हेल्मेटशिवाय चालल्याबद्दल 300 रुपयांचा दंड, तक्रार दाखल
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात, एका व्यक्तीनं चालताना हेल्मेट न घातल्याबद्दल त्याला 300 रुपये दंड ठोठावण्यात आला. नंतर त्या व्यक्तीनं पोलीस अधीक्षकाशी (एसपी) संपर्क साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
ही घटना पन्ना जिल्ह्यापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या अजयगड पोलीस स्टेशन परिसरात घडली. सुशील कुमार शुक्ला नावाच्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ते त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी जात असताना पोलिसांच्या वाहनानं त्यांना थांबवलं.
शुक्ला यांनी दावा केला की त्यांना जबरदस्तीने पोलिसांच्या गाडीत बसवलं गेलं आणि अजयगड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं, जिथे त्यांना काही काळासाठी ताब्यात घेण्यात आलं. जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी घरी परतायचं असल्याचं स्पष्ट केलं तेव्हा अधिकाऱ्यांनी जवळच उभ्या असलेल्या मोटारसायकलचा नोंदणी क्रमांक लिहून ठेवला आणि हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याबद्दल दंड ठोठावला.
या घटनेमुळे दु:खी झालेले शुक्ला यांनी पन्ना येथे जाऊन एसपींकडे तक्रार दाखल केली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
तक्रारीला उत्तर देताना, एसपींनी सांगितलं की प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि त्यांनी अजयगड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीओपी) राजीव सिंग भदौरिया यांच्याकडे तपास सोपवला आहे. एसपींनी असं देखील नमूद केलं की अद्याप प्राथमिक माहिती आपल्याकडे असून ती अपूर्ण आहे आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List