लालबागमधील आठवडा बाजार बंद करा! रहिवासी, वाहनचालकांना होतोय त्रास, शिवसेनेची महापालिकेकडे मागणी
लालबागच्या एस. एस. राव मार्गावर गेल्या काही वर्षांपासून दर रविवारी भरणारा आठवडा बाजार हा तेथील रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. बेस्ट बस आणि खासगी वाहनचालकांनाही वाहन चालवणे जिकरीचे होते. अशाने अपघाताचा धोकाही संभवतो. त्यामुळे रहिवासी आणि वाहनचालकांना त्रासदायक ठरणार हा आठवडा बाजार बंद करा, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
लालबाग परिसरातील डॉ. एस. एस. राव मार्गावरील डोमिनोज पिझ्झा दुकानापासून ते सोफी महल इमारत (गणेश कलर लॅब) येथे गेल्या 5 ते 7 वर्षांपासून दर रविवारी आठवडा बाजार भरतो. हा बाजार दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 10.30 वाजेपर्यंत चालतो. हा मार्ग अतिशय अरुंद असून येथे बेस्ट बस व परिसरातील इमारतीच्या खासगी वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे या आठवडा बाजारात फार गर्दी असते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना या मार्गावरून ये-जा करताना तसेच वाहने चालवताना फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी बाहन अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तसेच या बाजारात बसणारे माल विव्रेते हे बहुतांशी मुंबईबाहेरहून आलेले असतात. याबाबत संबंधित सहाय्यक महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार व चर्चादेखील केलेली आहे, मात्र त्यावर ठोस अशी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा आठवडा बाजार कायमस्वरूपी बंद करून परिसरातील रहिवाशांना, वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List