‘नीलकमल’वर कारवाईचा बडगा; प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र निलंबित
गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला जात असताना अपघात झालेल्या नीलकमल बोटीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते असा ठपका ठेवत या बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र व सर्व्हे प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे.
बुधवारी 11 डिसेंबरला हा अपघात झाला. यात 15 प्रवाशांचा बळी गेला. सागरी मंडळाने या घटनेची चौकशी केली. 80 प्रवासी आणि सहा कर्मचारी अशी या बोटीची क्षमता होती. तरीही अपघाता वेळी या बोटीवर एकूण 110 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते. त्यामुळे या बोटीवर कारवाई करण्यात आली आहे, असे अधिकाऱयाने सांगितले. प्रवासी वाहतुकीसाठी ही तिन्ही प्रमाणपत्रे महत्त्वाची असतात.
परवाना प्रमाणपत्र बंधनकारक
बोट मास्टर आणि इंजिन ड्रायव्हर म्हणून काम करण्यासाठी मुंबई सागरी मंडळाची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन परवाना प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. या प्रमाणपत्राशिवाय बोट मास्टर आणि इंजिन ड्रायव्हर म्हणून काम करता येत नाही.
बोट मास्टर, इंजिन ड्रायव्हरची चौकशी
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याचा ठपका ठेवत बोटीतील डेकची जबाबदारी असणाऱ्या बोट मास्टर आणि इंजिनचा प्रमुख म्हणून इंजिन ड्रायव्हरची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषी आढळल्यास त्यांचाही परवाना रद्द होऊ शकतो, असे मंडळाच्या अधिकाऱयाने सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List