गीताबोध – चातुर्वर्ण्य… (चार वर्ण…)
>> गुरुनाथ तेंडुलकर
मागील लेखात आपण सनातन भारतीय वर्णव्यवस्थेतील चार वर्ण ( ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ) याबद्दल थोडक्यात समजून घेतले. हे चारही वर्ण समाजधारणेसाठी सारख्याच प्रमाणात महत्त्वाचे आहेत. एखाद्या मोटारीला चार चाकं असतात, त्यापैकी कोणतंही चाक श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं. तसंच या वर्णव्यवस्थेचं आहे.
ज्या कालखंडात ही वर्णआश्रम पद्धती निर्माण झाली, त्या वेळी जातीव्यवस्था हा प्रकारच नव्हता. जातीव्यवस्था फार नंतर उदयास आली.
प्राचीन भारताचा इतिहास पाहिला तर चार वर्णांतील कोणतीही व्यक्ती कोणत्याही वर्णात सहजतेनं मिसळून जात होती. उदाहरणच द्यायचं झालं तर गायत्री मंत्राचे अधिकर्ते ऋषी विश्वामित्र त्यांच्या सुरुवातीच्या कालखंडात राजा होते. त्यांनी अनेक युद्धांत भाग घेतला होता. महाभारताच्या आधीच्या कालखंडात दाशरज्ञ नावाचं एक महायुद्ध झाल्याची इतिहासात नोंद आहे. त्या युद्धात विश्वामित्रांनी अतुलनीय पराक्रम गाजवला होता. त्यांच्या जवळ अनेक प्रकारची शस्त्रं आणि अस्त्रं होती. पुढे त्यांनी राज्यसंन्यास घेऊन तपाचरण केलं. आपल्या तपोबलावर प्रतिसृष्टी निर्माण केली. त्यांच्या तपसामर्थ्याने प्रभावित होऊन महर्षी वसिष्ठांनी त्यांना ब्रह्मर्षि ही पदवी प्रदान केली होती.
दुसरं उदाहरण म्हणजे परशुरामांचं. परशुराम हे स्वत जमदग्नी ऋषींचे पुत्र, पण त्याकाळच्या जुलमी राजवटीविरुद्ध म्हणजेच राजा सहस्त्रार्जुनाच्या विरुद्ध त्यांना हातात शस्त्र घ्यावं लागलं. ऋषीकुळात जन्म झाला असूनदेखील त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी काहीकाळ क्षात्रधर्म पाळला. सगळ्या जुलमी क्षत्रियांचा नाश करून पुन्हा ते ऋषी परशूराम बनले. त्यांनी अनेक शिष्य वर्ग निर्माण केला. अध्ययन आणि अध्यापन ही ब्राह्मणाची कर्तव्ये उत्तमरित्या पार पाडली. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील.
थोडक्यात काय तर वर्णाश्रम पद्धती ही जन्मवर अवलंबून नसून कार्यावर म्हणजेच कर्मावर अवलंबून होती.
ब्राह्मण म्हणजे बुद्धीच्या जोरावर समाजाची सेवा करणारा वर्ग
( शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ इत्यादी).
क्षत्रिय म्हणजे शारीरिक बलाच्या जोरावर समाजाचं रक्षण करणारा वर्ग (पोलीस, सैनिक, शासनकर्ते इत्यादी).
वैश्य म्हणजे समाजासाठी उत्पादन आणि वितरण व्यवस्था सांभाळणारा वर्ग ( शेतकरी, व्यापारी, सावकार, अर्थविषयक सेवा देणारे इत्यादी).
शूद्र म्हणजे समाजासाठी इतर अनेक प्रकारच्या सेवा देणारा वर्ग. हा वर्गदेखील फार महत्त्वाचा आहे. सगळ्याच वर्णाच्या, परंतु प्रामुख्याने शेतकरी आणि व्यापाऱयांच्या विविध प्रकारच्या गरजा पुरवणारा हा वर्ग.
महाराष्ट्रात यांना बलुतेदार असंही म्हटलं जातं. लोहार, परीट (धोबी), न्हावी, कोळी, तेली, सुतार, कुंभार, चांभार इत्यादी बारा प्रकारचे सेवेकरी ज्यांना बारा बलुतेदार असं म्हटलं जातं. या बारा बलुतेदारांच्या सोबतीनेच समाजाच्या इतर नैमित्तिक गरजा भागवणाऱयांना अलुतेदार म्हटलं जातं. यात शिंपी, गोंधळी, भाट, ठाकर, गोसावी, वाजंत्री, भोई अशा प्रकारची वर्गवारी केलेली आहे. हे बारा प्रकारचे बलुतेदार, अठरा प्रकारचे अलुतेदार आणि इतरही कष्टकरी, कामगार, श्रमिक वर्ग हे सर्वच जण समाजाचा एक आवश्यक आणि आविभाज्य घटक आहेत. त्यात उच्च-नीच असा भेदभाव नाही.
असो. या सगळ्यांबद्दल पुढे ‘चातुवर्ण मया सृष्टय़ं गुणकर्म विभागश।’ या चौथ्या अध्यायातील तेराव्या श्लोकावर भाष्य करताना सविस्तरपणे बोलू.
आता पुन्हा मागील लेखात उल्लेखिलेल्या दुसऱया अध्यायातील श्लोकांबद्दल बोलू या.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, हे अर्जुना तू एक क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं परमकर्तव्य म्हणजे समाजाचं संरक्षण करणं. त्यासाठी अनेकदा युद्ध करून शत्रूंचा नायनाट करावा लागतो.
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम्।
सुखिन क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्।।32।।
अथ तेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि।
तत स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्यसि।।33।।
अकीर्ति च अपि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययाम।
संभावितस्य च अकीर्ति मरणात् अतिरिच्यते।।34।।
भावार्थ ः हे अर्जुना युद्ध म्हणजे दैवयोगाने आपोआप उघडे सापडलेले स्वर्गाचे दार केवळ भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. असं असूनदेखील जर तू हे धर्मयुद्ध करणार नसशील तर तू स्वधर्म सांडलास म्हणून कीर्ती गमावून बसशील आणि पापाचा धनी होशील. इतकंच नव्हे तर सर्व लोकांत तुझी अपकीर्ती होईल. अशा प्रकारची अपकीर्ती ही सन्माननीय लोकांसाठी मरणाहूनही अधिक क्लेशदायक असते.
ज्ञानेश्वर माऊली या तीन श्लोकांवर भाष्य करताना म्हणतात…
क्षत्रिये बहुपुण्य कीजे। तै झुंज ऐसे लाहिजे।
जैसें मार्गे जातां आडळिजे। चिंतामणी।।
हे युद्ध टाळलंस तर…
असती कीर्ति जाईल। जगचि अभिशापु देईल।।
आणि गिंवसित पावतील। महादोष।।
म्हणोनि स्वधर्मु हा सांडसील। तरी पापा वरपडा होसील।
आणि अपेश ते न वचेल। कल्पांतवरी।।
इथे भगवंतांनी 33 व्या श्लोकात ‘पापम्’ हा शब्द वापरला आहे. या पापम् म्हणजे पाप या शब्दाबद्दल पुढील लेखात सविस्तर बोलू या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List