हृतिक रोशनच्या पूर्व पत्नीने भाड्याने दिलं मुंबईतील घर; दर महिन्याला मिळणार इतके लाख रुपये
अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान हिने मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरात असलेला तिचा अपार्टमेंट भाड्याने दिला आहे. स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुझानचं हे अपार्टमेंट अंधेरी, जुहू, गोरेगाव आणि विलेपार्ले यांसारख्या उच्चभ्रू परिसराच्या जवळ आहे. पश्चिम मुंबईतील ही प्रमुख ठिकाणं आहेत. सुझानने हे अपार्टमेंट 2.37 लाख रुपये प्रति महिना भाडेतत्त्वार दिल्याचं कळतंय. हे अपार्टमेंट सध्या अग्रवाल इंड इस्टेटमध्ये असून ती जागा औद्योगिक विकासासाठी तयार आहे. भाडेतत्त्वावर दिलेलं घर 2,329 चौरस फूटांवर पसरलेली आहे, अशी माहिती रिअल इस्टेट सल्लागाराने दिली.
13,500 रुपये मुद्रांक शुल्क आणि 1000 रुपयांच्या नोंदणी शुल्कासह हा करार करण्यात आल्याचं कळतंय. कराराच्या नोंदणीची तारीख डिसेंबर महिन्यातीलच आहे. सुझानचं हे घर प्रशस्त आणि विविध सोयीसुविधांनी परिपूर्ण असल्याने बिझनेस करणाऱ्यांसाठी ही जागा परफेक्ट असल्याचं मानलं जात आहे. हृतिकची पूर्व पत्नी सुझान ही स्वत: एक इंटेरिअर डिझायनर आहे. ती ‘द चारकोल प्रोजेक्ट’ या लक्झरी डिझाइन स्टोअरची संस्थापिकासुद्धा आहे. एक उद्योजिका आणि अग्रगण्या ब्रँडची संस्थापिका म्हणून तिने इंटेरिअर्स आणि डिझाइनच्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सुझान खानने 1996 मध्ये इंटेरिअर डिझायनिंगमधील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आईच्या पावलांवर पाऊल ठेवत तिने या क्षेत्रात नाव कमावलंय. तिने ब्रूक्स कॉलेजमधून इंटेरिअर डिझाइनमध्ये असोसिएट ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली.
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. 2014 मध्ये दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. या दोघांना दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझानमध्ये मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पहायला मिळतं. हे दोघं आपापल्या आयुष्यात पुढे गेली आहेत. हृतिक सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. तर सुझान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. या चौघांमध्येही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या चौघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. बर्थडे पार्ट्यांनाही हे चौघं एकत्र येतात. किंबहुना सबा आणि सुझान यांच्यातही खूप चांगली मैत्री असल्याचं पहायला मिळतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List