सामना प्रभाव – देशभरातील फार्मासिस्टना नोंदणीस सशर्त मान्यता, एक्झिट एक्झाम दिल्याशिवाय प्रमाणपत्राचे नूतनीकरण नाही
>> गजानन चेणगे
औषधनिर्माण शास्त्र शाखेतील पदविकाधारक विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असलेली ‘एक्झिट एक्झाम’ यंदा अजूनपर्यंत न झाल्यामुळे भवितव्य टांगणीला लागलेल्या देशभरातील पदविकाधारकांना आपापल्या राज्यातील फार्मसी कौन्सिलकडे नोंदणी करण्यास सशर्त मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो पदविकाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दैनिक ‘सामना’ने या विषयाला वाचा फोडली होती.
दरम्यान, एक्झिट एक्झाम न झाल्याने फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीस निर्माण झालेली मोठी अडचण या निर्णयामुळे दूर झाली आहे. यामुळे नोकरी अथवा व्यवसायाचा मार्ग खुला होईल, मात्र पुढील वर्षीची एक्झिट एक्झाम दिल्याशिवाय प्रमाणपत्राचे नूतनीकरण होणार नाही. तसेच फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करताना या पात्र विद्यार्थ्यांना विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र स्टेट फार्मसी कौन्सिलला सादर करणे गरजेचे आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) या निर्णयाचे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे.
औषधनिर्माण शास्त्र शाखेतील शिखर संस्था फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय, नवी दिल्ली) शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये देशभरातून डी फार्मसी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक्झिट एक्झाम देणे बंधनकारक केले होते. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून आपापल्या राज्यातील फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीसाठी अर्ज करता येतो. अधिकृत नोंदणी झाल्यावर प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी अथवा व्यवसाय सुरू करता येतो. मात्र, मागील पाच महिन्यांपासून एक्झिट एक्झामच न झाल्याने डी. फार्मसी पदविकाधारक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले. त्यांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत देशभरातील विद्यार्थ्यांकडून संबंधित महाविद्यालये व यंत्रणेकडे सातत्याने विचारणा केली जात होती.
दैनिक ‘सामना’ने या प्रकरणाचा सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला होता. दि. 26 डिसेंबर रोजी गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांचा याबाबतचा विशेष लेखही प्रसिद्ध करून देशभरातील लाखो पदविकाधारकांच्या वेदनेला वाचा फोडण्याचे काम केले होते. अखेर फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात पीसीआयने याची दखल घेत दि. 24 डिसेंबर 2024 च्या परिपत्रकान्वये डी. फार्मसी पदविकाधारकांना त्या-त्या राज्यातील फार्मसी कौन्सिलकडे नोंदणी करण्यास सशर्त मान्यता दिली आहे.
या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये डी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी शर्ती व अटीच्या अधीन राहून फार्मासिस्ट नोंदणीला तात्पुरती मान्यता दिली आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी होणारी एक्झिट एक्झाम देणे बंधनकारक असून, ही परीक्षा दिल्याशिवाय फार्मासिस्ट प्रमाणपत्र नोंदणीचे नूतनीकरण होणार नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट नमूद केले आहे. तसेच फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करताना या पात्र विद्यार्थ्यांना विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र स्टेट फार्मसी कौन्सिलला सादर करणे गरजेचे आहे.
तीन दिवस तीन पेपर अशा वेळापत्रकानुसार फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून आता तीनऐवजी एकच पेपर घेता येईल, या निर्णयाची मान्यता केंद्रीय स्तरावर सुरू आहे. संबंधित यंत्रणेच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागत होता. यासंदर्भात देशभरातून विद्यार्थ्यांनी केलेल्या उठावामुळे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाला जाग आली असून, अखेर सहा महिन्यांनी एक्झिट एक्झामबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
व्यवसाय व नोकरीतील अडसर तात्पुरता दूर झाला!
एक्झिट एक्झाम वेळेत होत नसल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून नोंदणी न करता आल्याने अशा विद्यार्थ्यांना व्यवसाय उभा करता येत नव्हता. तसेच शासकीय नोकरीचे ध्येय ठेवून प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीस अर्ज करताना अडथळा येत होता; परंतु फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने एक वर्षासाठी दिलेल्या मुदतवाढीमुळे या विद्यार्थ्यांपुढील अडसर तात्पुरता का होईना दूर झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List