संसदेच्या आवारात धुमश्चक्री, भाजपचे दोन खासदार जखमी; राहुल गांधींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
भारतरत्न, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात देशभरात आंदोलनाचा वणवा भडकला आहे. ‘बाबासाहब का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत जनता रस्त्यावर उतरली. त्याच वेळी संसदेच्या आवारात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धुमश्चक्री उडाली. काँग्रेस व इंडिया आघाडीच्या खासदारांना भाजप खासदारांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने धक्काबुक्की, रेटारेटी झाली. त्यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले.
राहुल गांधी यांनी भाजप खासदार मुकेश राजपूत यांना धक्का दिला. त्यांचा धक्का लागून प्रताप सारंगी कोसळले आणि त्यांच्या डोक्याला मार लागल्याचा आरोप भाजपने केला तर राहुल यांनी हा आरोप फेटाळला. भाजप खासदारांनी मला धक्काबुक्की केली, धमकावले. संसदेचे मुख्य गेट असलेल्या मकरद्वाराजवळ घेराव घालून संसदेत जाण्यापासून आम्हाला रोखण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांनाही धक्का देण्यात आला. त्यात खरगे यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचा प्रत्यारोप करण्यात आला. प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या डोक्याला इजा झाली असून त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संसदेच्या परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘जय भीम’चा नारा दिला.
अमित शहांचा ‘तो’ व्हिडीओ हटवण्यासाठी दबाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे ही आजकाल फॅशन झाली आहे, असे सांगत अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल अनुद्गार काढले होते. या भाषणाचा व्हिडीओ हटवण्यासाठी आता दबाव टाकला जात आहे. बुधवारी रात्री विरोधी पक्षातील अनेक नेते, काँग्रेस खासदार, काँग्रेसचे अधिकृत एक्स हँडल यांना ई-मेल आले. यात सरकारने आम्हाला शहांचा संबंधित व्हिडीओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत, असे या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
बाबासाहेबांचा भाजपकडून पुन्हा अपमान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस व इंडिया आघाडीच्या खासदारांनी बुधवारी संसदेच्या बाहेर आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न भाजपने केला. भाजपने अधिकृत एक्स अकाऊंटवर या आंदोलनाचा मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केला आहे. त्यात डॉ. आंबेडकरांच्या फोटोच्या जागी उद्योजक जॉर्ज सोरोसचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला. भाजपने बाबासाहेबांच्या फोटोशी छेडछाड करून आज पुन्हा एकदा त्यांचा अपमान केला आहे. हीच भाजपची मानसिकता आहे, असे प्रियंका म्हणाल्या.
आंबेडकर यांना मानणारे भाजपचे समर्थन करू शकत नाहीत!
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा संदर्भ देत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र पाठवले आहे. ‘बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे भाजपचे समर्थन करू शकत नाहीत’, ही लोकांची भावना असल्याचे केजरीवाल यांनी नमूद केले. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडची भाजपसोबत युती आहे. केजरीवाल यांनी नितीश यांना भाजपची साथ सोडण्याचा सल्ला दिला. तुम्ही यावर सखोल विचार करावा, असे लोकांना वाटते, असे केजरीवाल नितीश यांना उद्देशून म्हणाले.
संविधान नसते तर अमित शहा कचरावेचक असते – सिद्धरामय्या
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना नसती तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कचरावेचक झाले असते, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकेचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शहा यांना सणसणीत टोला लगावला. अमित शहा यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. जर राज्यसभा सभापती खरोखरच घटनेला अनुसरून कामकाज चालवत असतील तर शहा यांना तत्काळ सभागृहातून निलंबित करावे, अशी मागणीही सिद्धरामय्या यांनी केली. ते कर्नाटक विधानसभेत बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, भाजप खासदारांनीच धक्काबुक्की केली
या घटनेनंतर प्रसारमाध्यमांनी राहुल यांना धक्काबुक्कीबाबत प्रश्न विचारला असता, भाजप खासदारांनीच धमकावले आणि धक्काबुक्की केली. संसदेत जाणे हा आमचा अधिकार असताना त्यांनी आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखले. हे संसदेचे प्रवेशद्वार आहे आणि मी आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. तुमच्या कॅमेऱ्यात सर्वकाही कैद झाले असेलच, असे ते म्हणाले. मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी आणि मला धक्काबुक्की झाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले, तर खरगे यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असून पुन्हा त्याच ठिकाणी दुखापत झाल्याचे सांगितले.
सलग दुसऱ्या दिवशी कामकाज तहकूब
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज सलग दुसऱया दिवशी गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहातील कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ केला आणि ‘जय भीम’चा नारा लावून धरला.
संसदेबाहेर निषेध मोर्चा; राहुल, प्रियंका यांनी परिधान केले निळ्या रंगाचे कपडे
अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी हे निळय़ा रंगाचे कपडे परिधान करून संसदेत आले होते. यावेळी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीच्या सर्व खासदारांनी अमित शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत संसद परिसरात मोर्चा काढला.
अदानींच्या मुद्दय़ावरून लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न – राहुल गांधी
आम्ही शांततेने आंदोलन करण्यासाठी आलो होतो, परंतु भाजपने मसल पॉवर दाखवली. अदानींसारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ावरून लक्ष हटवण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही संसदेत रोज आंदोलन करत होतो, मात्र भाजपने आज अचानक आंदोलन करण्याची योजना आखली. याला आमचा विरोध नाही, परंतु जेव्हा आम्ही संसदेत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला रोखण्यात आले आणि धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. संसद सुरक्षेतील अधिकारी, कर्मचारी तिथे उपस्थित होते. सर्वांनी पाहिले भाजपाचे लोक आक्रमक झाले होते.
उल्हासनगरमध्ये माफी मांगो
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्याच्या निषेधार्थ आज शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनामध्ये मोठय़ा संख्येने आंबेडकर अनुयायी जमले. त्यांनी अमित शहा यांच्याविरोधात घोषणाही दिल्या. तर उल्हासनगरमध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा माफी मांगो अशी मागणी करीत निदर्शने केली. कसाऱयातदेखील वंचित बहुजन विकास आघाडीने आंदोलन छेडून आपला संताप व्यक्त केला.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई येथे निषेध आंदोलनं केले.या आंदोलनात संविधानवादी आणि फुले- आंबेडकरवादी जनता मोठय़ा प्रमाणात सहभागी झाली होती.
- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि बांसुरी स्वराज यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी राहुल यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे, तर काँग्रेसनेही धक्काबुक्कीची तक्रार पोलिसांकडे केली आहे.
- प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या डोक्याला इजा झाली असून त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजपूत यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List