छोट्या डॉल्फिनला वाचवण्याचा मोठ्या डॉल्फिनचा प्रयत्न अयशस्वी, तळाशिल समुद्रात पर्यटकांनी अनुभवला अनोखा प्रसंग
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमान्यांनी कोकणात गर्दी केली होती. यावेळी पर्यटकांनी डॉल्फिन सफारीचाही आनंद लुटला. यावेळी पर्यटकांनी तळाशिल समुद्रात अनोखा प्रसंग अनुभवला. छोट्या मृत डॉल्फिन माशाला वाचवण्याचा मोठ्या डॉल्फिनचा प्रयत्न पर्यटकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे.
तोंडवळी तळाशिल समृद्रात पाच सहा बोटींमधून कवडा रॉक परिसरात गेलेल्या पर्यटकांना समुद्रात एक मोठा डॉल्फिन छोट्या डॉल्फीनला पाण्यावर ढकलत असल्याचे दृष्य दिसून आले. सदर दृष्य पर्यटकांनी मोबाईलमध्ये कैद केले. यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सागर जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्याशी याबाबत संपर्क साधला. डॉक्टर सारंग कुलकर्णी यांनी याबाबत अनेक तर्क व्यक्त केले.
काय म्हणाले डॉ. कुलकर्णी
मोठा डॉल्फिन छोट्या मृत डॉल्फिनला उलटवण्याचा प्रयत्न करणे हे डॉल्फिनमध्ये पाहिले जाणारे सामान्य वर्तन आहे. हे वर्तन जर मोठा डॉल्फिन मृत डॉल्फिनची आई असेल तर ते आपल्या पिल्लाला जिवंत करण्याचा किंवा वाचवण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे. ही तिची मातृभावना आहे. डॉल्फिन अतिशय बुद्धिमान आणि सामाजिक बंधन ठेवणारे असतात. त्यामुळे मोठा डॉल्फिन शोक व्यक्त करत असावा.
जर मोठा डॉल्फिन छोट्या मृत डॉल्फिनची आई नसली तरी ती कळपातील नाते जोडलेल्या डॉल्फिनसाठी काळजी आणि सहानभूती दर्शवत असावी. त्यांचे हे सामाजिक बंधन ते दाखवतात किंवा संरक्षण भावनेतून मोठा डॉल्फिन मृत पिल्लाला भक्षकांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यताही असू शकते. काही वेळा
कळपातील सदस्याचा मृत्यू हा डॉल्फिनसाठी भावनिक ताणतणाव निर्माण करू शकतो. त्यामुळे असे वर्तनही दिसू शकते, असे डॉ. सारंग कुलकर्णी यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List