गडचिरोलीतील नक्षलवाद, बीडमधील दहशतवाद आणि मराठी माणसावरील आक्रमण मोडून काढा! – संजय राऊत
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी… या सुरेश भट यांच्या कवितेतील ओळी खऱ्या ठराव्या असाच प्रकार गेल्या काही दिवसांपासून मुंबई, कल्याण, ठाणे या भागात घडत आहे. गुरुवारी मुंब्य्रातही असाच एक प्रकार घडला. मराठीत बोल असे सांगितल्याने मुजोर परप्रांतीय फळविक्रेत्यांनी विशाल गवळी या तरुणालाच कान धरून माफी मागायला लावली. याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाचा हा अपमान मोडून काढला पाहिजे. नुसते बोलून चालणार नाही. ज्या कठोर पद्धतीने गडचिरोलीतील नक्षलवाद मोडणार आहेत, बीडमधील दहशतवाद संपवणार आहेत, त्याच कठोर पद्धतीने मराठी माणसावरील आक्रमणही मोडून काढले पाहिजे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलेच पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले. आम्ही उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहारमध्ये जातो तेव्हा हिंदीतून संवाद साधतो. पश्चिम बंगालमध्ये गेल्यावर काही शब्द बंगालीतून बोलण्याचा प्रयत्न करतो. राज्याच्या भाषेची अस्मिता सगळ्यांनी टीकवायला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
मुंब्य्रात काय घडले?
मुंब्य्रात विशाल गवळी हा मराठी तरुण बाजारात फळे विकत घेण्यासाठी एका विक्रेत्याकडे गेला होता. विशाल याने मराठीत फळांचा भाव विचारला असता फळविक्रेता शोएब कुरेशी हा संतापला व तो म्हणाला की, मला मराठी येत नसल्याने तू हिंदीमधून बोल. विशाल गवळी याने महाराष्ट्रात राहून तुला मराठी का येत नाही, असे खडसावले. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे भांडणात रूपांतर होत असतानाच मोठय़ा प्रमाणावर जमावदेखील जमला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List