Satara crime news – औंधच्या युवकाचा गोपूजमध्ये खून; 12 तासात दोन आरोपी जेरबंद
औंध येथील युवकाचा डोक्यात दगड घालून गोपूज येथे खून करण्यात आला. याप्रकरणी औंध पोलिसांनी 12 तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. रामदास अशोक दंडवते (वय – 28, रा. औंध) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. रोहन मल्हारी मदने आणि गुरुराज दत्तात्रय मदने अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सोमवारी सायंकाळी गोपूज येथील औंध रोडच्या सुतारखडवी परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. औंधचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी तपास करीत अवघ्या बारा तासांत मृतदेहाची ओळख पटवत दोन आरोपींना जेरबंद केले.
शनिवारी (दि. 21) दुपारी आरोपी रोहन मल्हारी मदने व गुरुराज दत्तात्रय मदने हे चुलते पुतणे आणि मृत रामदास अशोक दंडवते हे सुतार खडवी परिसरात मद्यपान करीत बसले होते. येथे आपापसात वादावादी होत हाणामारी झाली. यामध्ये रामदास दंडवते याच्या रोहन मदने याने डोक्यात दगड घातल्याने रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. मृतदेह कोणास सापडू नये म्हणून दोन्ही आरोपींनी सुतार खडवी जवळच्या झाडीत मृतदेह लपवून ठेवला. जवळजवळ दहा दिवस हा मृतदेह त्या झाडीत तसाच होता.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली गोपूज, औंध, खरशिंगे परिसरात शोध घेतल्यानंतर हा मृतदेह रामदास दंडवते याचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी रोहन मल्हारी मदने यास सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत यामध्ये आपल्यासह चुलत चुलते गुरुराज दत्तात्रय मदने सहभागी असल्याचे सांगितले. पोलिसांनी लोणंद येथून मंगळवारी पहाटे गुरुराज मदने यास ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना वडूज कोर्टाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी लीला अशोक दंडवते यांनी फिर्याद दिली होती.
सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश मयेकर, अनिल शिरोळे, अविनाश वाघमारे, हवालदार राहुल वाघ, दादासाहेब देवकुळे, साहिल झारी, प्रमोद इंगळे करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List