‘आई तुळजाभवानी’ मालिकेत शिवकन्या अशोकसुंदरीची रंजक कथा
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत शिवकन्या अशोकसुंदरी देवीच्या भेटीला येणार आहे. पार्वतीचा एकटेपणा दूर करण्यासाठी महादेवांनी ही दैवी रचना रचली आहे. अशोकसुंदरीच्या येण्याने आई तुळजाभवानीच्या वैयक्तिक आयुष्यात घडणारा बदल आणि भक्तरक्षणाच्या कार्यात तिला मिळणारी साथ हा अत्यंत रंजक असा माया, ममता, शौर्य यांचा मिलाफ असलेला अनोखा कथाभाग पाहायला मिळेल. अभिनेत्री राधा धारणे या मालिकेत शिवकन्या अशोकसुंदरीच्या भूमिकेत झळकणार आहे.
आपल्या पात्राबद्दल बोलताना राधा धारणे म्हणाली, “आजवर मी अनेक मालिका केल्या आहेत. याचसोबत मराठी चित्रपटांमध्ये देखील कामं केलं आहे. या अभिनय प्रवासातला महत्वाचा टप्पा आता सुरू होतोय आणि तो म्हणजे मी कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत शिवकन्या अशोकसुंदरी साकारणार आहे. मला हे पात्र खूपच आवडलं आहे. यासाठी माझा लूक अत्यंत सुंदर आहे. तिची ज्वेलरी आणि कॉस्च्युम खूप अप्रतिम करण्यात आलं आहे. या पात्रासाठी मी तयारी देखील करतेय. माझी भाषा, वाक्प्रचार, उच्चार यासाठी विशेष तयारी करतेय. नुकताच आम्ही प्रोमो शूट केला. ज्यामध्ये खूप वेगळेपण जाणवलं. एक सकारात्मक दैवी ऊर्जा काय असते, याचा प्रत्यय मला आला. मी अशोकसुंदरी साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
‘आई तुळजाभवानी’ मालिकेतील हा विशेष एपिसोड प्रेक्षकांना येत्या 23 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पहायला मिळेत. तर ही मालिका दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. राज्यातल्या प्रत्येक घराघरात भक्तिभावाने बघितल्या जाणाऱ्या ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आतापर्यंत भक्त रक्षणासाठी आईने केलेले अनेक चमत्कार बघायला मिळाले. मालिकेत प्रेक्षकांना आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास अनुभवायला मिळाला. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे मुख्य भूमिका साकारतोय. याविषयी ती म्हणाली, “आई तुळजाभवानी’ची भूमिका साकारताना आसपास खूप सकारात्मक ऊर्जा जाणवतेय. पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे. मालिकेची संपूर्ण अनुभवी टीम आणि तिचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या मार्गदर्शनाने ‘आई तुळजाभवानी’ ही भूमिका मनापासून साकारुन प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ उतरेन असा दृढ विश्वास मी व्यक्त करते.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List