रोखठोक – शिमला : तेव्हाचे आणि आताचे! स्वर्ग असाही असतो!
ब्रिटिश काळात भारतात अनेक ‘हिल स्टेशन्स’ वसवण्यात आली. शिमला या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. शिमला ब्रिटिशांची ग्रीष्मकालीन राजधानी होतीच, पण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक घडामोडी शिमल्यात घडल्या. आज शिमला आपल्याला माहीत आहे तो मौजमजा करण्याचे अति थंड हवेचे ठिकाण म्हणून. येथे बर्फ पडतो. त्या बर्फात आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात. शिमल्याचा इतिहासदेखील जाणून घ्यायला हवा.
जुने वर्ष मावळले. नव्या इंग्रजी वर्षाचे स्वागत उत्साहात करण्याची सवय भारतीयांनाही लागली व नव हिंदुत्ववाद्यांनाही भारतीयांची ही सवय मोडता आली नाही. इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्यांनी अनेक शहरे त्यांच्या जीवनमानानुसार बनवण्याचा व त्यात इंग्रजी जीवन जगण्याचा प्रयत्न केला. त्यात शिमला आणि शिलाँगचा समावेश होतो. शिमला त्यांनी आपल्या हिशोबाने घडवले. शिमल्यात या काळात चांगला बर्फ पडतो. त्यामुळे देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शिमल्याची ब्रिटिशकालीन शिस्त व शांतता त्यामुळे बिघडते. ब्रिटिश गेल्यापासून त्यांच्याबरोबर ते सभ्यता व शिस्तही घेऊन गेले. शिमलाही त्यास अपवाद नसावे. नवीन वर्षात मी शिमल्याच्या पहाडी भागात वास्तव्य केले. हिमॉलयाच्या कुशीतले हे पहाड, देवदार वृक्षांचे जंगल, नागमोडी रस्ते व स्वच्छ हवा आहे. पहाडांवर बर्फ पडतो तेव्हा ते शुभ्र मोत्यांचे डोंगर भासतात. सकाळी त्यावर शुभ्र किरणे पडतात तेव्हा भारताचे निसर्गवैभव झळाळून निघते. इंग्लंडमधील एखाद्या शहरासारखे हे चित्र. ही भूमी भारताची. त्यावर ब्रिटिशांनी कोरीव काम केले ते त्यांच्या सोयीसाठी. इंग्रजांनी शिमला शहर हे त्यांच्या इंग्लंडप्रमाणे वसवले. इंग्रजांना उत्तरेतील या पहाडी भागात शिमल्यात आपल्या देशाचे चित्र दिसत होते. त्यांना ही जागा इतकी पसंत पडली की, शिमल्यास हुबेहूब इंग्लंडचे रूप देण्याचा प्रयत्न केला. इंग्रज राजवटीतले तेव्हाचे बडे राज्यकर्ते वर्षातला बराचसा काळ हा शिमल्यातच घालवीत. इंग्लंडचीच हवा, गारवा, बर्फाचे तुषार त्यांना शिमल्यात सापडले व इंग्रज तेथे रमले.
