मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर अनुपम खेर-हंसल मेहता यांच्यात बाचाबाची; म्हणाले ‘ढोंगी’
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास नवी दिल्लीतल्या ‘एम्स’ रुग्णालयात निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाची ट्विटरवर जोरदार चर्चा सुरू झाली. या चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी साकारली होती. तर हंसल मेहता त्याचे निर्माते होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर या चित्रपटावरून अनुपम खेर आणि हंसल मेहता यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. दोघांनी एकमेकांना ‘ढोंगी’ असं म्हटलंय. या दोघांच्या वादात सर्वसामान्यांनीही उडी घेतली.
पत्रकार आणि लेखक वीर संघवी यांच्या एका पोस्टनंतर या वादाची सुरुवात झाली. संघवी यांनी शुक्रवारी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘जर तुम्हाला मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोललेलं खोटं आठवायचं असेल तर तुम्ही ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट पुन्हा पहा. हा आतापर्यंतचा सर्वांत वाईट हिंदी चित्रपट तर आहेच, शिवाय चांगल्या माणसाच्या नावाला कलंकित करण्यासाठी मीडियाचा कसा वापर केला गेला, याचं हे उत्तम उदाहरण आहे.’ वीर संघवी यांची ही पोस्ट रिट्विट करत हंसल मेहता यांनी त्यांच्याशी 100 टक्के सहमत असल्याचं म्हटलं. ‘+100’ अशी टिप्पणी मेहता यांनी केली. त्यावरून सर्वसामान्य नेटकरी कमेंट करत असतानाच अनुपम खेर यांनी रात्री 9.55 वाजता हंसल मेहता यांना प्रत्युत्तर दिलं. ‘या प्रकरणात ढोंगी वीर संघवी नसून हंसल मेहता आहेत’, असं खेर यांनी लिहिलं.
The HYPOCRITE in this thread is NOT @virsanghvi. He has the freedom to not like a film. But @mehtahansal was the #CreativeDirector of #TheAccidentalPrimeMinister. Who was present at the entire shoot of the film in England! Giving his creative inputs and must have taken the fee… https://t.co/tkr3H1ChyX
— Anupam Kher (@AnupamPKher) December 27, 2024
अनुपम खेर यांनी पुढे म्हटलंय, ‘वीर संघवी हे यात ढोंगी नाहीत. एखादा चित्रपट न आवडण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. पण हंसल मेहता हे ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चे क्रिएटिव्ह डायरेक्टर होते. इंग्लंडमध्ये चित्रपटाच्या संपूर्ण शूटिंगदरम्यान ते उपस्थित होते. त्यांनी त्यात आपले काही क्रिएटिव्ह इनपुट्ससुद्धा दिले आणि त्यासाठी त्यांनी फीसुद्धा स्वीकारली असेल. त्यामुळे वीर संघवी यांच्या कमेंटवर त्यांचं 100% असं म्हणणं अत्यंत गडबड आणि दुटप्पीपणाचं आहे.’
Of course I own my mistakes Mr Kher. And I can admit that I made a mistake. Can’t I sir? I did my job as professionally as I was allowed to. Can you deny that? But it doesn’t mean I have to keep defending the film or that it makes me lose objectivity about my error of judgement.… https://t.co/UIgc4Pdvww
— Hansal Mehta (@mehtahansal) December 27, 2024
‘मी वीर संघवी यांच्याशी सहमत आहे असं नाही, परंतु आपण सर्वजण वाईट किंवा निराशाजनक काम करू शकतो. मात्र ते आपण स्वीकारलं पाहिजे. हंसल मेहता यांच्यासारख्या लोकांच्या विशिष्ट वर्गाकडून काही कौतुक मिळविण्याचा (ब्राऊनी पॉईंट्स) प्रयत्न करू नये. हंसल मेहता.. मोठे व्हा. माझ्याकडे अजूनही शूटचे काही फोटो आणि व्हिडीओ आहेत, जिथे आपण एकत्र होतो’, अशा शब्दांत अनुपम खेर यांनी सुनावलं. यावर हंसल मेहता यांनीही तासाभरानंतर प्रतिक्रिया देत अनुपम खेर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
‘अनुपम खेर, अर्थातच मला माझ्या चुका मान्य आहेत. मी चूक केली हे मी मान्य करू शकतो. मी हे करू शकत नाही का सर? मला जशी परवानगी होती तसं मी माझं काम प्रोफेशनल पद्धतीने पूर्ण केलं. तुम्ही ते नाकारू शकता का? पण याचा अर्थ असा नाही की मला चित्रपटाचा बचाव करत राहावं लागेल किंवा त्यामुळे माझ्या निर्णयातील त्रुटीबद्दल निष्पक्षता गमावली जाईल. ब्राऊनी पॉईंट्स आणि ढोंगीपणाबद्दल मी तुम्हाला आदरपूर्वक सांगू इच्छितो की तुम्ही लोकांचं मूल्यांकन त्याच स्केलवर करता ज्याने तुम्ही स्वत:चं मूल्यांकन करता… आणि अनुपम खेर सर, तुम्हाला जे हवं ते बोलू शकता. तुम्हाला हवं असेल तर मला शिवीगाळ करू शकता. अनवधानाने तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा. तुमची इच्छा असेल तेव्हा आपण यावर सविस्तर बोलू. मी ट्रोलर्सना हे प्रकरण आणखी खराब करू देणार नाही किंवा त्याची मजा घेऊ देणार नाही’, असं हंसल मेहता यांनी लिहिलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List