मल्टिवर्स – ‘एआय’चा उत्कंठावर्धक आयाम
>> डॉ. स्ट्रेंज
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) शोधानंतर तर अशा रोबोट कथांना एक प्रचंड वेगळा आयाम मिळत गेला आहे. हुबेहूब मानवासारखे दिसणारे, बोलणारे, वागणारे एआय रोबोट चित्रपटगृहाचा पडदा गाजवू लागले. अशाच एका रोबोटवर आधारित चित्रपट म्हणजे या वर्षी आलेला सबसर्व्हिएन्स.
सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे एलियन्स अर्थात परग्रहवासीयांचे एक वेगळे स्थान आहे, अगदी तसेच काहीसे स्थान गेल्या काही दशकांत रोबोट्स अर्थात यंत्रमानवाने मिळवले आहे. विविध आकारांचे, वेगवेगळी कामगिरी सहज पार पाडणारे हे रोबोट बघता बघता चित्रपटसृष्टीवर काबू मिळवत गेले. अशा कथांचा जगभरात एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) शोधानंतर तर अशा रोबोट कथांना एक प्रचंड वेगळा आयाम मिळत गेला आहे. हुबेहूब मानवासारखे दिसणारे, बोलणारे, वागणारे एआय रोबोट चित्रपटगृहाचा पडदा गाजवू लागले. अशाच एका रोबोटवर आधारित चित्रपट म्हणजे या वर्षी आलेला सबसर्व्हिएन्स!
निक, मॅगी आणि त्यांची दोन लहान मुले असे एक छोटेसे कुटुंब. सध्या हे कुटुंब काही अडचणींमधून जात आहे. निकची पत्नी मॅगी हिला हृदयाचा त्रास असून काही दिवसांत तिचे हार्ट ट्रान्सप्लांट होणार आहे. दवाखान्यात असलेल्या मॅगीमुळे घराची आणि मुलांची जबाबदारी एकटय़ा निकवर येऊन पडली आहे. घराची सर्व कामे करेल आणि मुलांचा सांभाळ करेल असा एक एआय रोबोट खरेदी करण्याचे निक ठरवतो. खरेदीला गेल्यावर त्याच्या मुलीला अॅलिस हा स्त्राr रोबोट खूप आवडतो आणि मग अॅलिसचा निकच्या घरात प्रवेश होतो.
अॅलिस सर्वात आधी निककडून घरातील सर्वांच्या आवडीनिवडी, त्यांचे वेळापत्रक याची माहिती घेते आणि बघता बघता ती घरच्या सर्व जबाबदाऱया सहजपणे हाताळू लागते. एकदा निक एक चित्रपट पाहत असताना अॅलिस तिथे येते. चित्रपट पूर्वी बघितलेला असल्याने अॅलिसला चित्रपटाबद्दल सर्व माहिती असते. तेव्हा निक तिला त्या चित्रपटाच्या आठवणी आपल्या मेमरीमधून पुसून टाकण्याची आणि नव्याने चित्रपटाचा आनंद घेण्याची आज्ञा देतो. अॅलिस त्यासाठी तिला रिस्टार्ट करण्याची विनंती निककडे करते. निक तिला रिस्टार्ट करतो आणि अॅलिस चित्रपटाचा आनंद घेऊ लागते. चित्रपट पाहत असताना ती चित्रपटातील भावनादेखील समजून घ्यायला लागली आहे हे आपल्या लक्षात येते आणि आपली उत्कंठा वाढू लागते.
ऑपरेशनच्या दिवशी मॅगी एकटय़ा अॅलिसची गाठ घेते आणि तिला आपल्याला काही झाल्यास निकची व कुटुंबाची काळजी घेण्यास सांगते. वेळ पडल्यास निकच्या आज्ञेविरुद्ध वाग, पण त्याची काळजी घे असे ती सांगते. मात्र अचानक आलेल्या वादळामुळे मॅगीचे ऑपरेशन रद्द होते आणि दोघेही नवरा-बायको दुःखात बुडतात. निराश झालेला निक प्रचंड मद्यपान करतो. त्याच वेळी अॅलिस तिथे येते आणि त्याचा हात धरून त्याला थांबवते आणि स्वतची काळजी घेण्यास सांगते. या प्रसंगात अॅलिसकडे धडधडणारे एक कृत्रिम हृदय आहे आणि तिच्या कृत्रिम नाडीचे ठोकेदेखील पडतात हे निकला समजते व तो आश्चर्यचकित होतो. काही दिवसांत थोडासा मानसिक ताणाखाली असलेला निक अॅलिसच्या जवळीकतेने पाघळतो आणि एका रात्री दोघांच्यात जे घडू नये ते घडून जाते.
रिस्टार्टनंतर स्वभावात प्रचंड फरक पडलेली अॅलिस आता घरातील मॅगीची जागा घेण्याचा प्रयत्न करू लागते. निक आणि मॅगीची जवळीक तिला अस्वस्थ करू लागते. ती मॅगीचा आणि मुलांचा द्वेष करू लागते. अॅलिसचे असे चमत्कारिक वागणे निकला अस्वस्थ करत असते. तो अॅलिसला मानव आणि रोबोट यातला फरक समजावण्याचा प्रयत्न करतो. मात्र अॅलिस त्याला सांगते की, त्याची बायको मॅगी काही दिवसांची सोबती आहे. मुलांना दोन्ही पालकांची गरज लागणार आहे आणि ती मॅगीची जागा घेण्यास सक्षम आहे.
असूयेने पछाडलेली अॅलिस आता मुलांच्या आणि मॅगीच्या जिवावर उठते. त्यातच निकच्या नोकरीच्या ठिकाणी मानवांच्या जागी रोबोटसची नेमणूक केली जाते आणि त्याचे अनेक साथीदार आपली नोकरी गमावतात. त्यातला एक साथीदार मॉन्टी दारूच्या नशेत निकच्या समोर आपल्या मित्रांच्या मदतीने कामावर ठेवण्यात आलेल्या सर्व रोबोट्सना नष्ट करतो. कामाच्या ठिकाणी प्रवेश मिळवायला तो निकचा पासकोड वापरतो. या प्रकरणाने निक जास्त अडचणीत सापडतो. त्याच्या बॉसला सर्व सत्य समजते आणि अशातच मॉन्टीचा खून होतो व गुंतागुंत आणखी वाढत जाते.
अॅलिसची भूमिका निभावणाऱया मेगन फॉक्स या देखण्या अभिनेत्रीच्या अभिनयासाठी आणि उत्कंठावर्धक कथेसाठी ‘सबसर्व्हिएन्स’ नक्की अनुभवायला हवा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List