ब्रिटिशांची पहिली पसंत
शिमल्यात आता लोकसंख्या वाढली. पुन्हा बाहेरचे आक्रमण वाढले. अनेक ब्रिटिशकालीन जागांवर खासगी मॉलकांनी भव्य हॉटेल्स उभी केली. त्यापैकी ‘वाईल्ड फ्लॉवर्स हॉल’ ही जागा साधारण 45 एकरांत आहे व येथे ब्रिटिश साम्राज्याच्या खाणाखुणा आहेत. जंगल व पहाडांनी घेरलेली ही जागा आहे. अशा अनेक जागांचे जतन करून तेथे पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. 1864 साली भारतातील ब्रिटिश सरकारने शिमल्यास ‘ग्रीष्मकालीन राजधानी’ म्हणून घोषित केले. ब्रिटिशांच्या भारतीय सेनेचे ‘कमांडर-इन-चीफ’चे मुख्यालय येथेच निर्माण केले. त्यामुळे कोलकाता, दिल्ली, मुंबईपेक्षा शिमला हे ब्रिटिशांची आवडती जागा ठरली. या शहराचे मूळ नाव शिमला नव्हते. काली बाडी मंदिर आजच्या मॉल रोड भागात आहे. या देवीस श्यामला देवीही म्हटले जाते. हे शहर तेव्हा श्यामलाच्या नावाने ओळखले जात होते. ब्रिटिशांना ‘श्यामला’ उच्चारता येत नव्हते. त्यांनी श्यामलाचे शिमला केले. शिमलाला इंग्रजांनी फक्त वसवले नाही, तर सजवले, नटवले होते. इंग्रजांच्या काळातही येथे श्यामला देवीच्या मंदिरात उत्सव साजरे होत व त्यात ब्रिटिश अधिकारी सहभागी होत. दिवाळी, नवरात्र आणि दुर्गापूजेसारखे धार्मिक उत्सव होत व हजारो लोक त्यासाठी पहाडावर जमत. हिंदू संस्कृती पहाडावर टिकवली. इंग्रजांचा प्रभाव असूनही येथे ख्रिस्ती मिशनऱ्यांचा वावर नव्हता व धर्मांतरणासारखे प्रकार घडू दिले गेले नाहीत. त्यामुळे श्यामला आणि शिमला अशा दोघांचे महत्त्व कायम राहिले. शिमल्यात आजही भव्य बिशप हाऊस आहे. ही जुनी इमारत पाहण्यासारखी आहे.
केनडीचे शिमला
प्रत्येक शहराच्या निर्मितीमागे एक व्यक्ती असतेच. शिमला वसवण्यात चार्ल्स प्रॅट केनेडीचे योगदान मोठे आहे. इंग्रजांनी पहाडी राज्यांच्या विकासासाठी तेथील संस्थानिक, राजा वगैरेंशी समन्वय राखण्यासाठी केनेडी याची राजनैतिक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. केनेडी शिमल्याच्या पहाडात कधी घोड्यावरून तर कधी चालत फिरत असे. तो या पहाडांच्या प्रेमात पडला. 1882 साली त्याने येथे स्वतःसाठी एक घर बनवले. केनडी हाऊस म्हणून त्याला लोक ओळखू लागले. 1830 साली शिमल्यास शहर बनवण्याची ‘कवायद’ सुरू झाली. 1832 साली ब्रिटिश सरकारचे तेव्हाचे गव्हर्नर जनरल लार्ड पीटर आारोनसन यांनी महाराजा रणजित सिंह यांच्याकडून शिमल्यातील जमिनीचा व्यवहार केला. शहर कसे असावे याबाबतचा आराखडा तयार झाला. तो काळ राजे-रजवाड्यांचा होता. येथील बरीचशी जमीन पाटियाला राजघराण्याकडे आणि स्थानिक क्योंथल संस्थानिकाकडे होती. त्यामुळे भूमी अधिग्रहणास वेळ लागला. आवश्यक तेवढी जमीन ताब्यात येताच 1864 साली इंग्रजांनी शिमल्यास ग्रीष्मकालीन राजधानी म्हणून घोषित केले. हिमालयाच्या शिखरावर एक शहर उभे राहिले. ते आजही लाखो लोकांचे आकर्षण आहे. भारताचे सरकार 100 स्मार्टसिटी उभारणार होते. त्यातले एकही स्मार्ट शहर उभे राहिले नाही. स्मार्टसिटीचे राजकारण करणाऱ्यांनी 18 व्या शतकात शिमल्याच्या उंच टोकावर उभी केलेली ‘स्मार्टसिटी’ कशी बनवली ते पाहायला हवी.
