2025 मध्ये टीम इंडिया कोणत्या संघांना भिडणार? वाचा सविस्तर…
टीम इंडियासाठी 2024 हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे राहिले आहे. टीम इंडियाने टी-20 विश्वचषक उंचावत चाहत्यांचा आनंद द्विगुणीत केला. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची झालेली वाताहत चाहत्यांचा हिरमोड करून गेली. त्याच बरोबर वर्षाचा शेवटही पराभवाने झाल्याने चाहत्यांसह खेळाडू सुद्दा नाराज आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाचा पराभव करून नवीन वर्षाची सुरुवात दणक्यात करण्याची टीम इंडियाला चांगली संधी आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर करंडकातील पाचवा कसोटी सामना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 3 जानेवारी पासून सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू होणार आहे. 3 ते 7 जानेवारी दरम्यान सामना खेळवला जाईल. जानेवारी ते डिसेंबरपर्यंत टीम इंडिया विविध मालिका खेळणार आहे. त्याच बरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल? आशिया चषक या मोठ्या स्पर्धां सुद्दा 2025 मध्ये होणार आहेत. त्यामुळे टीम इंडियासाठी 2025 हे वर्ष खूपच व्यस्त असणार आहे. बॉर्डर गावस्कर करंडक संपल्यानतंर 22 जानेवारी पासून टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये लढाईला सुरुवात होईल.
इंग्लंडचा संघ हिंदुस्थानात येणार असून उभय संघांमध्ये 22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत 5 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. त्यानंतर 19 फेब्रवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानात ही स्पर्धा पार पडणार आहे. पंरतु टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर 14 मार्च ते 25 मे IPL चा धमाका पार पडेल. टीम इंडिया जर WTC फायनलमध्ये पोहचण्यात यशस्वी ठरली तर, 11 ते 15 जून दरम्यान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढाई होईल.
जगातिक कसोटी चॅम्पियनशिप 2025-27 या हंगामासाठी टीम इंडियाचा इंग्लंड दौरा पार पडणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहे. 2 जून रोजी मालिकेला सुरुवात होईल आणि 31 जुलै रोजी मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाईल. त्यानंतर टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका ऑगस्टमध्ये खेळेल. ऑक्टोबरमध्ये टीम इंडियाची करेबियन भुमीवर दोन कसोटी सामन्यांची मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात आशिया चषकाचा थरार रंगणार असून अद्याप तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही. आशिया चषक झाल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान हा दौरा पार पडणार असून या दौऱ्यामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे. तसेच वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी, तीन वनडे आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List