नाट्यरंग – बालनाटकांची दुनिया भारी…
<<<आशीष निनगुरकर>>>
‘इडियट बॉक्स’ पासून आपल्या मुलांना कसं काय दूर ठेवावं?, हे सध्याच्या काळात पालकांसमोर उभं ठाकलेलं एक मोठ्ठं आव्हान! दर्जेदार पुस्तकांचं वाचन किंवा मैदानी खेळांसोबतच ‘बालनाट्य’ हाही टीव्हीपासून आपल्या पाल्ल्यांना दूर ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेक दमदार बालनाट्य रंगभूमीवर आहेत ही सध्याची वास्तव एक जमेची बाजू! या नाटकांवर प्रकाशझोत टाकला असता ही नाटके काळजाचा ठाव घेतात.
मराठी बालरंगभूमीला मोठी परंपरा आहे. मात्र मधल्या काळात या नाट्यांचा दर्जा घसरल्याची ओरड होत आहे. बालनाट्यनिर्मात्यांनी तिकीटविक्रीचे भय न बाळगता विविध विषयांवरची दर्जेदार नाटके सादर करण्याची हिंमत दाखवली, तर बालनाट्य चळवळीला पुन्हा चांगले दिवस येतील. रत्नाकर मतकरी व प्रतिभा मतकरी यांनी स्वतची ‘बालनाट्य’ ही संस्था स्थापन करून ‘अचाट गावची अफाट मावशी’, ‘इंद्राचे आसननारदाची शेंडी’, ‘अलबत्त्या गलबत्त्या’, ‘अदृश्य माणूस’ अशी अनेक उत्तमोत्तम बालनाट्ये सादर केली. 1966 सुमारास नरेंद्र बल्लाळ व कुमुदिनी यांनी ‘नवल रंगभूमी’ या संस्थेची स्थापना केली आणि वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित ‘मंगळावर स्वारी’ हे बालनाट्य सादर केले. एक मोठ्ठे यान रंगमंचावरून आभाळात उडण्याचे दृश्य पाहताना लहानथोर प्रेक्षकांना मजा वाटायची. बल्लाळांच्या ‘राजाला फुटले पंख’ नाटकात सुमंत वरणगांवकर यांनी राजा आभाळात उडताना दाखवला होता. ‘बोलका बाहुला’, ‘एक होता जोकर’ ही बालनाट्ये गाजली.
‘पाचूनगरीत अंजू’ या नाटकात नेपथ्य नाचत नाचत रंगमंचावर येत असे व दृश्य संपताच नाचत नाचत दुसऱ्या विंगेत (अंधार न होता) जात असे. ही संकल्पना प्रसिद्ध नेपथ्यकार रघुवीर तळाशिलकर यांची होती. 1970च्या सुमारास वंदना विटणकर आणि त्यांचे चित्रकार पती चंद्रकांत विटणकर यांनी वंदना थिएटर्सतर्फे ‘टिमटिमटिम्बू बम बम बगडम्’, ‘परिकथेतील राजकुमार’, ‘रॉबिनहूड’ अशी विविध विषयांची बालनाट्ये सादर केली. नेपथ्य अर्थात चंद्रकांत विटणकर यांचे असायचे. विशेष ‘परीकथेतील राजकुमार’ या बालनाट्यातील नेपथ्य अतिशय देखणे होते. वंदनाताई आणि सुधाताई यांच्या बालनाट्यात देखणे नेपथ्य आणि हमखास छान छान गाणी असायची. त्यानंतर 1975 साली विजू नवरे लिखित ‘जाड्या रड्या आणि चमच्या’ हा बालनाट्यातील पहिला फार्स दिग्दर्शित केला. हे बालनाट्य महाराष्ट्रभर गाजले. पुढे चित्रा पावसकर यांच्या प्रेरणा थिएटर्सतर्फे ‘सुलट्याचं उलट, उलट्याचं सुलट’ हे बालनाट्य सर्वार्थाने गाजले. या बालनाट्याने अंबर हडप, प्रसाद बर्वे, तेजा पावसकर, गणेश पंडित, सचिन दरेकर, प्रशांत लोके, रोहन गुजर हे कलावंत रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मिळाले. 1984 साली विनोद हडप यांनी लिटिल थिएटर्सतर्फे ‘अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या’ हे बालनाट्य लिहून दिग्दर्शित केले. पुढे लिला हडप यांनी विनोद हडप यांच्या बालनाट्य चळवळीत मोलाचे सहकार्य केले. विनोद हडप यांनी ‘पोर झिपरी शाळा बिनछपरी’, ‘ज्युरासिक पार्क ते शिवाजी पार्क’ अशी रंजकदार बालनाट्ये लिहिली. गणेश पंडितला दिग्दर्शनाची पहिली संधी विनोद हडप यांनी दिली.