उत्सवी शहर
ब्रिटिशांनी शिमला वसवले तेव्हा साधारण 25 हजार लोकांना पुरेल अशा जलसाठ्याची व्यवस्था त्या पहाडी जंगलात केली. आज शिमल्यात लोकसंख्येचा स्फोट आहे. पहाडांवर घरांचे मनोरे पाहण्यासारखे असतात. वर वाहने जात नाहीत. सर्व व्यवहार पायी चढून करावे लागतात. पहाडी जनता कष्टाळू आहे व त्यांच्या चेहऱ्यावर सतत आनंदाची छटा दिसते. शिमल्याचा मॉल रोड हा आता पर्यटकांनी गजबजलेला आहे. पण अनेक ब्रिटिशकालीन खुणा, वास्तू येथे आहेत. ब्रिटिश राज्य कसे होते व नगररचना कशी होती ते मॉल रोडची रपेट करताना जाणवते. आज तेथे फक्त गर्दीचे अराजक आहे. चंदिगडकडून शिमल्याकडे येताना सोलन लागते. देशातील अनेक औषध कंपन्यांनी सोलन येथे बस्तान मांडले. सोलनचे दुसरे वैशिष्ट्य असे की, भारतात लोकप्रिय असलेली ‘ओल्ड मान्क रम’ या मद्याची निर्मिती सोलन येथे होते. मोहन माकीन्स कंपनीचे मुख्यालय सोलन येथे आहे. याचा प्रभाव हिमाचलच्या सरकारवर पडलेला दिसला. शिमल्याच्या मॉल रोडवर फिरत असताना हिमॉलय सरकारचे एक फर्मान आले की, पर्यटकांनी नववर्ष बिनधास्त साजरे करावे.
5 जानेवारीपर्यंत दारूची दुकाने 24 तास उघडी राहतील. कुणी पर्यटक दारू पिऊन जरा जास्तच टाईट झालेला आढळला तरी पोलीस त्याला अटक करणार नाहीत. उलट पोलीस त्याला अत्यंत प्रेमाने सुरक्षितपणे त्याच्या हाटेलपर्यंत पोहोचवतील. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले, ‘मी पोलिसांना सूचना दिल्यात. अतिथी देवो भव!’ त्यामुळे लाखो अतिथींनी या वेळी मौज केली व स्वातंत्र्याचा उपभोग घेतला.
गांधींचा वावर
शिमल्याचे राजकीय महत्त्वही तितकेच आहे. 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्तानचा युद्धात पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधी व पाकचे पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो हे शिमला येथे भेटले. ‘शिमला समझोता’ म्हणून ही भेट व करार प्रसिद्ध आहे. चीन युद्धानंतर मॅकमोहन रेषेचा आराखडासुद्धा शिमल्यातच तयार झाला. हेन्री मॅकमोहन हा ब्रिटिश भारताचा परराष्ट्र सचिव होता. मॅकमोहन रेषा (आंतरराष्ट्रीय सीमा) ही तिबेट आणि भारत यांच्यातील सीमा रेषा आहे. तिबेट पुढे चीनने गिळला व मॅकमोहन रेषेचे अस्तित्व नाकारले. पण मॅकमोहन रेषा बनवण्यात शिमल्याचे योगदान महत्त्वाचे आहे. शिमल्याने देशांतर्गत अनेक घडामोडी पाहिल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, लाला लजपत राय, सरदार पटेल, मदन मोहन मॉलवीय हे शिमल्यात येत होते. शिमल्यात गांधींच्या अनेक स्मृती आजही जतन केल्या आहेत. 1921 साली गांधीजी प्रथम शिमल्यात आले. गांधी मॉल रोडला गेले. मॉल रोडला तेव्हा इंग्रजांव्यतिरिक्त कुणाला प्रवेश नव्हता. गांधी मॉल रोडला गेले तेव्हा तेथे जाणारे ते पहिले भारतीय होते. बग्गीत बसून त्यांनी मॉल रोडला फेरफटका मारला. तो क्षण सर्व भारतीयांसाठी रोमांचक होता. मॉल रोडवर जेथे गांधींनी सभा घेतली होती त्या जागी गांधींचा पुतळा उभा आहे. गांधीजी शिमल्यात लार्ड रीडिंग, लॉर्ड विलिंग्टन व तत्कालिन व्हाइसराय लार्ड लिनलिथगो यांच्याशी चर्चा करण्यासाठी येत. गांधींचा मुक्काम साधू आश्रमाच्या शांती कुटीरमध्ये असे. ज्या ‘जेल’चे नाव घेताच कैद्यांचा थरकाप उडायचा असे दोन जेल तेव्हा भारतात होते. एक अंदमान निकोबार व दुसरे डगशाई जेल. शिमल्याजवळच्या सोलनमध्ये हा जेल आहे. या जेलमध्ये येणाऱया कैद्यांचा भयंकर छळ होत असे. लोखंडी सळय़ा भट्टीत तापवून त्या सळईने कैद्यांच्या हातावर त्यांचा क्रमांक लिहिला जात असे. