स्वयंपाकघर – एका व्यवसायाचा प्रेरणादायी प्रवास

स्वयंपाकघर – एका व्यवसायाचा प्रेरणादायी प्रवास

>> तुषार प्रीती देशमुख

गेली 54 वर्षे दादर येथे मोड आलेली कडधान्ये विक्री करणाऱ्या वनिता कीर यांचा प्रेरणादायी प्रवास…

रोज एक वाटी कडधान्य खाल्ल्याने शरीराला हवी असलेली ऊर्जा प्राप्त होते. म्हणूनच कडधान्याच्या वाटीला जेवणाच्या ताटात उजव्या बाजूचा मान मिळालेला आहे. ऑफिसला जाणाऱ्या महिलांना धावपळीमध्ये त्यासाठी लागणारी खटाटोप करणे खूप अवघड जाते. कडधान्य आणा, त्याला कीड लागणार नाही याची काळजी घ्या, ती भिजत घाला. मग मोड येण्यासाठी उपसून कपडय़ात बांधून ठेवा. मग ते सोला आणि मग त्याची उसळ, भाजी किंवा आमटी बनवा. त्यामुळे जर भिजवून मोड आलेली व सोललेली कडधान्ये मिळाली तर तो उत्तम पर्याय नाही का? गेली 54 वर्षे कडधान्य विक्री करणाऱया वनिता कीरताईंचा प्रेरणादायी प्रवास.

वनिताताईंचे वयाच्या 18 व्या वर्षी नारायण एकनाथ कीर यांच्याबरोबर लग्न झाले. त्यांचे सासरे एकनाथ गोविंद कीर यांचा 75 वर्षांपूर्वीपासून दादर पश्चिम येथील रानडे रोडवर असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दारासमोरील फूटपाथवर भाजी विक्रीचा व्यवसाय होता. सासऱयांनी चालू केलेल्या व्यवसायाला वनिताताईंच्या कुटुंबाची साथ होती. दादरमधील बोरकरवाडीमध्ये छोटय़ाशा जागेत आनंदाने कुटुंब एकत्र असायचे. नारायण कीर आपल्या भाजी व्यवसायात मन लावून काम करायचे. लग्न झाल्यावर काही वर्षांतच त्यांचे निधन झाले. एकविसाव्या वर्षी वनिताताईंनी त्यांच्या दोन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारत भाजी विक्रीच्या व्यवसायाला हातभार लावण्याचे ठरवले.

सुरुवातीला वनिताताईंनी कल्याणहून भाजी आणून भाजी विक्री केली. मुले जशी मोठी होत गेली तशा जबाबदाऱया वाढत गेल्या. सोबत दादरमधील पाटकर हॉस्पिटलमध्ये ‘आया’ची नोकरी करून पेशंटची आईच्या मायेने देखभाल करू लागल्या. स्वयंपाक, मुलांची देखभाल, व्यवसाय, नोकरी हे सगळे सांभाळत असताना वनिताताईंची खूप दमछाक व्हायची. भाजी विक्रीच्या व्यवसायापेक्षा गिऱहाईकांची मानसिकता ओळखून त्यांनी त्यांना व्यवसाय करायला सोयीस्कर होईल असा कडधान्य विक्री व्यवसाय करायचे ठरवले. कडधान्य विक्री व्यवसायाच्या सुरुवातीला वनिताताई सर्व प्रकारची पाव-पाव किलो कडधान्ये आणून स्वच्छ करून, भिजवून, सोलून गिऱ्हाईकांना विकू लागल्या. बघता बघता गिऱहाईकांची मागणी वाढू लागली. 365 दिवसांतील एकही दिवस सुट्टी न घेता वनिताताई कडधान्य देत असत. सगळ्या सणांसाठीचा चमचमीत बेत बनवण्यासाठी लागणारी किलो किलोची कडधान्ये वनिताताई आणत व ती सोलून वेळेवर ग्राहकांना पुरवत असत. या सर्व कामांसाठी वनिताताईंनी अनेकांना रोजगार दिला. त्यामुळे त्या अनेकांनाही त्यांच्या संसाराला हातभार लावता आला व वनिताताईंचेही काम सोपे झाले. वनिताताईंचा मुलगा अविनाश व मुलगी शुभांगी यांनी लहान वयातच व्यवसायाला हातभार लावला. वनिताताईंकडे विक्रीसाठी असलेल्या कडधान्यांची गुणवत्ता कायमच दर्जेदार असल्यामुळे त्यांच्याकडून अनेक केटरर्स सोललेले कडवे वाल किलो किलोने घेऊ लागले. ज्यामुळे वनिताताईंच्या व्यवसायाने जोर धरला. वनिताताईंची सून अपर्णा हिनेदेखील आपल्या सासू आणि नवऱयाच्या व्यवसायाला हातभार लावत शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा व्यवसाय सुरू केला.

