‘दिल मिल गए’ फेम अभिनेत्याचा लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोट; 9 वर्षांपूर्वीच पत्नीने सोडलं घर
‘दिल मिल गए’, ‘बहु हमारी रजनीकांत’, ‘बरसातें’, ‘कुमकुम’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता पंकित ठक्करने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. 24 वर्षांच्या संसारानंतर अखेर पंकित आणि प्राचीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 2015 पासूनच त्यांच्यात संसारात काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. तेव्हापासूनच हे दोघं वेगवेगळे राहत होते. 2016 मध्ये त्यांनी वेगळं राहत असल्याचं माध्यमांसमोर जाहीर केलं होतं. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतल्याचं कळतंय. यावर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलंय.
पंकित आणि प्राचीने 11 सप्टेंबर 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी पंकित फक्त 21 वर्षांचा होता. पंकित आणि प्राची यांच्या वयात बरंच अंतर असल्याने त्याच्या कुटुंबीयांकडून या लग्नाला विरोध करण्यात आला होता. प्राची ही पंकितपेक्षा वयाने आठ वर्षांनी मोठी असल्याचं कळतंय. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन पंकितने प्राचीशी लग्न केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या संसारात बरेच चढउतार आले. यादरम्यान दोघांनी समुपदेशनाद्वारे नातं सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही काहीच परिणाम होत नसल्याने अखेर त्यांनी वेगळं राहायचं ठरवलं.
2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पंकित त्याच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. “आम्ही नामांकित काऊंन्सलरकडे गेलो, मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. हे लग्न वाचवण्यासाठी आम्ही जवळपास सर्व प्रयत्न केले. पण अखेर वेगळं राहूनच आम्हाला ती शांती आणि आनंद मिळाला. 2015 पासून आम्ही वेगळे राहतोय. यामुळे आता दोघंही आपापल्या आयुष्यात खुश आहोत. आम्ही दोघं आजही एकमेकांचा खूप आदर करतो आणि आमच्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.”
पंकित आणि प्राचीला एक मुलगा असून घटस्फोटानंतर प्राचीला त्याचा ताबा मिळाला आहे. तर पंकितसुद्धा मुलाच्या संगोपनासाठी आवश्यक ती मदत करणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हे दोघं वेगळे राहत आहेत. त्यामुळे अखेर घटस्फोटामुळे त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम मिळाला आहे. पंकितने अनेक नामांकित मालिकांमध्ये काम केलंय. यामध्ये ‘कभी सौतन कबी सहेली’, ‘बरसातें – मौसम प्यार का’, ‘दिल मिल गए’ यांचा समावेश आहे. तर प्राचीने ‘कसौटी जिंदगी की’, ‘हवन’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List