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटिश सैन्याने आयरिश सैनिकांना व आयरिश स्वातंत्र्य सेनानीना बंदी बनवले होते. त्यातल्या बऱ्याच सैनिकांना डगशाई तुरुंगात आणून यातना दिल्या गेल्या. आयरिश सैनिकांनी या छळाविरुद्ध उपोषण सुरू केले. ती बातमी बाहेर फुटताच गांधीजी त्या आयरिश सैनिकांना भेटण्यासाठी डगशाई जेलमध्ये पोहोचले. त्या जेलमध्ये त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. शिमल्यात जाऊन त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे तुरुंगात सुरू असलेल्या छळाविषयी कैफियत मांडली. डगशाई जेलला गांधींनी भेट दिल्यामुळे आयरिश सैन्याच्या छळाच्या कथा जगभरात पोहोचल्या. गांधींचा शिमल्याशी संबंध त्यांच्या मृत्यूपर्यंत आला. गांधींची हत्या दिल्लीत झाली, पण त्यांच्या हत्येचा खटला चालविण्यासाठी शिमल्याची निवड केली गेली. शिमल्याच्या मिंटो कोर्टात हा खटला चालला. याच मिंटो कोर्टात नथुराम गोडसेला आरोपी म्हणून पेश करण्यात आले. 21 जून 1949 रोजी याच मिंटो कोर्टात गोडसेला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पुढे याच मिंटो कोर्टाला आग लागून ही इमारत नंतर बेचिराख झाली व गोडसेंशी, गांधी हत्या खटल्याशी जोडलेला इतिहासदेखील नष्ट झाला. शिमल्याच्या पहाडात, देवदार वृक्षांच्या जंगलात, कणाकणात भारताचा इतिहास भरलेला आहे. फक्त नव वर्ष साजरे करण्यापुरतेच शिमला नाही. शिमल्याचा इतिहास पहाडाइतकाच उंच व टोकदार आहे.
शांतता!
शिमल्यात जागोजाग लष्करी छावण्या आहेत. 75 हिमाचली गावे चीनच्या सीमेवर आहेत. तरीही इतर सीमावर्ती राज्यांच्या तुलनेत येथे शांतता आहे. शिमल्यातील नवीन वर्ष ‘रंगीन’ असते. ही देवभूमी व स्वातंत्र्य लढ्याची कर्मभूमी आहे. ब्रिटिशांप्रमाणे भारताच्या राष्ट्रपतींचे ग्रीष्मकालीन निवासस्थान शिमल्यात आहे. राष्ट्रपती भवन आता पर्यटकासाठी खुले केले आहे. येथील जनता धार्मिक व देवभोळी आहे. ती पर्यटकांचे स्वागत करते. शिमल्याच्या पहाडांवर आता भव्य हाटेल्स, रिसॉर्टस् उभी आहेत. शिमल्याने पर्यटकांच्या स्वागतासाठी जणू आपले पहाडी थंड बाहूच पसरले आहेत. ज्याला फिरण्याची आणि देशाटनाची आवड आहे अशांनी एकदा तरी शिमल्याला यावे. स्वित्झर्लंडला जगाचा स्वर्ग मानला जातो. कश्मीरला नंदनवनाचा दर्जा मिळालाच आहे. पण शिमला हा भारतातील स्वर्ग म्हणावा असाच आहे. त्याला आनंद, उत्साह आणि निसर्गाचे वरदान आहे. तसे नसते तर ब्रिटिशांनी इथे राजधानी केली नसती व ते इथे रमलेही नसते. या स्वर्गात भारतीय स्वातंत्र्याचाही इतिहास वावरताना दिसतो. तो अमर आहे.
TWITTER – @rautsanjay61
GMAIL – [email protected]
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List