वनिताताईंना जसे त्यांच्या मुलाने व सुनेने आपल्या व्यवसायात मदत केली होती, तसेच आज त्यांचा मुलगा मकरंद व त्याची बायको दर्शना हेदेखील त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करत असतात. तसेच दुसरा मुलगा ओमकारदेखील नोकरी करून त्यांच्या व्यवसायाला त्यांना हातभार लावत असतो. वनिताताई प्रेमाने सांगत होत्या, एक काळ असा होता ज्यांना कडधान्य विकायचे आहेत. त्यातील काही ग्राहकांकडे कडधान्य विकत घेण्याचेही पैसे नसायचे. अशा वेळी त्यांना कडधान्य देण्यासाठी मी थोडे जास्त कडधान्य भिजत घालायचे. ज्यामुळे त्यांचे कुटुंबदेखील आनंदाने पोटभर खाऊ शकायचे. आज त्यातीलच काहीजण आवर्जून येऊन भेटतात आणि ही आठवण करून देतात.

वनिताताईंची त्यांच्या व्यवसायाच्या जागी मुलाखत घेत असताना त्यांची गिऱहाईक सांगत होती, वनिताताई प्रेमाने मूठभर कडधान्य आम्हाला जास्तीचे देतात. पण त्यात त्यांचा व्यवहार नसतो. फक्त प्रेम असते. ज्यामुळे आम्ही कुठेही न जाता फक्त त्यांच्याकडेच कडधान्य घेतो. त्यावर वनिताताई क्षणात म्हणाल्या, “हो, पैसे कमावण्यासाठी मी व्यवसाय नक्कीच करते, पण आधी मी माणुसकी जपते. म्हणूनच आजपर्यंत माझा व्यवसाय इथपर्यंत टिकून आहे.’’

आजही प्रत्येक संकटाला सामोरे जात वनिताताई वयाच्या 78 व्या वर्षी कमरेला व मानेला पट्टा लावून कडधान्य विक्रीचा व्यवसाय आजतागायत करत आहेत.

व्यवसाय करणे सोपे नाही, पण ठरवले तर कठीण तर मुळीच नाही. खाद्य संस्कृतीशी निगडित असलेला हा वनिताताईंचा कडधान्यांचा व्यवसाय म्हणजे जसा आयुष्याचा प्रवास. कडधान्यांवर योग्य संस्कार केल्यावरच त्याला मोड येतात. मोड आलेले कडधान्य ग्राहकांना विकून त्यांना पौष्टिक आहाराचा आस्वाद घेण्याचे काम वनिताताईंसारख्या असंख्य कडधान्य विक्री करणारे बंधू-भगिनी करत आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांना पौष्टिक पदार्थ बनवण्यासाठी कडधान्य विक्रीचा व्यवसाय करतो याचा त्यांना आनंद मिळत असतो.

[email protected]
(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर
प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार
कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?
HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं
या वयोगटातील असाल तर त्वरीत या ५ सवयी सोडा, अन्यथा पश्चाताप होईल…