मुंबईत पहाटे गारवा, दिवसा लाहीलाही; कमाल तापमानात 6 अंशांची वाढ
मुंबई शहर व उपनगरांत ‘पहाटे गारवा आणि दिवसा लाहीलाही’ अशी परिस्थिती शुक्रवारी होती. गेल्या काही दिवसांत सरासरीपेक्षा जास्त राहिलेल्या पहाटेच्या तापमानात शुक्रवारी 16 अंशांपर्यंत घट झाली, तर कमाल तापमान तब्बल 6 अंशांनी वाढले. सांताक्रुझमध्ये 36 अंश इतके कमाल तापमान नोंद झाले. त्यामुळे पहाटे गारवा अनुभवणारे मुंबईकर दिवसभर उकाडय़ाने हैराण झाले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात थंडीची तीव्रता वाढली होती, मात्र नवीन वर्ष उजाडताच उकाडय़ात वाढ झाली. मागील तीन दिवस शहरातील कमाल तापमान 34-35 अंशांच्या घरात होते. शुक्रवारी कमाल तापमानाची पातळी सरासरीपेक्षा 6 अंशांनी वाढली. मात्र किमान तापमानात 4 अंशांची घट नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शहरात पुढील आठवडाभर किमान तापमान 20 अंशांपेक्षा कमी नोंद होणार आहे, तर आणखी दोन दिवस कमाल तापमान 34 अंशांपुढे राहील. यानुसार दोन दिवसांच्या उकाडय़ानंतर शहरात पुन्हा थंडीची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List