गरिबाच्या देवाची वाढती श्रीमंती, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वर्षभरात 53 कोटी 97 लाखांचे दान
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस 01 जानेवारी 2024 ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत तब्बल 53 कोटी 97 लाखांचे दान मिळाले आहे. व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी ही माहिती दिली.
श्रींच्या चरणाजवळ 6,25,89,797/-, लाडू प्रसादातून 5,85,26,900/-, देणगीतून 8,18,98,417/-, भक्तनिवासातून 9,84,78,279/-, पुजेतून 2,33,86,312/-, फोटो, मोबाईल लॉकर व महावस्त्रातून 92,33,049/-, हुंडीपेटीतून 7,56,74,052/-, सोने-चांदीमधून 2,72,04,450/- परिवार देवता मंदिरातून 3,09,14,203/-, विधी उपचारातून 59,88,437/- तसेच इतर जमेतून 6,58,11,856/- असे एकूण 53 कोटी 97 लाख 5 हजार 752 रूपये इतके उत्पन्न सरत्या वर्षात मंदिराला मिळाले.
मंदिर समितीमार्फत भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने दर्शनरांग व्यवस्थापन, अन्नछत्र, लाडूप्रसाद, निवास इत्यादीचा समावेश आहे. याशिवाय, भाविकांना श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशीपूजा देखील भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यात्रा कालावधीत भाविकांच्या पायांना खडे टोचू नये म्हणून दर्शनरांगेत मॅटींग, विश्रांती कक्ष, आपत्कालीन दरवाजे, हिरकणी कक्ष, मोफत अन्नछत्र, एकादशीला शाबुदाणा खिचडी वाटप, द्वादशीला तांदळाची खिचडी, मिनरल वॉटर, चहा, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल इ. उपक्रम मंदिर समितीने सुरू केले आहेत. तसेच श्रींच्या पुजेसाठी वाढती मागणी विचारात घेऊन, नित्यपुजेत 2 भाविक कुटुंबियांना संधी, अन्नछत्र सहभाग योजना, महानैवेद्य सहभाग योजना, तुळशी अर्चन पुजा सुरू केल्या असून, त्याची नोंदणी देखील ऑनलाईन करण्यात आली आहे. भाविकांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मंदिर समितीस वारकरी भाविकांकडून चांगले दान मिळत असून, मिळालेल्या दानातून श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या व अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List