ब्रँडेड तुपाच्या नावाने बनावट देशी तूप बनवणाऱ्या कारखान्यांचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बड्या कंपन्यांच्या नावाने बनावट देशी तूप बनवणाऱ्या कारखान्यांचा पर्दाफाश झाला आहे. उत्तर प्रदेशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये पतंजली, अमूल आणि पारस या ब्रँडच्या नावाने बनावट तूप पुरवठा केला जात होता. युरिया व इतर घातक रसायने मिसळून तूप तयार केले जात होते. या तुपाच्या पॅकेटवर 18 मोठ्या ब्रॅंडच्या नावाचे स्टीकर लावून ही फसवणूक केली जात होती.
2 जानेवारी रोजी ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट तूप बनविण्याचे तीन बेकायदेशीर कारखाने सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. कारवाईदरम्यान हे तिन्ही कारखाने ‘श्याम ॲग्रो’च्या नावाने नोंदणीकृत असल्याची माहिती मिळाली. हा कारखाना ग्वाल्हेरच्या नीरज अग्रवाल यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पहिल्या कारखान्यात बनावट तूप बनवायचे तर दुसऱ्या कारखान्यात बनावट तुपाचा कच्चा माल ठेवला जायचा. तिसऱ्या कारखान्यात बनावट तुपाचा साठा ठेवण्यात आला होता. येथून विविध राज्यांतील शहरांना तूप पुरवले जायचे.
उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये हे बनावट तूप पाठवले जात होते. बनावट तूप तयार करताना इसेन्स (अन्नात वापरण्यात येणारा सुगंध), पाम तेल आणि युरिया यांसारखे हानिकारक पदार्थ मिसळले जात होते. पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकून सुमारे 2500 किलो कच्चा माल आणि बनावट तूप जप्त केले. पोलिसांसह अन्न विभागाचे पथकही घटनास्थळी होते. सध्या पथकाने बनावट तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List