“ती बोल्ड असली तरी..”; पूनम पांडेच्या त्या व्हिडीओवरून शिव ठाकरे भडकला
पापाराझी आणि फोटोग्राफर्सवर अनेकदा टीका केली जाते की ते सेलिब्रिटींचे चुकीच्या अँगलने व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. काही वेळा सेलिब्रिटींकडून त्यांना खास विनंती करण्यात येते की असे व्हिडीओ शूट करू नका किंवा पोस्ट करू नका. मात्र तरीसुद्धा काही व्हूज मिळवण्यासाठी पापाराझींकडून सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या Oops मूमेंटचे व्हिडीओ पोस्ट केले जातात. यावरून आता ‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरेनं पापाराझींना चांगलंच सुनावलं आहे. शिवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून यामध्ये तो पापाराझींना त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी शिवचं कौतुक करत आहेत.
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेनं अभिनेत्री दिव्या अग्रवालच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी पापाराझींसमोर तिने दिव्यासोबत फोटोसाठी पोझ दिले. तितक्यात दिव्याने मस्करीत पूनमला उचलण्याचा प्रयत्न केला. याचवेळी ती Oops मूमेंटची शिकार झाली. पूनमला ही गोष्ट कळताच तिने पापाराझींना तो व्हिडीओ डिलिट करण्याची आणि कुठेही पोस्ट न करण्याची विनंती केली होती. मात्र त्यानंतरही पूनमचा तो व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला. यावरून शिव ठाकरेनं पापाराझींची चांगलीच शाळा घेतली.
काय म्हणाला शिव ठाकरे?
“त्यात तुम्हा सर्वांची चूक आहे. तुम्हाला माहीत होतं की काहीतरी चुकीचं घडलंय. पूनम पांडे कितीही बोल्ड असली तरी ती मुलगी आहे. तुम्हाला ती गोष्ट दिसत होती पण व्हिडीओला व्ह्यूज मिळावे यासाठी तुम्ही ते पोस्ट केलात,” अशा शब्दांत शिव ठाकरे पापाराझींना सुनावतो.
पूनम पांडेनं 2013 मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी ती मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती. पूनम तिच्या बोल्ड अंदाजामुळे आणि वादग्रस्त खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. 1 सप्टेंबर 2020 रोजी तिने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सॅमवर तिने धमकी आणि मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी सॅमला गोव्यातून अटक झाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List