‘मधुबाला’, ‘नागिन 3’चे आर्ट डायरेक्टर सुमित मिश्रा यांचं निधन; आत्महत्येचा संशय
‘नागिन 3’ आणि ‘मधुबाला’ यांसारख्या मालिकांचे आर्ट डायरेक्टर सुमित मिश्रा यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. सुमित मिश्रा हे आर्ट डिझायनरसोबतच प्रॉडक्शन डिझायनर, निर्माते आणि पेंटरसुद्धा होते. ते मणिकर्णिका फिल्म फेस्टिव्हलचेही जनक होते. त्यांच्या अचानक निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक समस्यांचा सामना करत होते. त्यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. सुमित यांचं सोशल मीडिया अकाऊंट पाहता ते कोणत्या अडचणीत होते का, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. आपण एखाद्या संकटात किंवा अडचणीत आहोत हे त्यांनी कोणालाच कळू दिलं नाही. सुमित मिश्रा यांच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
‘मणिकर्णिका फिल्म फेस्टिव्हलचे जनक सुमित मिश्रा राहिले नाहीत’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘एकदा हाक दिली असती तर धावत तुझ्या मदतीला आलो असतो’, असं दुसऱ्याने म्हटलंय. सुमित मिश्रा हे मूळचे बिहारचे होते. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून शिक्षण घेतलं होतं. त्यांनी 2016 मध्ये ‘अमृता अँड आई’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 2020 मध्ये त्यांचा खिडकी हा चित्रपट प्रदर्शित झाला. 2022 मध्ये त्यांनी ‘अगम’ या चित्रपटाचीही निर्मिती केली. सुमित यांनी ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या प्रवासाची सुरुवात केली. याशिवाय त्यांनी ‘अलिफ’, ‘नागिन 3’, ‘मधुबाला’, ‘वेक अप इंडिया’ यांसारख्या अनेक प्रोजेक्ट्ससाठी आर्ट डायरेक्टर म्हणून काम पाहिलं.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “मला मल्टी-टास्कर म्हणून काम करायला आवडतं. एकाच वेळी मी बरीच कामं करू शकतो. जवळपास अडीच दशकापूर्वी मी मुंबईत कामानिमित्त आलो होतो. सुरुवातीला मी बरेच आर्ट एक्झिबिशन लावले. नंतर प्रॉडक्शन डिझायनिंगमध्ये कामाच्या संधीची वाट पाहिली. माझं साहित्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच लिखाणाकडे मी आपोआप आकर्षित झालो. एका गोष्टीतूनच दुसऱ्या गोष्टीचा विस्तार होत जातो. कोणत्या एका कारणामुळे मी दुसऱ्या गोष्टीला संपवू शकत नाही. सत्य हेच आहे की मला मल्टी-टास्कर व्हायला आवडतं, म्हणूनच मी या सगळ्या क्षेत्रांत मनापासून काम करत आलोय. त्यातून मला वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List