शहापुरातील ज्वेलर्सची हत्या करून युपीत पसार झालेल्या मारेकऱ्याला पिठाच्या गिरणीतून उचलले
दुकान बंद करून घरी परतणाऱ्या ज्वेलर्समधील कामगाराची हत्या करून पसार झालेल्या मारेकऱ्याला अखेर युपीतील एका पिठाच्या गिरणीतून उचलले आहे. शहापूर पोलिसांच्या 70 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने तेरा दिवसांत या हत्येचा छडा लावला आहे. पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे युपीतील मांझनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून एका पिठाच्या गिरणीतून आरोपी शशांक मिश्रा उर्फ सोनू याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शहापुरातील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानातील कामगार दिनेश चौधरी हा 21 डिसेंबरला रात्री दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी त्याच्यावर बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्याची निघृण हत्या केली. या पाश्र्वभूमीवर शहापुरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध केला होता. या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर व शहापूर पोलिसांसह विशेष कृती पथक, गुन्हे विभाग अशा पंधरा पथकांच्या माध्यमातून तब्बल 70 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली होती.
अजून दोघांचा थांगपत्ता नाही
सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांनी दिलेली माहितीवरून माग काढत युपी येथे विशेष कृती पथकासह शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व पथकातील प्रकाश साहिल, मोहन भोईर, हनुमंत गायकर, स्वप्नील बोडके धडकले. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी युपीच्या मांझनपूर पोलीस ठाण्यातील कौशिंबी येथे सापळा लावला होता. तेथील पिठाच्या गिरणीत आलेल्या शशांक मिश्रावर पोलिसांनी झडप टाकून त्याला जेरबंद केल्याची माहिती शहापूरचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली. फरार झालेल्या अंकित यादव उर्फ फैजान यांचा शोध सुरू असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List