निसर्ग जागर- माळ भिंगरी
>> प्रेमसागर मेस्त्री
शेतीप्रदेश, तलाव तसेच नद्यांजवळ दिसणारा माळभिंगरी हा इवलासा पक्षी आपल्याकडे मध्य आणि पूर्व युरोपमधून हिवाळ्यात स्थलांतर करून येतो. एका जागी स्वस्थ न बसता ही भिंगरीसारखे हवेतून इकडे तिकडे स्वैर उडणारा हा पक्षी हवेतील उडणारे कीटक गिळंकृत करतो. अशाप्रकारे धान्यांवर येणारे कीटक नियंत्रित करण्याचे काम या हजारो बार्न स्वालो म्हणजेच माळ भिंगरी करत असतात.
पक्षीशास्त्रज्ञ अँड्रीव्ह सोबत सारा, काव्या आणि जपानमधील पक्षी स्थलांतरावर संशोधन करणाऱया विद्यार्थिनी मेसी व झान.
युरोपीय प्रदेशातून येणारी माळ भिंगरी. (Barn Swallow) शास्त्रीय नाव- Hirundo rustica. चिमणीएवढा आकार, छाती तसेच वरील बाजूस चमकदार निळा. कपाळ व गळा चटक लाल. खालील बाजू पांढरी. शेपटीची दोन पिसे धाग्याप्रमाणे लांब. हिवाळ्यात प्रचंड संख्येत विद्युत तारांवर थवे जमतात.
शेतीप्रदेश, तलाव तसेच नद्यांजवळ. इवलासा पक्षी, पण आपल्याकडे मध्य आणि पूर्व युरोपमधून हिवाळ्यात स्थलांतर करून येतो. आपण लहान मुलांना जर जास्त खेळत असतील तर त्यांना सहज म्हणतो, ‘तुझ्या काय पायाला भिंगरी आहे का रे?’ तशीच एका जागी स्वस्थ न बसता ही भिंगरीसारखे हवेतून इकडे तिकडे उडत असते. या स्वैर उडण्यामध्ये ती अनेक हवेतील उडणारे कीटक गिळंकृत करते. अशाप्रकारे धान्यांवर येणारे कीटक नियंत्रित करण्याचे काम या हजारो माळ भिंगरी करत असतात. मी दोन वेळा थायलंड येथे चिंगमाई या पर्वतरांगेवर तसेच चुम्फान या जिह्यांमध्ये एक ते दोन महिने राहून या बार्न स्वालो पक्षी प्रजातीविषयी संशोधन करणाऱया शास्त्रज्ञ अँड्रिव्हबरोबर काम केले आहे.
अँड्रिव्ह हा मूळचा पोलंड देशातला थायलंडमध्ये गेली अनेक वर्षे तो वेगवेगळ्या स्थलांतरित पक्ष्यांवर अभ्यास करतो. 2022 ला ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास 34 दिवस आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पकडले. यावेळी खास भिंगरी कुटुंबातील माळ भिंगरी (बार्न स्वालो) या पक्ष्याच्या स्थलांतरावर तो अभ्यास करत होता. माळ भिंगरीची लांबी, चोच, तिचं वजन, तिच्या पंखांमध्ये असलेल्या पिसांचा पॅटर्न अशा नोंदी घेऊन त्याला एका पायामध्ये रिंग अडकवून त्यानंतर त्याला सोडलं जातं. मध्य युरोप अगदी पूर्व युरोप स्पेनपासून रशिया आणि चीन आदी देशांतून या माळ भिंगरी लाखो संख्येने भारत, आफ्रिका, बाली, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये स्थलांतरित होतात. युरोपीय प्रदेशांमध्ये कडाक्याची थंडी पडते. गवताच्या कुरणांवर तसेच झाडांवर बर्फाचे थर जमा होतात. पर्यायाने कीटकांची संख्या कमी होते अशा वातावरणामध्ये जगणे या छोटय़ा पक्ष्यासाठी एक आव्हानात्मक असते. काही उबदार प्रवाहांचा पारंपरिक मार्ग या पक्ष्यांना माहिती आहे. त्यामुळे कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान