शेतकऱ्यांना झटका; ‘डीएपी’सह खते महागणार, नव्या वर्षापासून अंमलबजावणी
>> प्रकाश कांबळे
शेतमालाच्या उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागत असतानाच नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना झटका बसणार आहे. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना खतांचे दर वाढविण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. 1 जानेवारीपासून ‘डीएपी’, 10:26:26, 13:32:16 या खतांची गोणी सरासरी 250 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन वर्षापासून जादा दराने खतांची खरेदी करावी लागणार आहे.
शेतकरी दरवर्षी 105 ते 110 लाख टनांच्या आसपास ‘डीएपी’ विकत घेतात. मात्र, बहुतेक खत कंपन्यांना ‘डीएपी’ तयार करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. आंतरराष्ट्रीय खत बाजारात डीएपीच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून भडकल्या आहेत. परंतु, केंद्र शासनाने देशी खत कंपन्यांना डीएपीच्या किमती वाढविण्यास मान्यता दिलेली नाही. परिणामी, काही कंपन्या तोटा सहन करीत डीएपीचा पुरवठा करीत आहेत. उत्तर हिंदुस्थानातील शेतकरी नाराज होऊ नये म्हणून केंद्राने डीएपीच्या किंमत वाढीवर अंकुश ठेवला होता; परंतु आता राज्या-राज्यांमधील निवडणुका. आटोपल्यामुळे डीएपीच्या किमती मर्यादित प्रमाणात वाढविण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारीपासून सर्वच कंपन्या सुधारित दराने डीएपी विकण्याची तयारी करीत आहेत.
डीएपीची 50 किलोची गोणी सध्या बाजारात 1350 रुपयांना विकली जाते आहे. हीच गोणी 1550 ते 1575 रुपयांच्या आसपास मिळेल, असा अंदाज खत उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. याशिवाय 10:26:26 खत 255 रुपये, 12:32:16 खत 255 रुपये आणि टी.एस.पी. (46 टक्के) 50 रुपयांनी महागणार आहे.
डीएपीची किंमत वाढविण्यास केंद्र सरकार मान्यता देत नव्हते. त्यामुळे कंपन्यांनी आयात कमी केली. परिणामी, देशात काही महिन्यांपासून डीएपीचा तुटवडा जाणवतो आहे. त्याचा फायदा काळाबाजार करणाऱ्यांनी घेतला आहे. डीएपी तयार करण्यासाठी खत कंपन्यांना केंद्राकडून प्रतिटन 3500 रुपये अनुदान मिळते. हे अनुदान आता बंद केले जाणार आहे. अनुदानाऐवजी तुम्ही किमतीत मर्यादित प्रमाणात वाढ करा, अशी भूमिका केंद्राने घेतली आहे. यामुळे खत कंपन्यांना व्यावसायिक नियोजन करणे सोपे जाणार आहे. दरवाढीस मान्यता मिळाल्याने कंपन्यांकडून डीएपीचा पुरवठा वाढवला जाण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यात डीएपी खताच्या वर्षाला तीन लाख 65 हजार बॅग लागतात. 10:26:26 खताच्या चार लाख बॅग, तर 12:32:16 खताच्या दोन लाख बॅग लागतात. या तीन खतांच्या सुमारे साडेसहा लाख बॅगची मागणी असते. या तीन खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांवर 20 कोटींचा भुर्दंड पडणार आहे. दरम्यान, कृषी अधिकाऱ्यांच्या मते डीएपीची विक्री किंमत प्रतिगोणी 240 रुपयांनी वाढण्याची चर्चा आहे. परंतु, याबाबत केंद्र शासन अथवा खत उद्योगाकडून कृषी विभागाकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List