नुकतेच या समूहात येऊ घातलेलं नाटक म्हणजे ‘आज्जीबाई जोरात’. आजची लहान मुले ही रंगभूमीची उद्याची प्रेक्षक आहेत. त्यांना नाटक या माध्यमाविषयी ओढ वाटावी, त्यांनी नाटक पाहायला यावं, असं तळमळीने नेहमीच म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात त्यांना नाटकाची गोडी लावायची असेल, तर त्यांना आपलीशी वाटतील आणि त्यांच्या भावविश्वाशी निगडित असतील, अशी दर्जेदार बालनाट्य निर्माण व्हायला हवीत. हीच गरज पूर्ण करणारं, नव्या पिढीच्या प्रॉब्लेम्सविषयी बोलणारं आणि नव्या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून मुलांचं मनोरंजन करणारं बालनाट्य रंगभूमीवर आलं आहे, ते म्हणजे ‘आज्जी बाई जोरात.’
आधुनिक तंत्रज्ञानासहित, आजच्या मुलांची मानसिकता ओळखत त्यांना पुन्हा एकदा मातृभाषेच्या संस्कारांपर्यंत घेऊन जाणारं क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित हे नाटक आहे. जिगीषा-अष्टविनायकची निर्मिती आहे. आज तंत्रज्ञानाच्या पुरत्या आहारी गेलेल्या मुलांना त्यांच्या कलाकलानं पुनश्च आजूबाजूच्या जगाकडे, पुस्तकं, वाचनसंस्कार, त्यातून त्यांचा होणारा व्यक्तिमत्त्व विकास यांकडे वळवणं ही खूपच कठीण गोष्ट झाली आहे. प्रत्येक गोष्ट हाताच्या बोटांवर मिळण्याची सवय लागलेल्या या पिढीच्या मनोरंजनाचा वेगळा विचार करणं त्यामुळेच निकडीचं झालं आहे. हल्ली मुलांना खेळायला मैदानं उरली नाहीत. पूर्वीसारखी आजी-आजोबांसहची एकत्र कुटुंबं उरलेली नाहीत. त्यामुळे मुलांच्या त्यांच्याबरोबरच्या गप्पागोष्टी वगैरे सगळंच संपलं आहे. हल्ली घरात एखादंच मूल असतं. ना त्याला भावंड असत, ना मित्र. अशावेळी त्याला मोबाइल घेऊन दिला की त्याचा तो आपोआपच रमतो असा पालकांनी आपला ग्रह करून घेतलेला आहे. मुलांना द्यायला पालकांकडेही वेळ नाही. तेही सोशल मीडिया आणि आपल्या रोजच्या व्यवधानांत कमालीचे व्यग्र झालेले आहेत. याचे जे काही भयंकर परिणाम आजच्या पिढीवर होत आहेत, त्याची पुसटशीही कल्पना त्यांना नाही. आणि जेव्हा कधीतरी अचानकपणे हे वास्तव त्यांच्या समोर येतं तेव्हा ते मग बावचळून जातात. पण तेव्हा खूपच उशीर झालेला असतो. या व्यथेलाच बालनाट्याच्या रूपात हात घालणारं ‘आज्जीबाई जोरात‘ हे नाटक आहे. एकीकडे आजच्या पिढीचं तंत्रज्ञान वापरून मुलांना त्यात खिळवून ठेवत त्यांच्यावर भाषेचे संस्कार करीत त्यांचं भरपेट मनोरंजनही करायचं असा तिहेरी घाट या नाटकानं घातला आहे.
अभिनय बेर्डे याने लहान असलेलं पात्र साकारताना त्यात आवश्यक असलेला निरागसपणा त्याने अगदी अचूक पकडला आहे. आजीच्या भूमिकेत असलेल्या निर्मिती सावंत यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. त्यांचा अचाट उत्साह पाहून थक्क व्हायला होतं. अक्षरला प्रेमानं समजावणारी आजी, मध्येच पात्रातून बाहेर येऊन प्रेक्षकांमधल्या मुलांशी बोलणारी आजी आणि प्रशिक्षित नृत्य कलाकारांसह तितक्यात उत्साहाने नृत्य करणारी आजी, हे त्यांचं रूप प्रत्येकाच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. पुष्कर श्रोत्री यांचा वेगवेगळी भाषा बोलणारा ‘अ’ पुरेपूर हशा वसूल करतो. मुग्धा गोडबोले यांनी साकारलेली आई प्रत्येक मुलाला आपल्या आईसारखीच वाटते. जयवंत वाडकर यांनी साकारलेला ‘गेमाड’ व्हिलनही हटके आहे.
