मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मोठा धोका टळला, सारख्या नंबर प्लेटच्या दोन गाड्या आल्या अन्…
Mumbai Police: मुंबईतील संवेदनशील भाग असलेल्या ताज हॉटेलमध्ये एकाच क्रमांकाची नंबर प्लेट असलेल्या दोन गाड्या सापडल्या. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तातडीने पोलिसांना ही बाब लक्षात आणून दिली. पोलिसांनी आरटीओला बोलवून बनावट नंबर प्लेटच्या गाडी चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याने ही गाडी ताज हॉटेलमध्ये का आणली? त्याचा त्यामागे काय उद्देश होता? बनावट नंबर प्लेट का लावली? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून शोधली जात आहे. MH 01 EE 2388 हा क्रमांक दोन गाड्यांवर आढळला. दोन्ही गाड्या मारुती सुझुकी आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरु
मुंबईत २६/११ हल्ला झाला गेट ऑफ इंडियाच्या जवळ असलेल्या ताज हॉटेलमध्ये झाला होता. त्यावेळी ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवले होते. ताज हॉटेल संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असतो. मुंबई पोलिसांची सुरक्षा आणि ताज हॉटेलची स्वत:ची सुरक्षा या ठिकाणी आहे. त्यानंतर या ठिकाणी एकाच क्रमांक असलेल्या दोन गाड्या आल्या आहेत. या दोन्ही गाड्यांवर MH 01 EE 2388 हा क्रमांक आहे. त्यामुळे खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर पोलिसांना हा प्रकार सांगण्यात आला.
नकली नंबर प्लेट असलेली गाडी पोलीस ठाण्यात
पोलिसांनी कोणत्या गाडीची नंबर प्लेट असली आणि कोणत्या गाडीची नंबर प्लेट नकली याचा शोध घेण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना बोलवले. त्यानंतर बनावट नंबर प्लेट असलेली गाडी स्पष्ट झाली. बनावट नंबर प्लेट असलेली गाडी पोलिसांनी कुलाबा पोलीस ठाण्यात आणली.
कुलाबा पोलीस ठाण्यात त्या कार चालकाची कसून चौकशी केली जात आहे. त्या चालकाने कार ताज हॉटेलमध्ये का आणली. त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून सबंधित कार चालकाची कसून चौकशी केली आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार आहे. एकंदरीत या प्रकारामुळे खळबळ उडाली.
हप्ते थकल्यामुळे वापरला नंबर
पोलिसांच्या चौकशीत नवीनच माहिती समोर आली आहे. गाडीचे हप्ते थकल्याने गाडीचा नंबर बदलल्याच प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. गाडी मालकाचे नाव प्रसाद कदम असे आहे. तो सिवूडला राहतो. मुळचा मुरुड जंजिराचा असणाऱ्या प्रसाद कदमच्या गाडीचे ६ हप्ते थकले म्हणून फायनान्स कंपनीने गाडी जप्त केली होती. ही गाडी सोडवून घेतल्यानंतर पुन्हा जप्तीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी चालकाने हा कारनामा केल्याचे समोर आले आहे. गाडीचा नंबर बदलून जो नंबर या चालकाने लावला त्याला ट्रॅफिक चलन गेल्यानंतर मूळ मालकाने तक्रार केल्याचेही समोर आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List