अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकेवर बॅरिकेड्स लावू नका, हायकोर्टाने पोलिसांना बजावले
अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकेवर बॅरिकेड्स लावू नका, असे उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना बजावले आहे. पुन्हा असे कराल तर कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर एक अपघात झाला होता. दहिसर पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावले. हा मुद्दा याचिकेद्वारे न्या. बी.पी. कुलाबावाला व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर उपस्थित करण्यात आला. कैलाश चोगले यांनी ही याचिका केली होती. त्याची नोंद घेत न्यायालय पोलिसांवर संतप्त झाले. पश्चिम द्रुतगर्ती येथे सुहासिनी पावसकर मार्गावर अपघात झाला होता. मात्र एस.एन. दुबे मार्गावरही पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. हा विचित्र प्रकार आहे. या दोन्ही मार्गांवर विरुद्ध दिशेची वाहतूक होते. येथे एकेरी वाहतुकीचा मार्ग नाही. तरीही पोलिसांनी दोन्ही रस्ते बंद केले, असे नमूद करीत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
मुंबई पोलिसांची माहिती
8 नोव्हेंबर 2024 रोजी पावसकर मार्गावर अपघात झाला होता. तेथे बॅरिकेड्स लावून वाहतुकीचे नियमन केले जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत, अशी माहिती दहिसर पोलिसांनी न्यायालयाला दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List