Walmik Karad – पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडनं सरेंडर केलं? वडेट्टीवार यांचा सवाल
गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि सीआयडीला ज्याचा शोध घेत होता तो वाल्मीक कराड अखेर शरण आला आहे. स्वत:च्या गाडीतून तो पुण्यातील सीआयडी मुख्यालयात हजर झाला. तिथे त्याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र वाल्मीक कराड शरण पोलीस आणि सीआयडीच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही एक ट्विट करत ‘पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केले?’, असा सवाल उपस्थित केला आहे.
हे वाचा – शरण येण्याची वेळ अन् ठिकाण वाल्मीक कराडनं ठरवलं; पोलीस आणि सीआयडीची नाचक्की
खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 22 दिवस पोलिस – सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही! इतके दिवस वाल्मीक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का? या वाल्मीक कराडची हिंमत तर इतकी की सरेंडर होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलीस, सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List