वाल्मीक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस, त्याची चौकशी होईल का? आव्हाड यांचा सवाल
वाल्मीक कराड प्रकरणी पोलिसांवर दबाव असावा अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. तसेच वाल्मीक कराड हा माझा खास माणूस आहे असे खुद्द धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यामुळे मुंडे मंत्री असताना खास माणसाची चौकशी होईल का असा सवाल आव्हाड यांनी विचारला.
जितेंद्र आव्हाड यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यात आव्हाड म्हणाले की, देशात अनेक प्रकारचे कुप्रसिद्ध गुन्हेगार होऊन गेले. पण कुणीही अशा प्रकारे पोलीस स्टेशनला गाडी घेऊन गेला आणि पोलिसांकडे त्याने आत्मसमर्पण केले, असे कधी झाले नव्हते. यामधून पोलिसांची अकार्यक्षमता दिसते. वाल्मीक कराड स्टाईलमध्ये आला. त्यातून एक गोष्ट निर्देशित होत होती की तुम्ही काय पकडणार मला? मीच येतो तुमच्याकडे. हा चुकीचा पायंडा आहे. पोलीस हे वाल्मीक कराडच्या दबावाखाली असतील असे आव्हाड म्हणाले.
तसेच वाल्मीक कराडच्या दोन समर्थकांनी सांगितले की कराड दोन दिवस पुण्यातच होता. मला जी माहिती मिळाली होती त्यात काहीच खोट नव्हतं. हे सगळं धक्कादायक आहे. वाल्मीक कराडला पकडण्यासाठी पोलिसांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावायला हवी होती. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. देशमुख कुटुंबीयांनी सांगितले आहे की संतोष देशमुख यांचा खून वाल्मीक कराड यांनी केला आहे. असे असताना FIR मध्ये कराडचे नाव का नाही? एकूणच हे प्रकरण संशयास्पद आणि धक्कादायक आहे. स्वतः वाल्मीक कराड सांगतोय की मी खून केलेला नाही, माझ्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मला अटकपूर्व जामीन मिळाला असता. ही कुठल्या गुन्हेगाराची भाषा असते ? या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांविषयी संशय निर्माण झाला होता. जनतेच्या दबावामुळे कराडने आत्मसमर्पण केलं, पण धनंजय मुंडेंचं काय? पोलिसांनी आपलं काम करून कराडला ताब्यात घेतलंय आणि चौकशी सुरू आहे. सरकारने आता सरकारचं काम करावं. कराड माझा खास माणूस आहे असं मुंडे म्हणाले होते. मंत्री असताना त्यांच्या खास माणसाची चौकशी होऊ शकते का? हा साधा प्रश्न आहे. त्यामुळे हे सगळं अस्वस्थ करणारं आहे असेही आव्हाड म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List