अंबरनाथमध्ये विकृत शिक्षकाचा तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, विकृत चाळ्यांचे व्हिडीओही बनवले
बदलापुरात चिमुकल्या विद्यार्थिनीवर शाळेतच शिपाई अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने अवघा देत ढवळून निघाला असतानाच चार दिवसांपूर्वी दिव्यातील शाळेत घुसून एका विकृताने विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. या भयंकर घटनेनंतर आता अंबरनाथमध्येही एका शिक्षकाचे हैवानी कृत्य समोर आले आहे. वांद्रापाडा परिसरातील शाळेत तीन विद्यार्थ्यांवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या विकृत चाळ्यांचे व्हिडीओ बनवून हा नराधम विद्यार्थ्यांना वारंवार धमकावून अत्याचार करत होता. त्यामुळे हादरलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर काही पालकांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता या अत्याचारकांडाचा भंडाफोड झाला. यामुळे संतापाचा स्फोट झालेल्या पालकांनी शाळेवर धडक देत व्यवस्थापनाला फैलावर घेतले. या गंभीर प्रकरणाची अंबरनाथ पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन विकृत शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात एकामागोमाग एक घडणाऱ्या अत्याचाराच्या या घटनांमुळे शाळा लैंगिक अत्याचाराचा अड्डाच झालाय की काय असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या काही अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत एक विकृत शिक्षक गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचार करत होता. संतापजनक म्हणजे अशा घटना करताना तो त्याचे व्हिडीओ शूटिंगदेखील करायचा. त्यानंतर हेच व्हिडीओ दाखवून पुन्हा मुलांवर अत्याचार करत असे. व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीने विद्यार्थी घाबरत असल्याने त्याचाच गैरफायदा हा नराधम घेत होता. पीडित मुले 9 ते 15 वयोगटातील असून वारंवार होणाऱ्या अत्याचाराने ते चांगलेच धास्तावले होते. अनेक विद्यार्थी या कारणांनी शाळेत जाण्यास घाबरत होते. हा सर्व प्रकार काही पालकांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी याबाबत आपल्या मुलांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. मुलांना विश्वासात घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराची संपूर्ण माहितीच आपल्या आई-वडिलांना दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या भयंकर प्रकाराचा भंडाफोड झाल्यानंतर पालक अक्षरशः हादरून गेले. अनेक पालकांनी तत्काळ आपल्या पाल्यांना घेऊन शाळा गाठली. संतापाचा स्फोट झालेल्या पालकांनी व्यवस्थापनाला फैलावर घेतले.
पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारत चांगलेच फैलावर घेतले. याप्रकरणी पालकांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या नराधम शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटक केली असून उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या शिक्षकावर कडक करवाई करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.
सरकारचा धाकच उरला नाही
राज्यात मिंधे सरकार अस्तित्वात आल्यानंतर गेल्या दोन-अडीच वर्षांत ठाणे जिल्ह्यात क्राइम रेट वाढला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असतानाच आता विद्यार्थीदेखील सुरक्षित नसल्याचे बदलापूर, दिवा, अंबरनाथमधील घटनांवरून समोर आले आहे. सरकार केवळ राजकारणात मश्गुल असल्याने त्यांचा धाकच उरलेला नाही. त्यामुळे राजरोसपणे बेकायदा शाळा सुरू करून शिक्षणाची दुकानदारी सुरू असल्यानेच सुरक्षेअभावी विद्यार्थी अत्याचाराचे बळी पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अत्याचाराच्या घटना वाढल्याचा संताप व्यक्त होत आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List