अशा मध्य आखाती प्रदेशांमध्ये काही पक्षी स्थलांतर करतात, तर काही पक्षी थेट आफ्रिका, भारत, थायलंड, बाली, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आदी देशातील उष्णकटिबंध प्रदेशात स्थलांतरित होतात. या स्थलांतर मार्गामध्ये येणारी हिमवादळे तसेच चक्रीवादळे आणि समुद्री काठावर येणाऱया वादळी तडाख्यांचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. त्यामुळे कधी कधी ते आपला मार्ग बदलतात. हाताच्या ओंजळीमध्ये मावेल इतका छोटा पक्षी. आश्चर्य वाटतं की थायलंडची चिंगमाई पर्वतरांग ही 7000 ते 9000 फूट इतक्या उंचीची पर्वतरांग हे पक्षी कसे ओलांडून येतात. शिवाय चीनचा दक्षिण भाग जो पर्वतीय भाग आहे त्या भागावर कमीत कमी दहा हजार ते बारा हजार फूट उंचीने उडावे लागते. हे उड्डाण घेताना एवढा चिमुकला पक्षी कशी काय ताकद वापरतो. शिवाय या पर्वतावर ढगाचे लोट असतात. त्यातून आपला मार्ग शोधत एवढा चिमुकला पक्षी धाडसी प्रवास करून भारतात येतो. या वर्षी हे पक्षी महाडमध्ये चवदार तळे, गंधारी नाका, चांडवे आणि पोलादपूर येथील मधल्या भागामध्ये भरपूर संख्येने बघायला मिळत आहेत. साधारण 99 ते 2002 सालापर्यंत हे पक्षी महाड परिसरामध्ये लाखोंच्या संख्येने यायचे. पण मधल्या काळात त्यांची संख्या अगदीच रोडावली. मात्र या वर्षी थोडी स्थलांतरित संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. पण तरीदेखील पहिल्याइतकी संख्या नाही. नेमकं काय कारण आहे याचा शोध घेण्यासाठी मी स्पेनलादेखील जाऊन आलो. स्पेनमधील एक्स्ट्रा मदूरा, पश्चिम स्पेन आणि दक्षिण स्पेन तसेच आफ्रिकेतील मोरोक्को हा पूर्वेकडील भाग या भागांमध्ये त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात बघायला मिळाली. अँड्रिव्हने सांगितल्याप्रमाणे स्पेनमधील हे पक्षी आफ्रिकेत जातात. आफ्रिकेकडून उझबेकिस्तानकडून ते पुन्हा इंग्लंडकडे येतात आणि पुन्हा आपल्या मायदेशी स्पेनला परततात. तर रशिया, चायना आणि पूर्वेकडील आशियाई देशांकडून हे पक्षी भारताकडे तसेच थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया ते अगदी ऑस्ट्रेलिया इथपर्यंत जाणे पसंत करतात. सध्याच्या काळामध्ये अतिशय कमी वजनाचे असे रेडियो टेलिमेंटरी डिव्हायसेस म्हणजेच जीपीएस सांगणारे आणि तो पक्षी कुठल्या स्थानी आहे हे वारंवार दर मिनिटाला माहिती देणारे यंत्र पक्षाच्या पाठीवर त्याला दप्तरासारखे बांधता येते जे वजनाला खूप हलके असते. साधारण पक्ष्याच्या वजनापेक्षा सात ते दहा टक्के हे वजन या रेडिओ ट्रान्समीटरचे असते. आत्ताच्या काळामध्ये सोलार ऊर्जेवर चालणारी अशा प्रकारची अनेक डिव्हायसेस आपल्याला बघायला मिळतात. वातावरणीय बदलाचा परिणाम तसेच कीटकनाशकांचा वारेमाप वापर हा या पक्ष्यांसाठी धोकादायक आहे, असा निष्कर्ष अँड्रिव्ह या शास्त्रज्ञाने काढला.
