अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात आजही प्रेम, काळजी..; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीच दिला घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम!
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. या दोघांच्या संसारात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर या दोघांनी घटस्फोट घेतला असून ते वेगळे राहत असल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर अभिषेक आणि ऐश्वर्याचे असे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, जे पाहून त्यांच्या नात्यात अजूनही प्रेम आणि एकमेकांविषयी काळजी असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा केवळ अफवा असल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ मुलगी आराध्या बच्चनच्या शाळेतल्या कार्यक्रमातील आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही धिरुभाई अंबानी शाळेकडून वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शाळेत अनेक सेलिब्रिटींची मुलं शिक्षण घेतात. गेल्या वर्षीही आराध्याने वार्षिक कार्यक्रमात परफॉर्म केलं होतं. यावर्षीही तिचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्या हे अमिताभ बच्चन यांच्यासोबत पोहोचले होते.
यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. शाळेबाहेर बच्चन कुटुंब पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी काही जण आले होते. यावेळी ऐश्वर्या ही सासरे अमिताभ बच्चन यांचा हात धरून त्यांना काहीतरी समजावताना दिसली. याच वेळी तिच्या ड्रेसचा दुपट्टा खाली लोळत असल्याने अभिषेकने तो काळजीपूर्वक उचलण्याचा प्रयत्न केला. अभिषेकचं हे वागणं पाहून या दोघांच्या नात्यात अजूनही प्रेम आणि काळजी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक शाळेतल्या एका महिलेसोबत हसत गप्पा मारताना दिसत आहेत. त्यानंतर पुन्हा आत जाताना अभिषेक ऐश्वर्याचा दुप्पटा तिच्या पायाखाली येऊ नये म्हणून उचलून बाजूला करतो.
विशेष म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या हे तिघं एकाच गाडीतून घरी जाताना दिसले. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यानच काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्या एका लग्नसमारंभातही एकत्र पोहोचले होते. त्यामुळे हे दोघं विभक्त होणार नाही, त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List