प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असते, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सुप्रिया सुळे यांची सूचक प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारमध्ये काहीतरी नैतिकता असावी, असा टोला लगावला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही. तो माणुसकी विरुद्ध क्रूर, विकृत मानसिकता असा झालेला आहे. सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झालेले असतील तर त्याला कुठलाही राजकीय रंग देऊ नये. आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा. कारण त्या कुटुंबाचे आणि त्यांच्या लहान मुलीचे अश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणारे आहेत. बीड आणि परभणी या दोन्ही घटनांमध्ये सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत. पारदर्शकपणे निर्णय झाले पाहिजेत. या राज्याला तो खून, ती हत्या कशी झाली? याचे उत्तर परभणी आणि बीड या दोन्ही घटनांमध्ये प्रशासनाने दिले पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असते. पवारसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आरोप झाल्यावर त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामे दिले. काँग्रेसच्या कार्यकाळात अशोक चव्हाणांवर आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला होता. यामुळे ती नैतिकता आता मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा. समाजात लोकांची काय भावना आहे, हे दिसून येतेय. एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं? हे विरोधकांनी सातत्याने सांगितले पाहिजे. काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये असावी एवढीच माफक अपेक्षा आहे, असे सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिणार आहे. रोजच कुठली ना कुठली केस, खून अशा फार घटना वाढलेल्या आहेत. अनेकवेळा या मागचा वेगळाही अँगल असतो. अनेकदा क्राइम वाढतो तेव्हा त्याचा आर्थिक संबंध असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. इतकं मोठं बहुमत या सरकारला मिळालेलं आहे. या सरकारच्या कॅबिनेटची काल पहिली बैठक झाली. काही मंत्र्यांनी पदाभर घेतलेला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना टार्गेट दिलेलं आहे आणि सगळ्यांनी चार्ज घेतलाच पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे, असे सांगितले आहे. आश्चर्य वाटतंय दीड महिना झाला एवढं मोठं बहुमत या सरकारला मिळालेलं आहे. पण जी अॅक्शन मोड महाराष्ट्राला अपेक्षित होती ती दिसत नाही. मुख्यमंत्री एकटेच अॅक्शन मोडवर दिसताहेत. मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच राज्यात अॅक्शन मोडवर दिसत नाही. मुख्यमंत्री करताच आहेत, पण त्यांच्या टीमनेही 2025 मध्ये राज्यात काम करावं. कारण सगळ्यांनाच राज्यातील जनतेनं मतं दिली आहेत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी खात्याचा पदभार न स्वीकारणाऱ्या मंत्र्यांना लगावला.
रिक्त पदे ही अनेक ठिकाणी आहेत. पोलीस दलात आहेत, नगपालिकांमध्ये आहेत. सरकार निवडून आल्यापासून बघतेय या सरकारमध्ये सीएमच सगळ्यात अॅक्टिव्ह दिसताहेत. त्यामुळे काही काम असतील तर पाच वर्षे सीएमनाच पत्र लिहायची. कारण शपथ घेतल्यापासून सगळ्या चॅनेलवर तेच अॅक्टिव्ह दिसताहेत. त्यामुळे त्यांच्याकडे वाढत्या क्राइमचा फॉलोअप घेणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात. कारण सर्वसामान्यांना याचा त्रास होतोय, कुठेही नगरसेवक नाहीत. त्यामुळे याचा पाठपुरावा मी करणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List