सारा सचिन राऊत इयत्ता आठवी आणि काव्या जोशी ही सहावीमध्ये शिकणारी सिस्केप संस्थेची छोटी पक्षी निरीक्षक जोडी माझ्यासोबत होती. दोघींनी अतिशय सुंदरपणे अँड्रिव्हबरोबर या संशोधनाचे काम केले. अँड्रिव्हसोबत भारतातून आम्ही तसेच इतर देशातून अनेक वॉलेंटियर्स आले होते. चुम्फान प्रोविन्स या भागातील एक तरुण रिसर्च कतान्यू विचितान हा प्रकल्प अधिकारी म्हणून आमच्या सोबत होता. अतिशय शास्त्राrय पद्धतीने त्याने या प्रकल्पामध्ये सलग दोन वर्षे काम केले होते. दोन वर्षांच्या त्याच्या अनुभवानुसार दरवर्षी पक्ष्यांची संख्या दहा ते पंधरा टक्के या स्तराने कमी होत चालली आहे, असे तो सांगत होता. युरोपीय देशांमध्ये या भिंगरी कुटुंबातील पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठी खास मनोरे बांधण्यात आले आहेत, तर जे स्थानिक पक्षी इंडोनेशिया, बाली, थायलंड आदी भागांमध्ये वास्तव्य करून असतात त्यांच्यासाठीदेखील इथल्या गव्हर्नमेंटने अशा प्रकारचे मनोरे बांधले आहेत. त्यांना स्वालो टॉवर्स असे म्हणतात. भिंगरी कुटुंबातील पक्षी आपले घरटे भिंतीला, छताला उलटे मातीचा थर देऊन भांडय़ाप्रमाणे तयार करतात. त्यासाठी ते ओल्या चिखलातून माती आणि लाळ तसेच गवताचे तूस असे पदार्थ वापरून भिंतीवर एक-एक त्या मातीचा चिमुकला छोटा गोळा चिकटवून हे वाटीसारखे किंवा उलटय़ा रांजणासारखे घरटे तयार करतात. त्याच्या आतमध्ये मऊ पिसांचा थर देतात आणि त्यामध्ये त्यांच्या पिलांना वाढवतात. सातत्याने निरीक्षण केलं तर एका मिनिटांमध्ये किमान तीन ते चार कीटक हे पक्षी खातात. म्हणजे एका तासात साधारण 60 ते दीडशेहून अधिक कीटक ते फस्त करतात. हिवाळ्याच्या तोंडावर आपल्याकडे भाताची कापणी होते. भाताच्या पिकांवरचे कीटक, अळ्या त्या वातावरणात उघडय़ा पडतात आणि हे भक्ष्य या पक्ष्यांना उपलब्ध होते. फवारणीमुळे कीटक शेतामध्ये फार मोठय़ा प्रमाणात मृत अवस्थेत किंवा मलूल अवस्थेत उडताना हे पक्षी त्यांना गिळंकृत करतात. त्यामुळे या पक्ष्यांच्या पोटामध्ये तसेच किडनीमध्ये या कीटकनाशकांचा प्रभाव दिसून येतो. ज्यामुळे पक्षी हजारोंच्या संख्येने आपल्याला मेलेले दिसतात. या पक्षी संवर्धनाचे प्रयत्न पूर्व आशियाई देशांमध्ये गेल्या दशकात अनेक रिसर्च सेंटरने सुरू केली आहेत. परंतु त्या मानाने आर्टिफिशियल नेस्टिंग साईट्स म्हणजेच कृत्रिम घरटे बांधणीसाठी केलेली व्यवस्था ही एक आव्हानात्मक बाब आजही संशोधकांच्या समोर उभी आहे. यासाठी जगभरातील पक्षी निरीक्षकांनी हे वर्ष जगभरात ‘कीटक संवर्धन वर्ष’ म्हणून नोंदविले आहे आणि या वर्षी कीटकांचे संवर्धन होण्यासाठी जगभरात प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे. कारण कीटकांच्या मार्गांवरच या स्थलांतरित पक्ष्यांचे जीवन आणि मार्गक्रमण यशस्वी होते. अन्यथा त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागते. या पक्ष्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी कीटकनाशके वापरणे बंद करणे क्रमप्राप्त आहे.
(लेखक रायगड जिल्हा, मानद वन्यजीव रक्षक आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List