राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा होणार महाआरती; शिर्डीतील मंदिर न्याय परिषदेत ठराव
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव श्री साईंच्या शिर्डीत करण्यात आला. शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्याय परिषदेत हा ठराव करण्यात आला आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने दोनदिवसीय अधिवेशन शिर्डीत झाले. या अधिवेशनासाठी राज्यभरातील एक हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा सामूहिक महाआरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला उपस्थित सर्व विश्वस्तांनी अनुमोदन दिले, असे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी सांगितले. अनेक मंदिरांवर सरकारी नियंत्रण असून, हे नियंत्रण हटविण्याची मागणी या अधिवेशनात करण्यात आली. तर, वक्फ बोर्डाने काबीज केलेल्या मंदिरांच्या जागादेखील सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा ठराव या अधिवेशनात पारीत करण्यात आल्याचे नाशिक येथील काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास यांनी सांगितले. मंदिरांचे होणारे सरकारीकरण रोखावे, वक्फ बोर्डाने हस्तांतरित केलेल्या जागांचा निर्णय घ्यावा, यांसह मंदिरांच्या जागा बळकवण्याचा होत असलेला प्रयत्न टाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन कायदा करावा, असे विविध ठराव यावेळी करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List