासा
‘बालिका वधू’ ही वेगळ्या संकल्पनेची मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली होती. यामध्ये अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी प्रत्युषाने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं. 1 एप्रिल 2016 रोजी मुंबईतल्या राहत्या घरात ती मृतावस्थेत आढळली होती. प्रत्युषाने नैराश्यात येऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. याप्रकरणी तिचा कथिक बॉयफ्रेंड राहुल राज सिंहवर बरेच आरोप झाले होते. राहुलला तुरुंगातही जावं लागलं होतं. आता प्रत्युषाच्या निधनाच्या नऊ वर्षांनंतर राहुलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. “प्रत्युषा जिवंत होती, तिचा प्राण वाचवला जाऊ शकला असता”, असं त्याने म्हटलंय.
राहुलने असा दावा केलाय की प्रत्युषा त्यावेळी जिवंत होती. तिला रुग्णालयात नेलं तेव्हासुद्धा तिचा श्वासोच्छवास सुरू होता. मात्र रुग्णालयाच्या औपचारिकतेच्या नादात प्रत्युषाने आपला जीव गमावला. राहुल म्हणाला, “ती श्वास घेत होती. मात्र रुग्णालयातील औपचारिक गोष्टी आणि इतर प्रक्रियांना इतका वेळ लागला की तिला दाखल करायला सर्वसामान्य वेळेपेक्षाही अधिक वेळ लागला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.” या मुलाखतीत राहुलने प्रत्युषाची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीवरही काही आरोप केले.
“काम्या पंजाबीने प्रत्युषाकडून काही लाखो रुपयांची उधारी घेतली होती. तिनेच प्रत्युषाला दारुचं व्यसन लावलं होतं. काम्या
सतत पार्ट्या करायची सवय होती. त्या पार्ट्यांमध्ये ती मद्यपान करायची. प्रत्युषालाही तिने याचीच सवय लावली होती. पण या गोष्टींना जेव्हा मी विरोध केला, तेव्हा ते माझ्याविरोधात उभे राहिले. काम्याने सर्वांत आधी माझ्यावर खोटा आरोप केला की प्रत्युषाच्या मृत्यूला मी जबाबदार होतो. त्यानंतर विकास गुप्ता आणि सर्व मीडिया माझ्या मागे लागली”, असे आरोप राहुलने केले.
आर्थिक गोष्टींसाठी राहुलने प्रत्युषासोबत रिलेशनशिप ठेवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या आरोपांवर त्याने एका जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं, “मी कधीच तिच्याकडून एक पैसाही घेतला नव्हता. ती तिच्या आईवडिलांवर नाराज होती. कारण तेच तिचा सगळा पैसा खर्च करत होते, अशी तिची तक्रार होती. प्रत्युषाच्या नावाखाली तिच्या आईवडिलांनी बरंच कर्ज घेतलं होतं. ते कर्ज प्रत्युषा फेडत होती. तिला कर्जदात्यांकडून सतत फोनकॉल्स यायचे. जेव्हा या गोष्टी वाढल्या, तेव्हा प्रत्युषाच्या वडिलांनी घर सोडलं होतं.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List