वाल्मीक शरण, पुण्यातच होता तरी अटक का केली नाही; मोक्का लावण्याची जनतेची मागणी
बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरण आला. विशेष म्हणजे शरणागती पत्करण्यापूर्वी कराडने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आणि खासगी गाडीने सीआयडी मुख्यालय गाठले. दुपारी चारच्या सुमारास त्याला घेऊन पोलीस केजकडे रवाना झाले. रात्री उशिरा कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून कराडची ओळख आहे. राजकीय वरदहस्तामुळे कराड सीआयडीला गुंगारा देत होता का? पुण्यात गेले काही दिवस मुक्कामाला असताना त्याला अटक का केली नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून, कराडला मोक्का लावण्याची मागणी जनतेतून होत आहे.
पवनचक्की कंपनी व्यवसायिकांना कोट्यवधी रुपयांची खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडविरुद्ध बीड जिह्यातील केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मस्साजोग गावचे तरुण सरचंप संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आणि सुदर्शन घुलेसह चार जण अद्याप फरार आहेत. वाल्मिक कराडही 23 दिवसांपासून फरार होता. कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड आहे. त्याच्यावरही हत्येचा गुन्हा दाखल करून ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी बीडसह राज्यभरातून होत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड फरार झाला. तो देवदर्शन करत फिरत होता. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्याकांडामुळे विधिमंडळासह राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अखेर जनक्षोभ उसळल्यामुळे राजकीय वरदहस्त असलेला वाल्मीक कराड पुणे येथील सीआयडी मुख्यालयात आज शरण झाला. कराडचा शोध बीड पोलीस घेत होते. कराडने बीडला हजर न होता पुण्यात शरणागती का पत्करली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीआयडीच्या कार्यालयाबाहेर वाल्मीक कराड समर्थकांची पळापळ
वाल्मीक कराड याचे समर्थन करण्यासाठी बीड, परळी भागातून अनेक कार्यकर्ते सीआयडी ऑफिसच्या जवळ जमा झाले होते. पोलिसांनी सुरुवातीला त्यांना हटकले नाही. त्यामुळे समर्थक पुढे येऊ लागले. मात्र मीडियाचा मोर्चा त्यांच्याकडे वळल्यानंतर एक-दोन कार्यकर्त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. नंतर समर्थक आपले चेहरे लपवून वाहनांकडे पळत सुटले. पाठोपाठ पोलीसही आल्याने त्यांची पळापळ झाली.
घटनाक्रम
- सकाळी 9 वाजता ः सीआयडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त़
- सकाळी 10 वाजता ः उपायुक्त संदीप गिल्ल, उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सुरक्षेचा आढावा घेतला.
- सकाळी 11 वाजता ः सीआयडी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱयांच्या बैठका
- दुपारी 12 वाजता ः शरणागती पत्करण्याआधी वाल्मीक कराडने स्वतःचा व्हिडिओ शेअर केला.
- दुपारी 12.10 वाजता ः एमएच 23 बीजी 2231 स्कॉर्पिओ गाडीतून चेहरा लपवत वाल्मीक कराड सीआयडी कार्यालयात दाखल.
- दुपारी 1 वाजता ः सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुऱहाडे यांच्याकडून कराडची चौकशी सुरू.
- दुपारी 4 वाजता ः वाल्मीक कराडला घेऊन बीडचे पोलीस रवाना. रात्री केजच्या न्यायालयात हजर करणार.
…तर मी शिक्षा भोगायला तयार -वाल्मीक कराड
केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात खोट्या खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, ती मी भोगायला तयार आहे, असे वाल्मीक कराड याने शरण येण्यापूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
स्कॉर्पिओ धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याची
शरणागती पत्करण्यासाठी वाल्मीक कराड खासगी स्कॉर्पिओ गाडीतून आला होता. त्याच्याबरोबर बीड नगरपरिषदेचे दोन नगरसेवकही होते. ज्या गाडीतून तो सीआयडी कार्यालयात आला, त्या गाडीचा क्रमांक एमएच 23 बीजी 2231 असा आहे. ही गाडी शिवलिंग मोराळे या व्यक्तीच्या नावे आहे. दरम्यान, शिवलिंग मोराळे हे बीड जिह्यातील पालीचे रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांचा सौम्य लाठीमार
रात्री उशिरा केज येथील न्यायालयात कराडला हजर करण्यात आले. यावेळी मोठी गर्दी झाली होती. वाल्मीक कराडला विरोध करण्यासाठी जमाव आला तर कराडचे समर्थकही पोहचले. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
सरकारी वकिलाची ऐनवेळी माघार
सीआयडीची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील एस. एस. देशपांडे हे केज कोर्टात दाखल झाले. सुनावणीला अवघे काही क्षण असताना त्यांनी माघार घेतली. वैयक्तिक कारणास्तव या प्रकरणात अन्य वकील नेमावा अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे नंतर जे. बी शिंदे यांनी सरकारी वकील म्हणून युक्तिवाद केला.
वेळ अन् ठिकाण कराडनेच निवडले; पोलीस आणि सीआयडीची नाचक्की
वाल्मीक कराड अखेर सीआयडी मुख्यालयात पोलिसांना शरण आला. 23 दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून तो फरार झाला होता. पोलीस आणि सीआयडीलाही तो गुंगारा देत होता. मात्र, आज शरणागती पत्करण्याची वेळ आणि ठिकाण कराडनेच ठरविल्यामुळे पोलीस आणि सीआयडीची नाचक्की झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासाच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची 9 पथके आणि 150 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त होते. त्याचा शोध युद्धपातळीवर देशभरात केला जात असल्याचा दावा संबंधित यंत्रणेकडून केला जात होता. परंतु सुदर्शन घुले याच्यासह चारजण अद्यापही फरार आहेत. तर 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड मोकाट होता. त्याच्या शोधासाठी सीआयडीची विविध पथके कार्यरत होती. अखेर मंगळवारी सकाळी कराड हा स्वतः पोलिसांना शरण आला. मात्र, त्यानेच शरण येण्याची वेळ आणि ठिकाणही निवडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गुंडांचे राज्य चालू देणार नाही ः फडणवीस
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य चालू देणार नाही असे सांगतानाच, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला फासावर लटकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मीक कराडच्या अटकेनंतर दिली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता याप्रकरणी राजकारणात मला जायचे नाही, असे सांगत थेट उत्तर त्यांनी टाळले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List