क्लासिक – दोन स्तंभ, एक जग!

क्लासिक – दोन स्तंभ, एक जग!

>> सौरभ सद्योजात
प्रेम योगावर करावं,
भोगावर करावं
आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं!
त्यासाहेब शिरवाडकरांच्या या ओळींनी जे अधोरेखित केलं आहे, त्याचा अंश ओ. हेन्री यांच्या लघुकथांत दिसून येतो. ‘द लास्ट लीफ’ आणि  ‘द गिफ्ट ऑफ द मॅगी’ या कालजयी कथांतून त्यागाचा प्रकाश दरवळतो. सामान्य माणसांच्या या कथा अचंबित करतात, असामान्य वाटतात. कारण त्यामागे लिहिता हात हा ओ. हेन्री यांचा आहे.
ओ. हेन्री यांची ‘द लास्ट लीफ’ ही एक हृदयस्पर्शी कथा असून तिच्या ठायी आशा व त्याग अनपेक्षित, परंतु देखण्या शेवटाची पेरणी केल्याचं दिसून येतं. हेन्री यांची त्यांच्या कथेतील निवेदन शैली ही सहजसुंदर आहे. त्याच शैलीचा प्रत्यय या कथेत येतो. मानवी नातेसंबंधांचं गहिरेपण स्पष्ट करताना ही कथा माणसाच्या जिद्दीचा आणि निस्वार्थ प्रेमाचा अर्थ स्पष्ट करते. तसेच ‘द गिफ्ट ऑफ द मॅगी’ या कालजयी कथेद्वारे त्यांनी प्रेम, त्याग आणि मानवी आयुष्यातील विडंबन यांचा सखोल विचार मांडला आहे. निवेदनात असणारी सहजता, परंतु कथावस्तूच्या अंती झटकन येणारे वळण, त्यांच्या कथांना एक वेगळी उंची देतात. त्यांचे लेखन या कारणांसाठी अमेरिकन साहित्याच्या परंपरेत मानाचे स्थान मिळवते.
या दोन्ही कथांमधील सर्वात प्रभावी बाजू म्हणजे त्यागमय प्रेमाचे अधोरेखित होणे. उदा.‘द गिफ्ट ऑफ द मॅगी’तील डेला आणि जिम ही प्रमुख पात्रं भौतिक संपत्तीपेक्षा एकमेकांवरील स्नेहाला प्राधान्य देतात. जिम घालतो त्या घडय़ाळाची साखळी खरेदी करण्यासाठी डेला तिचे काळेभोर व लांबसडक केस विकते. दुसऱया बाजूस जिम डेलाचे देखणे केस विंचरण्यासाठी महागडे कंगवे खरेदी करतो. त्याकरिता स्वतचे घडय़ाळ विकतो. हा परस्पर त्याग, प्रेम आणि शहाणीव यांचे सहअस्तित्व अधोरेखित करताना ओ. हेन्री एका नैतिक सत्याकडे निर्देश करतात.
ओ. हेन्री यांनी पेरलेले संकेत त्यांच्या कथांची अर्थगर्भता अधिक गडद करतात. उदा. ‘द लास्ट लीफ’मधली भिंतीवर रेंगाळणारी वेल. ती मानवी जीवनाच्या नाजूक अस्तित्वाचे प्रतीक आहे, तर बेहर्मनने रंगवलेले पान हे धैर्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. बेहर्मनचा त्याग हे सुचवू पाहतो की, खऱया कलेचा उद्देश्य केवळ सौंदर्याभवताल घिरटय़ा घालणे नसून तो प्रेरित करण्यासाठी, उत्थानासाठी आहे.  ‘द गिफ्ट ऑफ द मॅगी’ या कथेची रचना वरकरणी साधी असली तरी तिची प्रस्तुती कौशल्यपूर्ण आहे. ओ. हेन्री यांची कथा सरळ रेषेत चालते. परंतु कथेतला अनपेक्षित शेवट मानवी जीवनातील परिस्थितीजन्य विडंबनाचा धक्का देऊन जातो. जिम आणि डेला यांनी केलेल्या त्यागामुळे त्यांची भेटवस्तू एकमेकांसाठी निरुपयोगी ठरते. पण त्यामुळे त्यांची मने कष्टी होत नाहीत. ती अधिक घट्ट होतात. आशा, शहाणीव आणि स्नेह अधोरेखित करतात. नेमक्या शब्दांत केलेली मांडणी आणि सौम्य विडंबन हा या कथांमधील सामायिक धागा आहे.
या कथांतली सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे. साधारणतः विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात प्रसिद्ध झालेल्या या कथा अमेरिकेतील कामगार वर्गाच्या संघर्षाचे प्रतिबिंब दर्शवतात. डेला आणि जिमच्या वाटय़ाला येणारी आर्थिक मर्यादा ही तत्कालीन वास्तववादाशी सुसंगत आहे. या कथा वाचणारी सामान्य व्यक्ती या पात्रांच्या परिस्थितीशी एकरूप होत धैर्य आणि संयमाची शिकवण आत्मसात करू शकतात.
ओ. हेन्री यांचे खासगी आयुष्य चढउतारांनी भरलेले होते. ते ज्या परिस्थितीमुळे लेखन करू लागले ती सामान्य नव्हती. परंतु निरीक्षण, अनपेक्षित वळण आणि सद्विचारांची पुरचुंडी हाताशी घेऊन त्यांनी जे निर्माण केले, ते जागतिक दर्जाचे साहित्य झाले. या दोन कथा म्हणजे मानवी आयुष्यातील मूल्यांचे जग तोलून धरणारे दोन स्तंभ आहेत. म्हटले तर हे दोन स्तंभ एक आयुष्य तोलून धरायला पुरेसे आहेत. त्याग, काळजी, विश्वास आणि प्रेम यांवरच तर जगाचे रहाटगाडगे कासवगतीने पुढे पुढे सरकत आहे! भौतिक प्रगती सशाच्या वेगाने धावत असली तरी अंती तिला परतून यावे लागेल ते मानव्याकडेच आणि हेच अधोरेखित करणाऱ्या या कथा जगाला प्रेरित करत आहेत. हिंदीत निर्माण झालेला ‘रेनकोट’ आणि ‘लुटेरा’सारखे देखणे सिनेमे त्या प्रभावाची साक्ष देत आहेत. त्यामुळे या दोन स्तंभांची भव्यता, त्यावरील कोरीवकाम आणि त्याच्या निर्मितीमागे असणारे समर्पण आपल्या हस्तस्पर्शाने चाचपून पाहायलाच हवे.
(लेखक  इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत.)
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर
प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार
कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?
HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं
या वयोगटातील असाल तर त्वरीत या ५ सवयी सोडा, अन्यथा पश्चाताप होईल…