विरोध डावलून वाढवण बंदरासाठी ग्रीनफिल्ड महामार्ग, घोळ येथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू
हजारो मच्छीमार भूमिपुत्रांचा विरोध डावलून वाढवण बंदरासाठी ग्रीनफिल्ड महामार्ग बांधला जाणार आहे. त्यासाठी डहाणू तालुक्यातील घोळ या गावात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली असून जमिनीच्या मोजणीस प्रारंभ करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया करण्यात येत असून अनेकांना नोटिसा न बजावता अधिकाऱ्यांची दादागिरी दिसून आली. या ग्रीनफिल्ड महामार्गामुळे असंख्य ग्रामस्थ बाधित होणार असून त्यांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.
वाढवण बंदर होऊ नये म्हणून संघर्ष समितीच्या वतीने अनेकदा विविध आंदोलने छेडण्यात आली, मोर्चेही निघाले. पण मच्छीमार कुटुंबांना देशोधडीला लावून केंद्र सरकारने हे बंदर वाढवणवासीयांवर लादले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या काळातही ग्रामस्थांनी बंदराला विरोध केला होता. पण केंद्र सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नाही. अखेर हा प्रकल्प जबरदस्तीने करण्यात येत असून डहाणू तालुक्यातील ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
पोलिसांचा फौजफाटा
ग्रीनफिल्ड महामार्ग 32 किमी लांबीचा असून तो वाढवण बंदर प्रकल्पाला मुंबई अहमदाबाद महामार्गाशी जोडणार आहे. घोळ येथे महामार्गालगत मोठे सर्कल उभारले जाणार असून या भागातील अनेक जमिनी बाधित होणार आहेत. आज मोठा पोलीस फौजफाटा घेऊन उपजिल्हाधिकारी तसेच प्रकल्प व्यवस्थापक निखीलकुमार, सुप्रिया कांबळी हे अधिकारी दाखल झाले. स्थानिकांनी विरोध करूनही जबरदस्तीने मोजणी करण्यात आली.
■ डहाणूतील घोळ व धामटणे गावात जमीन, झाडे, बांधकामे, विहीर, बोअरवेल आदींच्या मोजणीची प्रक्रिया गावांमध्ये सुरू झाली. उपअधीक्षक भूमिअभिलेख डहाणू यांच्या देखरेखीखाली हे काम करण्यात येत आहे.
■ मोजणीदरम्यान भूमिअभिलेख अधिकारी, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, वनविभाग अधिकारी, तलाठी आणि पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
■ प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात झाली तेव्हा घोळ गावातील अनेक जमीनमालकांना नोटिसाच मिळाल्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List