प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना नाटकाला हवी असलेली भव्यता प्राप्त करून देते. सौरभ भालेराव यांचं संगीत लहान मुलांसह मोठ्यांनाही ताल धरायला लावतं. सुभाष नकाशे यांच्या नृत्यरचना सोप्या पण अतिशय कल्पक आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेली लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवाजातील नाटकाची घोषणा सुखद धक्का देऊन जाते.
पूर्वी दोन किंवा तीन अंकी बालनाट्ये असत. राजू तुलालवार यांनी तीन विविध विषयांवरील बालनाट्य सादर करण्याची प्रथा सुरू केली. सध्या 25 ते 30 मिनिटे कालावधी असलेल्या तीन ते पाच बालनाटिका सादर केल्या जातात. विविध विषय असल्यामुळे बालप्रेक्षक त्यात रंगून जातात. पालकही बालपण आठवून आनंद लुटतात. रत्नाकर मतकरी, माधव साखरदांडे व त्यांच्यासारख्या अनेक प्रतिभावंत लेखकांनी लिहिलेल्या बालनाट्यांचे आजही आवर्जून प्रयोग केले जातात. वृत्तपत्रे, रेडिओ व दूरदर्शन, चित्रपट यांच्या व्यतिरिक्त फारशी माध्यमे नसल्याने नाटकांनाही प्रेक्षकवर्ग पुरेशा प्रमाणात लाभत असे. मात्र विद्यमान काळात इंटरनेट, भरमसाठ दूरचित्रवाहिन्या आदी माध्यमेही अवतरली असल्याने लोक तिथे जास्त आकर्षित झाले आहेत. इंटरनेट, मोबाईलवर लहान मुलांसाठी असणारे विविध गेम्स, त्याचप्रमाणे काटरून चॅनेल्स यांमध्ये आजची मुले गुंतत चालली आहेत. कार्टून फिल्मस्, सिरियल, गेम्स यांच्यामध्ये जी क्रिएटिव्हीटी आहे तितकीच ती मराठी बालरंगभूमीमध्येही आहे. झाले आहे एवढेच की सध्या अभिनेत्यापासून दिग्दर्शक ते तंत्रज्ञ या सार्यांचा कल थेट व्यावसायिक नाटके, चित्रपट, सिरियल्स यांच्यामध्ये जाण्याचा असतो. त्यामुळे बालरंगभूमीला उत्तम लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञांची वानवा भासू लागली आहे.
‘शाळा सुटता, पुस्तक मिटता, करुया आपण गमत्या जमत्या… अलबत्या गलबत्या…अलबत्या गलबत्या…’ असं म्हणत चिंची चेटकिणीची धमाल प्रेक्षकांना हसवत हसवत थरार, उत्सुकता आणि विनोदाची तिहेरी मेजवानी देते. चेटकीण झालेले निलेश गोपनारायण यांच्याबरोबरच सनीभूषण मुणगेकर, श्रद्धा हांडे आदि दहा कलाकारांची फौज आपल्या अफलातून उत्साहाने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करते. अनेक विक्रमांना गवसणी घालत ‘अलबत्या गलबत्या’ बालनाट्याची घौडदौड सुरू आहे. कोविडचा काळ सोडला तर सहा वर्षांत 800 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे आणि विक्रमी 1000 व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचलले आणि या बालनाट्यानं इतिहास घडवला. या नाटकाने बालरंगभूमीवर अनेक यशस्वी प्रयोग केले आता सलग नाट्यानुभवाचा ऐतिहासिक प्रयोग करत जागतिक विक्रमाच्या मानाचा तुरा नाटकाच्या शिरपेचात रोवला आहे. या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.
नाटक हे चित्रपट किंवा मालिका यांच्यासारखे नसते. सर्व प्रकार हा लाईव्ह असतो. यात रिटेक नसतो. यामुळे जे घडतं ते अगदी आपल्यासमोर लाईव्ह असते. हाच सर्व अनुभव प्रेक्षकांना खूप आनंद देणारा असतो. नाटकातील प्रसंगांना तात्काळ दाद मिळते, हा अनुभव भन्नाटच असतो. नाटकादरम्यान प्रचंड उत्साहाने आरडाओरडा करत सहभागी होणारी आणि नाटकानंतर सगळ्या पात्रांना येऊन बिलगणारी पोरं, हीच त्याच्या यशाची पावती आहे. त्यामुळे सगळ्या पालकांनी आणि मुलांनी बालनाटकांचा एकत्र नक्की हा अनुभव घ्यायलाच हवा.हे नाटक लहान मुलांसाठी धमाल करण्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. हे बालनाट्य आणि अनेक बालनाट्य यथायोग्य वेळ काढून पालकांनी आपल्या पाल्यांना दाखवावीत.
[email protected]
(लेखक नाट्य व चित्रपट अभ्यासक आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List